Financial Awareness in Women : महिलांमध्ये आर्थिक नियोजनाबाबतची सजगता वाढत असून, सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) निवृत्तीनंतरचे नियोजन करण्यात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर असल्याचे एका अहवालात आढळून आले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांमधील हा कल आश्वासक आहे. ‘फिनएज’ कंपनीच्या अहवालानुसार, देशातील किमान ४० टक्के महिला नवीन गुंतवणूकदार म्हणून उदयास येत आहेत.
पुरुषांच्या तुलनेत महिला ‘एसआयपी’द्वारे (SIP) अधिक रक्कम गुंतवत असल्याचेही समोर आले आहे. महिला ‘एसआयपी’द्वारे दरमहा सरासरी १४,३४७ रुपये गुंतवतात. तर पुरुष दरमहा १३,७०४ रुपये गुंतवतात. महिला वयाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर गुंतवणूक सुरू करतात. ३९.३ टक्के महिला वयाच्या २० व्या वर्षी आणि ४१ टक्के महिला ३० व्या वर्षी गुंतवणूक सुरू करतात. यापैकी ७१ टक्के महिलांनी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली आहे. अंदाजे ४४ टक्के महिला निवृत्ती नियोजनाला , तर ३५ टक्के महिला मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देतात. महिला केवळ अधिक गुंतवणूक करत नाहीत, तर त्या अधिक चाणाक्षपणे गुंतवणूकही करत असल्याचेही निरीक्षण फिनएजचे सीईओ हर्ष गहलौत यांनी नोंदवले.
म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीत फेब्रुवारीतही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’ची घोडदौड कायम असून, ‘एसआयपी’द्वारे १९,१८६ कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणूक झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाने (अॅम्फी) आज ही माहिती दिली.
‘अॅम्फी’च्या अहवालानुसार, ‘एसआयपी’द्वारे जानेवारी महिन्यात १८,८३८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. नव्या एसआयपी खात्यांमध्येही जानेवारीच्या तुलनेत ४९.७९ लाखांनी वाढ झाली असून, फेब्रुवारीअखेर ‘एसआयपी’ खात्यांची संख्या ८ कोटी २० लाखांवर गेली आहे. फेब्रुवारीमध्ये उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील निव्वळ मालमत्ता ५४ लाख ५४ हजार २१४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जानेवारीमध्ये ती ५२.७४ लाख कोटी रुपये होती.
फेब्रुवारीमध्ये इक्विटी फंडांमध्ये जानेवारीच्या तुलनेत २३ टक्के वाढ होऊन २६,८६६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मार्च २०२१ पासून सलग ३६ व्या महिन्यात या श्रेणीतील गुंतवणूक वाढली आहे.
ओपन-एंडेड म्युच्युअल फंड योजनांमधील निव्वळ प्रवाह जानेवारीत १.२३ लाख कोटी रुपयांवरून फेब्रुवारीमध्ये १.१९ लाख कोटी रुपये झाला. मिड कॅप फंडातील गुंतवणूक १२ टक्क्यांनी घसरली. मात्र, ती १,८०८ कोटी रुपयांवर स्थिर राहिली, तर स्मॉल कॅप फंडातील गुंतवणूक दहा टक्क्यांनी कमी होऊन २,९२२ कोटी रुपयांवर आली. विशेष म्हणजे, लार्ज कॅप फंडांमध्ये ९२१ कोटी रुपयांची गुंतवणूक आली, गेल्या २० महिन्यांतील ही तिसरी सर्वाधिक गुंतवणूक आहे.
यावेळी सेक्टोरल किंवा थीमॅटिक फंडांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचे दिसून आले, या फंडामधील गुंतवणूक जानेवारीतील ४८०४ कोटी रुपयांच्या तुलनेत १३४ टक्क्यांनी वाढून ११,२६२ कोटी रुपयांवर पोहोचली. लिक्विड फंडात विक्रमी ८३,६४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. कार्पोरेट बॉंड फंडात दुसरी सर्वाधिक ६३,८०८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. डेट फंडांमध्ये फेब्रुवारीमध्ये ६३,८०९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जानेवारीमध्ये यातून ७६,४६८ कोटी काढून घेण्यात आले.
‘एसआयपी’द्वारे फेब्रुवारीमध्ये १९ हजार कोटींची उच्चांकी गुंतवणूक
नव्या एसआयपी खात्यांची संख्या ४९.७९ लाख
व्यवस्थापनाखालील निव्वळ मालमत्ता ५४,५४,२१४ कोटी रुपये
लिक्विड फंडात विक्रमी ८३, ६४२ कोटी रुपयांची गुंतवणूक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.