मुंबई, ता. २६ ः देशाची चालू खात्यातील तूट या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ८.३ अब्ज डॉलरवर आली असून, ती एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी/GDP) एक टक्का आहे. व्यापारी तुटीतील घट आणि सेवा निर्यातीतील वाढ यामुळे चालू खात्यातील तूट कमी होण्यास मदत झाली असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने आज ही आकडेवारी जाहीर केली.
चालू खात्यातील तूट म्हणजे परदेशात पाठविलेली एकूण रक्कम आणि परदेशातून मिळालेला पैसा यांच्यातील फरक दर्शविते. आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील जुलै-सप्टेंबर (quarter) तिमाहीत ही तूट ३०.९ अब्ज डॉलर होती. एकूण जीडीपीच्या तुलनेत तिचे प्रमाण तब्बल ३.८ टक्के होते. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून (quarter) ही तूट ९.२ अब्ज डॉलर अर्थात ‘जीडीपी’च्या १.१ टक्के होती.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील दुसऱ्या तिमाहीतील व्यापारी तूट आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील दुसऱ्या तिमाहीतील ७८.३ अब्ज डॉलरवरून ६१.७ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली आहे.
सॉफ्टवेअर, व्यवसाय आणि प्रवासी सेवांच्या वाढत्या निर्यातीमुळे सेवा निर्यात ४.२ टक्क्यांनी वाढली आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ७.६ टक्क्यांनी वाढली असून, जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक ठरली आहे, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. उत्पादन, खाण, बांधकाम क्षेत्राची कामगिरी सुधारल्यामुळे आणि सरकारच्या विकासकामांमुळे एकूण देशांतर्गत उत्पादनवाढीला चालना मिळाली आहे.
सरकारने खर्चात वार्षिक १२.४ टक्के वाढ केली आहे, असेही रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) नमूद केले आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, व्यापारी तूट कमी झाल्यामुळे, चालू खात्यातील तूट वर्षभरापूर्वीच्या कालावधीतील जीडीपीच्या २.९ टक्क्यांवरून एक टक्क्यांवर आली आहे.
जुलै-सप्टेंबर या तिमाहीत प्राथमिक उत्पन्न खात्यावरील निव्वळ खर्च, एका वर्षापूर्वी११.८ अब्ज डॉलरवरून १२.२ अब्ज डॉलरपर्यंत वाढला आहे. परकी चलनसाठा या तिमाहीत २.५ अब्ज डॉलरने वाढला आहे, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो ३०.४ अब्ज डॉलरने कमी झाला होता.
ऑक्टोबर २०२३ मध्ये व्यापारी तूट वाढल्यानंतर, चालू तिमाहीतील तूट जवळजवळ १८ ते २० अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. वस्तूंच्या किंमतींमध्ये तीव्र वाढ झाली नाही, तर आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी एकूण चालू खात्यातील तूट जीडीपीच्या १.५ ते १.६ टक्के राहाण्याचा अंदाज आहे.
- अदिती नायर, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, इक्रा
व्यापारी तूट ६१.७ अब्ज डॉलरपर्यंत कमी
सेवा क्षेत्राच्या निर्यातीत ४.२ टक्के वाढ
भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग तिमाहीत ७.६ टक्के
उत्पादन, खाण, बांधकाम क्षेत्राच्या कामगिरीत सुधारणा
परकी चलनसाठ्यातही या तिमाहीत २.५ अब्ज डॉलर वाढ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.