नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील डिसेंबरअखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ८.४ टक्के नोंदवला गेला असून, अंदाजापेक्षा अधिक वाढ झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने या तिमाहीत गेल्या सहा तिमाहींमधील सर्वांत अधिक वेगाने वाढ नोंदवली आहे. बांधकाम, उत्पादन क्षेत्राच्या उत्तम कामगिरीमुळे ‘जीडीपी’ वाढीला चालना मिळाली असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
रॉयटरच्या अर्थतज्ज्ञांनी वर्तविलेल्या ६.६ टक्के दराच्या अंदाजापेक्षा आणि मागील तिमाहीतील ८.१ टक्क्यांच्या सुधारित अंदाजापेक्षा हा दर अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जीडीपीच्या ७.६ टक्के वाढीव दरासह भारतीय अर्थव्यवस्था लवचिक राहिली आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील सात टक्क्यांहून अधिक वाढ झाली. रिझर्व्ह बँकेच्या ६.५ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा हा दर अधिक आहे.
डिसेंबर तिमाहीत उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा दर वार्षिक ११.६ टक्के होता, मागील वर्षीच्या याच तिमाहीत तो १४.४ टक्के होता, तर बांधकाम क्षेत्राचा विकासदर ९.५ टक्के होता. या क्षेत्रांची उत्तम वाढ जीडीपी वाढीला चालना देणारी ठरली, असे सरकारच्या अहवालात म्हटले आहे. कृषी क्षेत्राचा जीडीपीतील हिस्सा १५ टक्के आहे, त्याच्या वाढीचा दर मात्र, सप्टेंबर तिमाहीतील १.६ टक्क्यांवरून ०.८ टक्क्यांवर आली आहे. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने या तिमाहीत विकासदर ६.५ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला होता. एसबीआय रिसर्चने वाढीचा दर ६.७ ते ६.९ टक्क्यांच्या दरम्यान असेल, असे म्हटले होते. त्यांच्या अपेक्षांपेक्षा अधिक दर नोंदवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा डिसेंबर तिमाहीतील ८.४ टक्के दर अर्थव्यवस्थेची मजबुती आणि क्षमता दर्शवितो, असे समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे.
‘जीडीपी’मध्ये झालेली वाढ हे भारताची अर्थव्यवस्था सशक्त असल्याचे निदर्शक आहे. अर्थव्यवस्था वाढीचा वेग असाच कायम राहण्यासाठी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी सरकार यापुढेही प्रयत्नशील राहील.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.