पुणे : देशातील यूपीआय व्यवहारांमध्ये मोठी वाढ होत असून, जूनमध्ये या व्यवहारांच्या संख्येने विक्रमी ९.३ अब्जांचा टप्पा गाठला आहे. जानेवारी २०२२ मधील ४.६ अब्ज यूपीआय व्यवहारांच्या तुलनेत त्यात दुप्पट वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंट सेवा क्षेत्रातील‘वर्ल्डलाइन’ने ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे.
यूपीआयमार्फत झालेल्या व्यवहारांचे मूल्यातही वाढ झाली आहे. जानेवारी २०२२ मधील ८.३ लाख कोटी रुपयांवरून ते जूनमध्ये १४.७ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. एकूण डिजिटल व्यवहारांमध्ये मोबाइलद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण सर्वाधिक असून, व्यक्ती ते व्यापारी (पीटूएम) व्यवहार अधिक होत असल्याने यूपीआय व्यवहारांच्या वाढीला चालना मिळाली आहे.
देशात जानेवारी २०२२ मध्ये एकूण यूपीआय व्यवहारांमध्ये व्यक्ती ते व्यापारी व्यवहार ४०.३ टक्के होते. हे प्रमाण वाढत जाऊन यंदा जूनमध्ये ते ५७.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे प्रमाण आणखी वाढत जाईल, असा अंदाज आहे. व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांची संख्या वाढली असली, तरी त्यात मूल्याच्या पातळीवर घट झाली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
जानेवारी २०२२ मध्ये व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांचे सरासरी मूल्य ८३९ रुपये होते, ते जूनमध्ये ६५९ रुपयांपर्यंत कमी झाले आहे. भाजीपाला खरेदी, दूरध्वनी सेवेची बिले, बेकरी, औषध दुकाने अशा ठिकाणी व्यवहार केले जात असल्याने त्यांची संख्या अधिक असले तरी मूल्य कमी असते.
व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांमधील वाढीचा कल बघता २०२५ पर्यंत एकूण यूपीआय व्यवहारांमधील याचा हिस्सा ७५ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. यूपीआय व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अॅपमध्ये गुगल पे, पेटीएम आणि फोनपे यांचा हिस्सा सर्वाधिक आहे.
गेल्या वर्षी या अॅपद्वारे करण्यात आलेल्या व्यवहारांचे प्रमाण ९४.५५ टक्के होते, ते २०२३ मध्ये ९५.६८ टक्के झाले आहे. यूपीआयचा वापर छोट्या व्यवहारांसाठी वाढत असल्यामुळे या सेवेची व्याप्ती वाढतीच राहणार असल्याचे स्पष्ट होते, असेही या अहवालात स्पष्ट केले आहे.
सर्वाधिक डिजिटल व्यवहार होणारी दहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, तेलंगण, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ठळक वैशिष्ट्ये
जूनमध्ये यूपीआय व्यवहारांची संख्या ९.३ अब्ज
जानेवारी २०२२ मधील ४.६ अब्ज व्यवहारांच्या तुलनेत दुप्पट वाढ
व्यवहारांचे मूल्य १४.७ लाख कोटी रुपये
व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांचे प्रमाण सर्वाधिक
एकूण व्यवहारांमधील व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांचा हिस्सा २०२५ पर्यंत ७५ टक्के
गुगल पे, पेटीएम आणि फोनपे यांचा सर्वाधिक वापर
सर्वाधिक डिजिटल व्यवहार होणाऱ्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश
डिजिटल व्यवहारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वाधिक पसंती यूपीआय व्यवहारांना दिली जात आहे. ग्रामीण भागातही यूपीआयचा वापर वाढला आहे. मोबाइलच्या माध्यमातून होणारे व्यवहार आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढत जातील.
-रमेश नरसिंहन, मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्ल्डलाइन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.