पुणे : सध्याच्या काळात बहुतांश युवा पिढी शेअर बाजारात दररोज व्यवहार (ट्रेडिंग) करून नफा कमाविण्यावर भर देत आहे. मात्र, अनेकदा ‘ट्रेडर’ना आपण निर्देशांकाच्या वाढीनुसार परतावा मिळवला नसल्याचे माहिती नसते.
अशा ट्रेडरचे प्रमाण अधिक असून, पुण्यातील जवळपास ६२ टक्के शेअर ट्रेडरची कामगिरी निर्देशांकापेक्षा खूप कमी असल्याचे निरीक्षण ‘सॅम्को सिक्युरिटीज’ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षण अहवालात नोंदविले आहे.
कंपनीने डेरिव्हेटिव्हजमध्ये व्यवहार करणारे, हायब्रिड ट्रेडर, दीर्घकाळ गुंतवणूक करणारे आणि ऑप्शन प्रकारातील ट्रेडर अशा चार श्रेणीत ट्रेडिंग करणाऱ्यांचे सर्वेक्षण केले आणि प्रत्येक श्रेणीनुसार निष्कर्ष नोंदवले. कंपनीचे कार्यकारी संचालक नीलेश शर्मा यांनी या सर्वेक्षणातील निष्कर्षांची माहिती दिली.
ते म्हणाले, की पुण्यातील सुमारे चार हजार ट्रेडरच्या सर्वेक्षणानंतर हे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. या सर्वेक्षणानुसार, पुण्यातील जवळपास ६२ टक्के शेअर ट्रेडरची कामगिरी निर्देशांकापेक्षा खूप कमी आहे.
डेरिव्हेटिव्हज श्रेणीमध्ये ट्रेडरनी वर्षभराच्या कालावधीत उत्तम कामगिरी केली आहे. व्यवहाराच्या आकारानुसार, प्रत्येक ट्रेडर सरासरी २०,३५४ रुपये एवढा फायदा मिळवतो, मात्र त्याचा सरासरी तोटादेखील १३,८३३ रुपये आहे.
हायब्रिड श्रेणीत ६४ टक्के ट्रेडरनी सहा महिन्यांत सर्वोत्तम कामगिरी केली असून, त्यांची सर्वाधिक खराब कामगिरी तीन महिन्यांत पाहण्यात आली आहे. सरासरी ८,२५१ रुपये फायदा मिळवणारे या श्रेणीतील ट्रेडर सरासरी ७,१९१ रुपयांचे नुकसान नोंदवत असल्याचे दिसून आले आहे.
गुंतवणूकदार या श्रेणीत शेअर खरेदी केल्यानंतर ते काही महिने किंवा वर्षे अशा दीर्घकाळासाठी ठेवले जातात. अशा पारंपरिक पद्धतीने गुंतवणूक करणारे वर्षभरात ५१ टक्के चांगली कामगिरी करतात, तर तीन महिन्यांत ३० टक्के कामगिरी नकारात्मक असते.
हे गुंतवणूकदार सरासरी १८,४७४ रुपये नफा मिळवतात, मात्र त्यांचे सरासरी नुकसान २४,२५० रुपये असते. ऑप्शन प्रकारातील ट्रेडरची वर्षभरात अगदी अल्प कालावधीत कामगिरी चांगली झाली नसल्याचे आढळते.
१२ महिन्यांत ८३ टक्के ट्रेडरना फायदा झाल्याचे आढळले आहे. यांचा सरासरी फायदा ३,८९५ रुपये असून, सरासरी नुकसान ५,६८८ रुपये आहे. या निरीक्षणांवरून असे लक्षात येते, की बहुतांश ट्रेडरना आपला फायदा कमी आणि नुकसान अधिक होत असल्याचे लक्षात येत नाही.
शेअर बाजारातून चांगला फायदा मिळविण्यासाठी, आपली कामगिरी कशी सुधारावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘सॅम्को’ने ‘माय ट्रेड स्टोरीज’ ही सुविधा दाखल केली आहे. यामध्ये ट्रेडरना प्रगत साधने आणि विश्लेषणात्मक माहितीच्या आधारे उपाययोजना सुचविल्या जातात. त्यांच्या पोर्टफोलिओचे सखोल विश्लेषण करून त्यांना मार्गदर्शन केले जाते, असे शर्मा यांनी सांगितले.
देशातील शेअर गुंतवणूकदारांबाबत निरीक्षणे
६५ टक्के गुंतवणूकदारांना परताव्याची माहितीच नाही.
६३ टक्के गुंतवणूकदारांनी उद्दिष्टच निश्चित केलेले नसते.
६७ टक्के गुंतवणूकदार निर्देशांकांइतका परतावा मिळविण्यात अयशस्वी ठरतात.
७७ टक्के लोकांना निर्देशांकाइतका किंवा त्याहून अधिक परतावा मिळविणे महत्त्वाचे असते, याची जाणीव नसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.