सर्वसामान्य गुंतवणूकदार सुरक्षित आणि जास्त परतावा देणारा गुंतवणूक पर्याय शोधत असतात. असे पर्याय फार कमी आहेत. अशा काही पर्यायांपैकी एक म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे रोखे अर्थात आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉंड्स.
अल्पबचत योजना, पीपीएफ यांच्याइतकाच सुरक्षित, तर बँकांपेक्षा काहीसा जास्त सुरक्षित असा पर्याय सध्या आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉंड-२०२० च्या माध्यमातून उपलब्ध आहे. यातून मिळणारा वार्षिक परतवा सध्या ८.०५ टक्के असून, हा पोस्ट (७.७० टक्के) , पीपीएफ (७.१० टक्के), तर प्रमुख सरकारी व खासगी बँकातून मिळणारा तीन वर्षांवरील ठेवीवर मिळणाऱ्या (७ ते ७.५ टक्के) परताव्याच्या तुलनेने ०.३५ ते ०.९० टक्के इतका जास्त आहे. मात्र, सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याबाबत अधिक माहिती नसल्याचे दिसून येते.
आरबीआय रोख्यांची वैशिष्ट्ये
यात फक्त निवासी भारतीयास गुंतवणूक करता येते.
गुंतवणूक सर्व राष्ट्रीयकृत बँका; तसेच प्रमुख खासगी बँका व स्टॉक होल्डिंग कार्पोरेशन यांच्यामार्फत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करता येते.
यावर मिळणारे व्याज हे स्थिर नसून, दर सहा महिन्याने (१ जानेवारी व १ जुलै रोजी) बदलू शकते. त्यामुळे याला फ्लोटिंग रेट असे म्हणतात. दर सहामाहीला व्याज दिले जाते व ते करपात्र असते.
किमान गुंतवणूक रु.१,००० व कमाल कितीही गुंतवणूक करता येते.
गुंतवणुकीचा कालावधी सात वर्षे असून, मुदतपूर्व रक्कम काढता येत नाही. मात्र ६० ते ७० वर्षे वयोगटातील गुंतवणूकदार सहा वर्षानंतर, ७० ते ८० वर्षे वयोगटातील पाच वर्षानंतर, तर ८० वर्षे वयावरील गुंतवणूकदार चार वर्षानंतर मुदतपूर्व रक्कम काढू शकतात.
हे बॉंड अहस्तांतरणीय (नॉन ट्रान्सफरेबल) असून, यावर कर्ज घेता येत नाही किंवा ते तारण म्हणून देता येत नाही.
मुदतीपूर्वी गुंतवणूकदराचा मृत्यू झाल्यास नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाच्या नावाने रक्कम वर्ग केली जाते. यात संयुक्त नावाने, एचयूएफच्या नावाने; तसेच अज्ञान बालकाच्या (मायनर) नावानेसुद्धा गुंतवणूक करता येते.
व्याजदराची मोजणी
यावर मिळणारे व्याज नेहमी पोस्टाच्या एनएससीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा ०.३५ टक्के अधिक असते. एनएससीचे व्याजदर १ जानेवारी व १ जुलै रोजी बदलू शकतात. त्या बदलानुसार आरबीआय बॉंडचे व्याजदरही बदलतात. सध्या एनएससीचा व्याजदर ७.७० टक्के असल्याने या बॉंडसाठीचा व्याजदर ७.७०+०.३५ =८.०५ टक्के आहे.
ज्यांची शेअर, म्युचुअल फंड यासारख्या जोखीम असणाऱ्या पर्यायांत गुंतवणूक आहे तसेच नजीकच्या ६-७ वर्षांत गरज पडणार नाही अशी काही रक्कम आहे त्यांनी, तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांची एनएससी, सिनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम, पंतप्रधान वय वंदना यातील गुंतवणुकीची कमाल मर्यादा शिल्लक नाही, त्यांनी आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉंड (२०२०) मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर राहील.
गुंतवणुकीचा कालावधी जास्त असला, तरी गुंतवणुकीतील सुरक्षितता व मिळणारा परतावा विचारात घेता आपल्या गुंतवणुकीचा काही भाग आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉंड (२०२०) मध्ये गुंतविणे योग्य राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.