रिझर्व्ह बँकेने नुकतेच म्हणजे ५ जुलै २०२३ रोजी एक परिपत्रक काढून डेबिट, क्रेडिट कार्ड देऊ करणाऱ्या बँका व वित्तसंस्थांना आपल्या ग्राहकांना त्यांना हवे असलेलेच डेबिट, क्रेडिट कार्ड घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या ग्राहकांना आपल्याला हवे असलेले कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय नाही.
यात प्रामुख्याने मास्टर, व्हिसा, अमेरिकन एक्स्प्रेस, डायनर क्लब यांच्यासह गेल्या दोन वर्षांपासून ‘एनपीसीआय’ने (नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया) विकसित केलेल्या भारतीय रूपे कार्डचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने सूचित केलेली सुविधा नवे कार्ड घेताना एक ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार असून, सध्याचे कार्ड नूतनीकृत करतानाही ही सेवा मिळेल.
मागणीनुसार कार्ड देणे बंधनकारक
बँक अथवा वित्तसंस्था देऊ करत असलेले डेबिट किंवा क्रेडिट कार्डच ग्राहकाला घ्यावे लागते. मात्र, आता ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या कार्डाची मागणी बँकेकडे अथवा वित्तसंस्थेकडे करू शकतील व त्यांना हवे असलेले कार्ड देणे बंधनकारक असेल.
सध्या सबंधित बँक अथवा वित्तसंस्थेचा एका किंवा दोन कार्ड नेटवर्क प्रोव्हायडरबरोबर करार असल्याने अन्य नेटवर्क प्रोव्हायडरचे कार्ड त्या देऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकातील सूचनेनुसार, आता बँका व वित्तीय संस्थांना सर्व कार्ड नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांशी करार करावा लागणार आहे. यामुळे ग्राहक ज्या नेटवर्क प्रोव्हायडर कंपनीचे कार्ड घेऊ इच्छित असेल ते कार्ड त्याला मिळणार आहे व ते कार्ड अन्य नेटवर्क प्रोव्हायडरसोबतही वापरता येणार आहे.
ग्राहकाला आपले डेबिट, क्रेडिट कार्ड कुठेही वापरता येईल. यामुळे मास्टर, व्हिसा, अमेरिकन एक्स्प्रेस यासारख्या कार्डांची भारतातील मक्तेदारी कमी होईल व आपण विकसित केलेल्या रूपे कार्डचा वापर मोठ्याप्रमाणावर वाढून, त्यातून परदेशात जाणारा व्यवसाय देशातच राहील.
यूपीआय-रुपे क्रेडिट कार्ड सेवा
काही दिवसांपूर्वी ‘एनपीसीआय’ व रिझर्व्ह बँकेने यूपीआय सुविधा रुपे क्रेडिट कार्डशी संलग्न केली आहे. त्यामुळे आता क्यूआर कोड स्कॅन करून रुपे कार्डाद्वारे यूपीआय पेमेंट (भीम/गुगल पे/पेटीम/फोन पे) करता येणे शक्य झाले आहे. ही सुविधा फक्त रूपे क्रेडिट कार्डासाठी उपलब्ध आहे. यामुळे क्रेडिट कार्ड व्यवसायातील स्पर्धा वाढीस लागून, ग्राहक सेवा सुधारण्यास मदत होईल.
(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.