mumbai share market bse complete 149 years investment finance Sakal
Personal Finance

हॅपी बर्थडे बीएसई !

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. वीरेंद्र ताटके

आशिया खंडातील सर्वांत जुना शेअर बाजार असलेला आपल्या देशातील मुंबई शेअर बाजार अर्थात ‘बीएसई’ मंगळवारी (ता.९) १४९ वर्षे पूर्ण करून १५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ रोजी झाली.

या शेअर बाजाराचा उद्या मंगळवारी (ता.९) वाढदिवस आहे. पूर्वी मुंबईला बॉम्बे म्हटले जायचे, त्यामुळे या शेअर बाजाराचे नाव बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) असे आहे. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली या शेअर बाजाराची सुरुवात झाली, कालांतराने तो दलाल स्ट्रीट येथे स्थलांतरित झाला.

वेगवान प्रगती

गेल्या १४९ वर्षात ‘बीएसई’ ने वेगवान प्रगती केली आहे. भारत सरकारने वर्ष १९५७ मध्ये या बाजारास सिक्युरिटिज कॉन्ट्रक्ट अॅक्ट १८५६ अन्वये मान्यता दिली, तर वर्ष १९८७ मध्ये इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड स्थापन करण्यात आला आणि त्यापाठोपाठ वर्ष १९८९ मध्ये ‘बीएसई’च्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली.

या सर्व गोष्टींमुळे ‘बीएसई’च्या कामकाजात सुधारणा झालीच; पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्येही शेअर बाजाराविषयी विश्वासार्हता वाढू लागली. वर्ष १९९५ मध्ये ‘बीएसई ऑनलाइन ट्रेडिंग’ अर्थात ‘बोल्ट’ (BOLT) या पद्धतीचा उदय झाला.

त्या काळात ऑनलाइन ट्रेडिंग ही संकल्पना खूपच नवी होती आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ही पद्धत अंगवळणी पडण्यासाठी बराच अवधी जावा लागला. सुरुवातीला ठराविक व्यवहारांसाठी वापरली जाणारी ही ऑनलाइन पद्धत वर्ष १९९७ पासून सर्व व्यवहारांसाठी वापरली जाऊ लागली.

वर्ष २००० मध्ये डेरिव्हेटिव्ह व्यवहारांचे आगमन झाले आणि त्यातही हळूहळू बदल होत गेले. वर्ष २००१ मध्ये इंडेक्स ऑप्शन पर्याय उपलब्ध झाला आणि पाठोपाठ स्टॉक ऑप्शन पर्यायदेखील सुरू झाला. वर्ष २००२ मध्ये व्यवहारांच्या पूर्ततेसाठी ‘टी प्लस ३’ (T+३) ही संकल्पना अस्तित्वात आली.

म्हणजेच शेअरचे खरेदी-विक्री व्यवहार झाल्यापासून तीन दिवसांनी व्यवहार पूर्ण होत असे. कालांतराने त्याचे रूपांतर ‘टी प्लस २’ (T+२) मध्ये झाले आणि व्यवहार पूर्ण होण्यासाठी तुलनेने कमी कालावधी लागू लागला. अलीकडील काळात शेअर बाजारातील व्यवहार ‘टी प्लस वन’ (T+१) म्हणजेच व्यवहाराच्या दुसऱ्याच दिवशी पूर्ण होऊ लागले आहेत आणि आता ‘टी प्लस झिरो’ (T+०) ही संकल्पनादेखील प्रत्यक्षात उतरण्याची सुचिन्हे दिसत आहेत.

‘बीएसई’वर वर्ष २००८ मध्ये करन्सी डेरिव्हेटिव्ह व्यवहार सुरू झाले. वर्ष २००९ मध्ये ‘बीएसई स्टार एमएफ’ हा म्युच्युअल फंडातील ट्रेडिंगसाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. वर्ष २०१२ मध्ये ‘एसएमई’ अर्थात स्मॉल अँड मिडीयम एंटरप्रायझेसच्या (मध्यम आणि लघु व्यवसाय) व्यवहारांसाठी वेगळा प्लॅटफॉर्म स्थापन करण्यात आला.

फेब्रुवारी २०१७ मध्ये ‘बीएसई’चा स्वतःचा ‘आयपीओ’ शेअर बाजारात दिमाखात दाखल झाला आणि भारतातील पहिला लिस्टेड स्टॉक एक्स्चेंज होण्याचा मान ‘बीएसई’ला मिळाला. वर्ष २०१९ मध्ये ‘बीएसई’चा ‘आयएसओ २२३०१ः २०१२’ (ISO२२३०१:२०१२) या आंतरराष्ट्रीय मानांकनाने सन्मान झाला.

जिव्हाळ्याचा विषय

मुंबई शेअर बाजार हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्यांना परिचित असलेला ‘सेन्सेक्स’ हा ‘बीएसई’चा निर्देशांक वर्ष १९८६ मध्ये सुरू झाला. ‘सेन्सेक्स’ या शब्दाचा अर्थ ‘सेन्सिटिव्हिटी इंडेक्स’ (Sensitivity Index) असा आहे.

शेअर बाजार किती संवेदनशील (sensitive) आहे, हे ‘सेन्सेक्स’च्या पातळीवरून कळते. आता ८० हजार अंशांच्या आसपास पोहोचलेला ‘सेन्सेक्स’ १९८६ या वर्षात शंभरच्या पातळीला सुरू झाला होता. या प्रदीर्घ प्रवासात ‘सेन्सेक्स’ने अनेक चढ-उतार पाहिले. काही वाईट बातम्यांमुळे अनेकदा तो कोसळलादेखील. मात्र, दीर्घकाळात त्याने आपला चढता आलेख कायम ठेवला आहे.

बाजारमूल्याचा विक्रम

‘बीएसई’वरील नोंदणीकृत कंपन्यांच्या भांडवल बाजारमूल्याने अलीकडील काळात विक्रमी उच्चांक नोंदवला आहे. ‘सेन्सेक्स’सुद्धा विक्रमी पातळीवर आहे. गेल्या १४९ वर्षांत ‘बीएसई’ने सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. कोणताही गुंतवणूकदार ‘सेन्सेक्स’ कोठे पोहोचला? याचा दिवसभरात एकदातरी अंदाज घेतोच.

शेअर बाजाराविषयी अनभिज्ञ असलेली व्यक्तीदेखील ‘सेन्सेक्स’विषयी कुतूहल बाळगून असते. थोडक्यात, ‘बीएसई’ने सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. अशा या ‘बीएसई’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(याविषयी सविस्तर लेख ‘सकाळ मनी’ मासिकाच्या जुलैच्या अंकात वाचायला मिळेल.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

SCROLL FOR NEXT