SME IPO : सध्या ‘एसएमई’ (स्मॉल अँड मिडीयम एंटरप्राइजेस) कंपन्यांच्या आयपीओचे पेव फुटलेले दिसते. हे ‘मायक्रो’ आणि ‘स्मॉल कॅप’ आयपीओ गुंतवणूकदारांना लिस्टिंगलाच तुफान फायदा मिळवून देताना दिसत आहेत. कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये आतापर्यंत १०३ ‘एसएमई’ कंपन्यांनी तब्बल २,७०० कोटी रुपये आयपीओमधून उभे केले आहेत.
हा आतापर्यंतचा सर्वोच्च रेकॉर्ड आहे. वर्ष २०१८ मध्ये १४१ ‘एसएमई’ कंपन्यांनी २,२८७ कोटी रुपये गोळा केले होते, तर २०२२ मध्ये १०९ कंपन्यांनी १,८७५ कोटी रुपये गोळा केले होते. यावेळेला मोठया गुंतवणूकदारांनी या आयपीओंना भरघोस प्रतिसाद दिला.
आतापर्यंत आठ महिन्यांमध्ये, २,७०० कोटी रुपयांच्या शेअरसाठी तब्बल १,४४,००० कोटी रुपयांची मागणी आली. अर्थात, हे आयपीओ मोठया प्रमाणात ओव्हर-सबस्क्राईब झाले. १०० पैकी ११ आयपीओंमध्ये २०० ते ४०० पटीने, तर १३ आयपीओंमध्ये १०० ते २०० पटीने जास्त बोली लागली.
‘श्रीवरी स्पाईसेस अँड फूड्स’ या हैद्राबाद येथील कंपनीच्या नऊ ऑगस्ट रोजी बंद झालेल्या आयपीओसाठी ५१८ पटीने बोली लागली. फक्त नऊ कोटी रुपयांचा इश्यू असतांना त्यासाठी तब्बल २७०० कोटी रुपये आले. परिणामी ४२ रुपये आयपीओ किंमत असलेला हा शेअर १८ ऑगस्ट रोजी, १०३ रुपयांना लिस्ट झाला आणि सतत सात दिवस वरचे सर्किट लागून त्याचा भाव आज १३६ रुपये आहे.
त्याचप्रमाणे, तीन ऑगस्ट रोजी बंद झालेल्या ‘ओरिएना पॉवर’ या नोएडा येथील कंपनीच्या आयपीओसाठीही १७७ पटीने बोली लागून ६० कोटी रुपयांच्या इश्यूसाठी तब्बल ७,००० कोटी रुपये आले. ११८ रुपयांचा हा शेअर महिन्याच्या आत आज तब्बल ३६८ रुपयांवर गेला आहे.
आयपीओमधील गुंतवणूक
‘बीएसई’ आणि ‘एनएसई’ या दोन्ही शेअर बाजारांमध्ये दोन विभाग असतात. एक म्हणजे ‘मेन बोर्ड’ ज्यामध्ये मोठ्या कंपन्या सामील केल्या जातात व दुसरा ‘एसएमई’ विभाग ज्यामध्ये तुलनेने लहान कंपन्यांच्या शेअरची नोंदणी केली जाते.
ज्यांचे भागभांडवल ‘कमाल’ २५ कोटी रुपये आहे, अशा छोट्या कंपन्यांचे शेअर कालांतराने ‘मेन बोर्ड’ वर हस्तांतरित केले जातात. ‘मेन बोर्ड’मधील आयपीओचे लिस्टिंग झाल्यावर गुंतवणूकदार एक शेअरसुद्धा खरेदी करू शकतात. परंतु, ‘एसएमई’ शेअरचे लिस्टिंग झाल्यानंतरसुद्धा असे शेअर १००० किंवा जास्त असेच खरेदी-विक्री करावे लागतात.
जोखीम : ‘एसएमई’ शेअरमध्ये गुंतवणूक करतांना सामान्य गुंतवणूकदारांनी अतिशय सावध राहाणे आवश्यक वाटते.
कारणे
तरलता अर्थात लिक्विडिटी अतिशय कमी असते. जेमतेम १० ते १२ लाखांचे व्यवहार होतात.
आयपीओतील शेअरचा भाव आणि लिस्टिंगचा भाव यातील प्रचंड तफावत पाहता, ‘कुछ तो गडबड है!’, असेच म्हणावे लागेल. लिस्टिंगला पाच ते दहा टक्के भाव जास्त असेल, तर ते रास्त वाटते; अन्यथा मर्चंट बॅंकरची भाव ठरविताना चूक झाली किंवा शेअरचा भाव लिस्टिंगला अवैधरित्या फुगवला असल्याचा संशय येतो.
कंपन्या लिस्टिंग झाल्यावर स्टॉक एक्स्चेंजचे सर्व नियम पाळताना दिसत नाहीत.
बहुतेक मोठे गुंतवणूकदार शेअरचा भाव वाढल्यावर शेअर विकून बाहेर पडतात आणि सर्वसामान्य गुंतवणूकदार त्यांच्याकडून ते जास्त भावाला खरेदी करून अडकतांना दिसतात.
तात्पर्य: बाजाराचा आणि कंपनीचा सखोल अभ्यास नसेल, तर ‘एसएमई’ शेअर खरेदी करण्यापूर्वी, वरील जोखीम लक्षात घेऊन, तज्ज्ञ आणि अनुभवी सल्लागारांची मदत घेणे योग्य राहील.
(लेखक ‘ए३एस’ फायनान्शिअल सोल्युशन्सचे प्रवर्तक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.