share market 2023 equity holder in profit sensecx and nifty at higher investor got 20 percent Sakal
Personal Finance

अलविदा २०२३, वेलकम २०२४ !

सर्वच मालमत्ता विभागांसाठी २०२३ हे वर्ष अतिशय चांगले गेले, तरीही ते ‘इक्विटीचे’ वर्ष होते.

सुहास राजदेरकर

सर्वच मालमत्ता विभागांसाठी २०२३ हे वर्ष अतिशय चांगले गेले, तरीही ते ‘इक्विटीचे’ वर्ष होते. ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी उच्चांक गाठला. वर्षाच्या सुरुवातीला, ६१,१६८ अंशांनी सुरू झालेल्या ‘सेन्सेक्स’ने पहिल्या तीन महिन्यांमध्ये तीन टक्के नकारात्मक परतावा देऊन नंतर चांगलीच उसळी मारली आणि वर्षाच्या शेवटी ३१ डिसेंबर रोजी ७२,२४० अंशांवर बंद होऊन गुंतवणूकदारांना २० टक्के इतका घसघशीत परतावा दिला,

जो अमेरिका आणि तैवान सोडून, जगातील सर्व देशांच्या तुलनेत सर्वांत जास्त परतावा ठरला. वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच ‘सिलिकॉन व्हॅली’, ‘फर्स्ट रिपब्लिक बँक’ अशा अमेरिकेतील बलाढ्य बँका एका पाठोपाठ एक कोसळल्यामुळे;

तसेच हिंडेनबर्गने केलेले अदानी समूहावरील आरोप आणि ऑक्टोबरमध्ये सुरू झालेले इस्राईल-हमास युद्ध अशा नकारात्मक घटनांमुळे त्या-त्या वेळी वातावरण नकारात्मक झाले. परंतु, आपल्या चांद्रयानासारख्याच भारतीय अर्थव्यवस्थेमधील अनेक गोष्टी सुसाट सुटल्या होत्या, ज्यामुळे या सर्वांवर मात करून वर्षाचा शेवट गोड झाला.

सकारात्मक गोष्टी

  • भारत जगातील सर्वांत वेगाने वाढणारी आणि पाचवी बलाढ्य अर्थव्यवस्था

  • फेब्रुवारीतील पाव टक्के वाढीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) व्याजदर स्थिर

  • पाऊस समाधानकारक झाल्याने चलनवाढ नियंत्रणात

  • आरबीआयकडून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या

  • लोकसंख्येमध्ये आपण चीनच्या पुढे

  • ‘जीएसटी’ संकलन २० लाख कोटींवर

  • शेअर बाजारामध्ये नव्या एक कोटी गुंतवणूकदारांसह एकूण गुंतवणूकदार आठ कोटी

  • डी-मॅट खाती दोन कोटींहून अधिक वाढून, वर्षअखेर १३ कोटींच्या पुढे

  • शेअर बाजाराचे बाजारमूल्य चार लाख कोटी डॉलर, जगात चौथा क्रमांक

  • डेरिव्हटिव्ह व्यव्यहारांमध्ये जगात पहिला क्रमांक, एकूण व्यवहारांमध्ये ७४ टक्के हिस्सा.

  • म्युच्युअल फंड उद्योगाचा ५० लाख कोटींचा टप्पा पार; ‘एसआयपी’द्वारे १७,००० कोटी रुपयांचा टप्पा पार

  • बजाज, हेलिओस, रिलायन्स-ब्लॅकरॉक अशा मातब्बर कंपन्यांचा म्युच्युअल फंड उद्योगामध्ये प्रवेश

  • बिटकॉईनने यंदा तिप्पट परतावा दिला; मात्र आपल्याकडे ते कायदेशीर नाही.

  • उन्नती फाउंडेशनची सोशल स्टॉक एक्स्चेंजवर पहिली नोंदणी

  • ‘सेबी’कडून टी+३ नियम लागू

  • जे.पी. मॉर्गनच्या ‘गव्हर्नमेंट बॉंड इंडेक्स-इमर्जिंग मार्केट्स’मध्ये भारताचा समावेश

  • पालक लहान मुलांच्या नावेही त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यामधूनही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतील.

