शेअर बाजारात दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरील ट्रेडिंगला विशेष महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आज (ता. १२) संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ या एका तासाच्या कालावधीत मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) मुहूर्ताचे ट्रेडिंग होईल. त्याआधी १५ मिनिटांचे पूर्व-सत्र असेल, त्यानंतर एक तासाचे ट्रेडिंग सत्र होईल.
दिवाळीच्या काळात शेअर बाजाराला या दिवशी सुटी असते. मात्र, या मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी शेअर बाजार उघडले जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, दिवाळीला नव्या संवत्सराची सुरुवात होते आणि हे मुहूर्ताचे सत्र शेअर बाजारातील आगामी वर्षाचे संकेत देते. त्यामुळे या मुहूर्त ट्रेडिंगच्या सत्राला विशेष महत्त्व आहे. यंदाचे सत्र संवत २०८० ची सुरुवात आणि संवत २०७९ ची समाप्ती असेल.
या शुभ मुहूर्तावर केल्या जाणाऱ्या ट्रेडिंगमुळे वर्षभर संपत्ती आणि समृद्धी लाभते, भरभराट होते, असे मानले जाते. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार आवर्जून ही परंपरा पाळतात. मुहूर्ताच्या शेअर ट्रेडिंगसाठी इक्विटी, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, इक्विटी फ्युचर, ऑप्शन्स आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग यासह विविध विभाग खुले असतील. या तासाभराच्या कालावधीत शेअर बाजारातील उत्साह विलक्षण असतो.
मागील वर्षात २४ ऑक्टोबर रोजी हे मुहूर्ताचे शेअर ट्रेडिंग झाले होते. त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ५२४ अंशांनी वाढला होत. पुढील वर्षाच्या दिवाळीपर्यंत ‘सेन्सेक्स’ ७२ हजारांपर्यंत, तर ‘निफ्टी’ २४ हजारांपर्यंत वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
मुहूर्त ट्रेडिंगची ही प्रथा दीड शतकांहून अधिक जुनी आहे. मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) १९५७ मध्येही परंपरा सुरू केली, तर ‘एनएसई’ने १९९२ मध्ये ही परंपरा सुरू केली. ऑनलाइन ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी, ब्रोकर, गुंतवणूकदार मुंबई शेअर बाजाराच्या इमारतीत एकत्र येऊन विधीवत पूजा करून पुढील किमान एका वर्षासाठी ठेवू इच्छित असलेल्या शेअरसाठी ऑर्डर देत असत.
आता ऑनलाइन सुविधा सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार घरून या ट्रेडिंगमध्ये सहभागी होतात. यानिमित्ताने शेअर बाजारात आकर्षक सजावट, रोषणाई केली जाते. अनेक गुंतवणूकदार प्रातिनिधिक स्वरूपात शेअर खरेदी करून शेअर ट्रेडिंगचा मुहूर्त करतात. काही जण मुहूर्तावर घेतलेले शेअर पुढील पिढ्यांसाठी राखून ठेवतात, तर काही जण या वेळेत नफा नोंदवितात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.