Sudhakar Kulkarni writes Fixed Deposit or Mutual Fund investment money management sakal
Personal Finance

मुदत ठेव की म्युच्युअल फंड?

शिल्लक रक्कम गुंतविण्यासाठी प्रामुख्याने मुदत ठेव व म्युचुअल फंड हे दोन पर्याय सहजपणे डोळ्यासमोर येतात.

सुधाकर कुलकर्णी

आजकाल बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबात पती-पत्नी दोघेही कमावते असतात व कुटुंबही मर्यादित असते. यामुळे बऱ्यापैकी शिल्लक राहू शकते व ही शिल्लक रक्कम गुंतविण्यासाठी प्रामुख्याने मुदत ठेव व म्युचुअल फंड हे दोन पर्याय सहजपणे डोळ्यासमोर येतात. मात्र, यातील कोणता पर्याय निवडावा याबाबत बहुतेकांच्या मनात संभ्रम असल्याचे दिसून येते. त्यादृष्टीने दोन्हीही पर्यायांचे फायदे-तोटे काय व कोणता पर्याय कधी व कसा निवडणे हितावह असते, हे जाणून घेऊया.

मुदत ठेव

बँक, पोस्ट, कंपन्या, पतसंस्था अशा ठिकाणी ठराविक मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास, गुंतवणूक करताना देऊ केलेला व्याजाचा दर ती मुदत संपेपर्यंत बदलत नाही व असे व्याज आपल्याला मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने किंवा व्याज व मुद्दल मुदतीनंतर एकरकमीही घेता येते.

तसेच अशी गुंतवणूक सरकारी बँका, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी केली असेल, तर ती पूर्णपणे सुरक्षित असते; तसेच मोठ्या खासगी बँका (उदा, एचडीएफसी बँका, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आदी) तसेच नामांकित कंपन्यांमधील (उदा : बजाज फायनान्स, इन्फोसिस, टाटा मोटर्स आदी) गुंतवणूकसुद्धा तुलनेने सुरक्षित असते.

सहकारी बँका, पतसंस्था, खासगी कंपन्या, वित्तीय संस्था, नव्याने सुरू झालेल्या बँका यातील गुंतवणूक सुरक्षित असतेच, असे नाही. अशा गुंतवणुकीतून सध्या साधारणपणे ७.५ ते ८.५ टक्के इतक्या दराने व्याज मिळू शकते. (गुंतवणूक कुठे व किती कालावधीसाठी केली आहे, यानुसार) थोडक्यात, या गुंतवणुकीतून आपल्याला नेमके किती व्याज मिळणार आहे व गुंतविलेली संपूर्ण रक्कम कधी मिळणार आहे, याची माहिती असते.

थोडक्यात, मुदत ठेवीची गुंतवणूक फारशी जोखमीची नसते व यातून मिळणारा परतावासुद्धा बेताचाच असतो. तसेच ही गुंतवणूक एका ठराविक कालावधीसाठी असल्याने गुंतवणुकीला तरलता (लिक्विडीटी) नसते. बँकेतील मुदतठेव आपण मुदतीपूर्वी मोडू शकता, मात्र त्यासाठी मिळणाऱ्या व्याजात नुकसान सोसावे लागते.

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करताना आपण आपल्याला हवी तशी जोखीम घेऊ शकतो व त्यानुसार मिळणाऱ्या परताव्याची अपेक्षा करू शकतो. यात डेट, हायब्रिड; तसेच इक्विटी हे पर्याय असतात व यात डेट पर्यायातील गुंतवणूक कमी जोखीमीची असते, तर हायब्रिड पर्यायात जोखीम थोडी जास्त असते आणि इक्विटी या पर्यायात जोखीम जास्त असून, ही जोखीम शेअर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असते.

मुच्युअल फंडातील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा मुदतठेवीच्या परताव्यापेक्षा जास्त असू शकतो; असतोच असे नाही. म्युचुअल फंडातील गुंतवणुकीस तरलता असते व आपण गुंतवणूक केलेली सर्व किंवा अंशत: रक्कम कधीही काढू शकता व मिळणारी रक्कम युनिटच्या बाजारभावानुसार मिळते.

गुंतवणूक पर्याय निवडताना, गुंतवणुकीचा मूळ उद्देश व त्यासाठीचा कालावधी व गुंतवणुकीतील सुरक्षितता या बाबींचा विचार आवश्यक आहे. जी रक्कम आपल्याला पुढील सहा महिन्यांत कधी हवी असेल व थोडी जोखीम घ्यायची तयारी असेल, तर म्युच्युअल फंडाच्या लिक्विड स्कीममध्ये गुंतविणे फायदेशीर ठरू शकते; अन्यथा बँकेत बचत खात्यात ठेवावेत.

रक्कम दोन ते तीन वर्षांनी हवी असेल, तर थोडी जोखीम घेऊन हायब्रिड फंड योजनेत गुंतविल्यास दहा ते ११ टक्के परतावा मिळू शकतो. जोखीम घ्यायची नसेल, तर बँकेत ठेव ठेवावी यातून ७ ते ८ टक्के इतका परतावा मिळू शकतो. आपल्याला रक्कम पाच ते सात वर्षानंतर किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर हवी असेल, तर जोखीम घेऊन म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेत केल्यास १२ ते १४ टक्के परतावा मिळू शकतो. बँकेत अथवा अन्य ठिकाणी गुंतविल्यास सात ते आठ टक्के इतकाच परतावा मिळतो.

बँकेत मुदत ठेव करताना शक्यतो राष्ट्रीयीकृत बँक किंवा वर उल्लेखिलेल्या मोठ्या खासगी बँकेतच करावी. जास्त व्याजाच्या मोहाने लहान सहकारी बँक, पतपेढी यासारख्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचे टाळलेलेच बरे. थोडक्यात, दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडावा, तर अल्पकालीन उद्दिष्टांसाठी मुदत ठेवीचा पर्याय निवडावा.

(लेखक सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT