ज्यांना आपल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा (रिटर्न) हवा असतो व तो शेअरमधील गुंतवणुकीतून मिळू शकतो हे माहीत असते; परंतु शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणे जोखमीचे वाटते असे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा पर्याय स्वीकारतात. मात्र, म्युच्युअल फंडाची नेमकी कोणती योजना (स्कीम) निवडावी याबाबत त्यांच्या मनात संभ्रम असतो. म्युच्युअल फंडाचे प्रामुख्याने अॅक्टिव्ह व पॅसिव्ह असे दोन मुख्य प्रकार आहेत.
इंडेक्स फंड
पॅसिव्ह फंडामधील गुंतवणूक ही शेअर बाजारातील विशिष्ट निर्देशांकाचे (index) प्रतिबिंब असते. उदा. ‘निफ्टी फिफ्टी’ इंडेक्स फंड हा एक पॅसिव्ह फंड असून, यामध्ये फंड व्यवस्थापक सक्रियपणे शेअर किंवा इतर सिक्युरिटीजची खरेदी-विक्री करत नाही, तर त्याऐवजी, ‘निफ्टी फिफ्टी’ निर्देशांकात समाविष्ट असणाऱ्या ५० शेअरमध्ये संबंधित शेअरच्या ‘निफ्टी’मधील ‘वेटेड अॅव्हरेज’नुसारच गुंतवणूक करतो, त्यामुळे कमी खर्च आणि कमी व्यवस्थापन शुल्क लागू होते. यातून मिळणारा परतावा (रिटर्न) हा ‘निफ्टी फिफ्टी इंडेक्स’च्या परताव्याच्या अगदी जवळपास असतो. थोडक्यात, कोणताही इंडेक्स फंड हा पॅसिव्ह फंड असून, यातील गुंतवणुकीतून संबंधित इंडेक्सच्या अगदी जवळपास परतावा मिळतो.
‘ईटीएफ’
‘ईटीएफ’ अर्थात एक्स्चेंज ट्रेडेड फंडदेखील पॅसिव्ह प्रकारातील म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. ‘ईटीएफ’मध्ये समाविष्ट असणारे शेअरदेखील एका विशिष्ट इंडेक्सचा मागोवा घेत असतात. थोडक्यात, ‘ईटीएफ’मधील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा (रिटर्न) त्यासाठी आधारभूत असलेल्या इंडेक्सच्या परताव्याच्या जवळपास असतो.
थोडक्यात, इंडेक्स फंड आणि ‘ईटीएफ’ हे दोन्हीही पॅसिव्ह फंड असून, ते एका विशिष्ट निर्देशांकाला (इंडेक्स) प्रतिबिंबित करत असतात व यातील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा संबंधित निर्देशांकाच्या परताव्याच्या जवळपास असतो. मागील ८-१० वर्षांपासून इंडेक्स फंड; तसेच ‘ईटीएफ’ला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे गुंतवणुकीचा कमी खर्च, पारदर्शकता व बाजारानुसार परतावा मिळण्याची खात्री हे होय.
इंडेक्स फंड आणि ‘ईटीएफ’मधील फरक...
इंडेक्स फंडात गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खात्याची गरज नसते. वितरकामार्फत किंवा थेट गुंतवणूक करता येते. ‘ईटीएफ’चे व्यवहार शेअर बाजारात होत असल्याने यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार ब्रोकरमार्फतच करावे लागतात. यामुळे डी-मॅट व शेअर ब्रोकरकडे खाते असणे आवश्यक असते.
इंडेक्स फंडाचा एक्स्पेन्स रेशो हा ‘ईटीएफ’च्या एक्स्पेन्स रेशोपेक्षा थोडा जास्त असल्याने इंडेक्स फंडामधील गुंतवणूक थोडी जास्त खर्चिक असते.
इंडेक्स फंडात ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक करता येते. हा पर्याय ‘ईटीएफ’मधील गुंतवणुकीसाठी उपलब्ध नाही.
इंडेक्स फंडामधील गुंतवणूक आणि त्याची विक्री ‘एनएव्ही’नुसार होत असते व ती आधीच्या दिवसाच्या बाजार बंद होताना जाहीर केलेल्या ‘एनएव्ही’नुसार पुढील दिवसभर होत असते. याउलट ‘ईटीएफ’ची खरेदी-विक्री बाजारात दिवसभर वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार प्रचलित बाजारभावाने होत असते.
इंडेक्स फंडाच्या युनिटचे इंट्रा-डे ट्रेडिंग करता येत नाही. या उलट ‘ईटीएफ’च्या युनिटचे इंट्रा-डे ट्रेडिंग करता येते.
थोडक्यात, पॅसिव्ह पद्धतीने शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे दोन्हीही पर्याय योग्य आहेत, असे म्हणता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.