मुंबई, ता. २५ः देशात परकी चलनाच्या (फॉरेक्स) बेकायदेशीर व्यवहारांसाठी बँकिंग यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे, त्याला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक अधिक कठोर उपाययोजना लागू करण्याचा विचार करत आहे. यासाठी बँका आणि सरकारशी चर्चा सुरू आहे.
गेल्या काही काळात परकी चलनाच्या बेकायदेशीर व्यवहारांसाठी अनेक व्यावसायिकांना अटक करण्यात आली आहे, त्यामुळे अशा गुन्ह्यांची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक गंभीरपणे पावले टाकत आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी नियामक उपाययोजना मजबूत करण्यासाठी सूचना सादर कराव्यात, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीस, सक्तवसुली संचालनालयाने अवैध परकी चलन व्यापार करणाऱ्या दोन व्यावसायिकांना अटक केली. त्यांच्याकडून १२० कोटी रुपये जप्त करण्यात आले. कोलकता येथे राहणार्या या आरोपींनी १८० बँक खाती नियंत्रित आणि व्यवस्थापित केल्याचे तपासात उघड झाले. अशी प्रकरणे वाढत असून, बँकिंग यंत्रणेचा वापर वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे रिझर्व्ह बँकेने यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर नियम करण्याची तयारी केली आहे. रिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांमध्ये गुंतलेले अनधिकृत प्लॅटफॉर्म आणि वेबसाइटची एक यादी तयार केली असून, त्यात अल्पारी, एनीएफएक्स, अॅवा ट्रेड, एफबीएस अशा विविध ७५ कंपन्यांचा समावेश आहे.
समाजमाध्यमे, सर्च इंजिन, गेमिंग अॅप आणि इतर प्लॅटफॉर्मवर परकी चलन व्यवहाराची सुविधा देणार्या अनधिकृत प्लॅटफॉर्म, वेबसाइटचा प्रचार करणाऱ्या जाहिरातींचीही या यादीत दखल घेण्यात आली आहे.
तसेच रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात या क्षेत्राशी संबंधित घटकांना एक पत्र लिहिले आहे. अशा गैरव्यवहारांमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी जनजागृती वाढविण्याच्या गरजेवरही रिझर्व्ह बँकेने भर दिला आहे.
बँकांनी ग्राहकांच्या ओळखीचे पुरावे (केवायसी) बारकाईने तपासावेत, तसेच परकी चलन व्यवहारांमध्ये गुंतलेल्या सर्व पक्षांसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते याचीही खात्री करून घ्यावी, अशी सूचनाही रिझर्व्ह बँकेने केली आहे.
बँक अधिकाऱ्यांनी परकी चलन व्यवहारांवर देखरेख वाढविण्यासाठी सरकारच्या सहकार्याने काम करून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा लागू करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय परकी चलनाच्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतलेल्या बोगस प्लॅटफॉर्मची ओळख करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला सहकार्य करेल.
कठोर नियंत्रणे लागू करण्यासाठी सरकारी संस्थांच्या साह्याने असे गैरव्यवहार ओळखण्यासाठी आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे नियामकाचे उद्दिष्ट आहे. अनधिकृत प्लॅटफॉर्मवर परकी चलन व्यवहारात गुंतलेल्या लोकांना परकी चलन व्यवस्थापन कायदा, १९९१ (फेमा) अंतर्गत कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सूचना
बँकांनी परकी चलन व्यवहारांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर द्यावा.
सरकारच्या ससाह्याने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा लागू करावी
अनधिकृत कंपन्यांशी व्यवहार करण्याच्या जोखमींबाबत जनजागृती उपक्रम राबवावेत
ग्राहकांच्या केवायसीबाबत बारकाईने लक्ष द्यावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.