गुंतवणूकदारांचे पाठबळ

जगातील बहुतेक देशांचे शेअर बाजार फारशी समाधानकारक कामगिरी करीत नसतांना आपल्या शेअर बाजाराने, मात्र विक्रमी उच्चांकी पातळी गाठली. शेअर बाजारांच्या बाजारमूल्याने चार लाख कोटी डॉलरचा महत्त्वाचा टप्पा पार केला.

परकी गुंतवणूकदारांनी साधारणपणे १५,००० कोटी रुपयांची विक्री केली, तर देशी गुंतवणूकदारांनी साधारण १,६८,००० कोटी रुपयांची खरेदी करून परकी गुंतवणूकदारांची मक्तेदारी पूर्णपणे मोडून काढली.

या वर्षी सर्व विभागांनी २० टक्क्यांच्यावर परतावा दिला. (सोबतचा तक्ता पहा). लार्ज कॅपने २० टक्के, तर मिड कॅप आणि स्मॉल कॅपने अनुक्रमे ४५ टक्के व ५५ टक्के इतका प्रचंड परतावा देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

आयपीओंची कमाल

या वर्षात एकूण २३९ आयपीओ बाजारात आले. त्यापैकी ५७ मेन बोर्ड आणि तब्बल १८२ ‘एसएमई’ विभागातील होते. सर्वात गाजला तो म्हणजे टाटा टेक्नॉलॉजिजचा आयपीओ; ज्यासाठी तब्बल ७० पट बोली लागली.

गुंतवणूकदारांना बहुतेक (८० टक्के) आयपीओंनी भरभरून नफा मिळवून दिला. परंतु, या वर्षी मोठी कमाल केली ती ‘एसएमई’ आयपीओंनी. एकूण १८२ ‘एसएमई’ कंपन्या बाजारात उतरल्या, ज्यांना एकूण फक्त ४,४२५ कोटी रुपये गोळा करायचे होते.

परंतु, त्यांना एकूण २,७८,००० कोटी रुपयांची प्रचंड मोठी बोली लागली. गुंतवणूकदारांना सर्वांत मोठा, ११३० टक्के नफा कमावून दिला तो ‘आरबीएम इन्फ्राकॉम’ कंपनीने. त्यामुळेच, ‘एसएमई’ आयपीओ २०२३ चे विजेते आहेत,

अपेक्षा २०२४

अमेरिकी ‘फेड’ व्याजदर कपात करण्याची शक्यता. भूराजकीय अशांतता राहिली, तरीही भारताला थेट तोटा होण्याची शक्यता नाही. सध्या साधारण सात टक्क्यांनी वाढणारी आपली अर्थव्यवस्था २०२४ मध्येही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल.

बहुतेक कंपन्यांचे निकाल चांगले असतील. सध्या आपण अतिशय चांगल्या स्थितीत आहोत. राजकीय स्थैर्य व परकी; तसेच देशांतर्गत पैशांचा ओघ येत राहील. त्यामुळे शेअर बाजाराने सध्याच्या पातळीपासून साधारणपणे १२ ते १५ टक्के परतावा द्यायला हरकत नाही.

‘निफ्टी ५०’ मध्ये विविध विभागांचा २०२३ मधील परतावा

मालमत्ता विभाग -परतावा (टक्के)

रिअल्टी- ८०

पीएसई -८०

सीपीएसई -७४

ऑटो -४७

मिडकॅप -४६

इन्फ्रा -३९

फार्मा -३३

पी.एस.यू. बँक -३२

एफ.एम.सी.जी. -२९

आय.टी. -२४

मीडिया- २०

मेटल- १८

बँक -१२

विविध मालमत्ता विभागांचा २०२३ मधील परतावा

मालमत्ता विभाग - परतावा (टक्के)

इक्विटी -१८

सोने- १२

जी सेक -७.५

कंपनी रोखे- ७

रिअल इस्टेट -२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT