मुंबई, ता. ९ : लोकसभा निवडणुकीतील अनिश्चितता तसेच अपेक्षेपेक्षा कमी लागत असलेले कंपन्यांचे निकाल यामुळे आज भारतीय शेअर बाजारांमध्ये दीड टक्का घसरण झाली, शेअर बाजारांची ही सलग पाचवी घसरण आहे.
आज सेन्सेक्स तब्बल १,०६२.२२ अंश घसरून ७३ हजारांच्या खाली गेला. तर ३४५ अंश घसरलेला निफ्टी देखील बावीस हजार या मानसशास्त्रीय महत्त्वाच्या पातळीखाली आला. निर्देशांकांमधील ही सलग पाचवी घसरण आहे.
आज शेअर बाजारांची सुरुवातच घसरणीने झाली आणि दिवसभर शेअर बाजार घसरतच राहिला, आज सेन्सेक्स व निफ्टीला फारसा नफा दाखवला नाही. आज सकाळी सेन्सेक्स ७३ हजार ५०० च्या आसपास उघडला होता. तर दिवसभरात त्याने एक हजार अंशांची घसरण दाखवली. दिवसअखेर सेन्सेक्स ७२,४०४.१७ अंशांवर तर निफ्टी २१,९५७.५० अंशांवर स्थिरावला.
आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक दोन ते तीन टक्के घसरले. तर ऑइल अँड गॅस, धातूनिर्मिती कंपन्या, बांधकाम व्यवसाय, औषध निर्मिती कंपन्या, वित्तसंस्था ही क्षेत्रे दोन ते तीन टक्के घसरली. फक्त वाहननिर्मिती क्षेत्र एक टक्का वाढले. गेल्या पाच दिवसात मिळून दोन्ही निर्देशांक साडेतीन टक्के घसरले आहेत. तर आता बाजार नफ्यात जाण्यासाठी फारशा महत्त्वाच्या घटना समोर नसल्यामुळे असेच चढ-उतार होतील, असे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेसच्या सिद्धार्थ खेमका यांनी दाखवून दिले.
कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्यामुळेही गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता होती. त्यातच परदेशी वित्तसंस्थांची सातत्याने विक्री सुरू असल्यामुळेही बाजाराच्या घसरणीला हातभार लागला. आठ मे रोजी परदेशी वित्तसंस्थांनी ६,६६९ कोटी रुपयांचे शेअर विकले, असेही तज्ञांनी दाखवून दिले. आज केवळ ८६५ शेअरचे भाव वाढले तर २,३९४ शेअरचे भाव कमी झाले. १०२ शेअरचे भाव कालच्याएवढेच राहिले.
आज सेन्सेक्सच्या तीस प्रमुख शेअर पैकी फक्त पाच शेअरचे भाव वाढले होते. तर निफ्टी वर फक्त सात शेअरचे भाव वाढले. बी.एस.ई. वर टाटा मोटर, महिंद्र आणि महिंद्र, स्टेट बँक, इन्फोसिस, एचसीएल टेक या शेअरचे भाव एक ते दोन टक्का वाढले. तर निफ्टी मध्ये त्या व्यतिरिक्त हिरो मोटर, बजाज ऑटो, मारुती या शेअरचे भाव वाढले.
बीएसईवर लार्सन अँड टूब्रो सहा टक्के, एशियन पेंट पाच टक्के, जेएसडब्ल्यू स्टील आणि आयटीसी चार टक्के घसरले. इंडसइंड बँक, बजाज फायनान्स एनटीपीसी तीन टक्के, बजाज फिन्सर्व्ह, टाटा स्टील अडीच टक्के तर एचडीएफसी बँक, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो या शेअरचे भाव पावणेदोन टक्क्यांच्या आसपास घसरले.
''कंपन्यांनी निकालांमध्ये फारशी उत्साहवर्धक कामगिरी दाखवली नाही, तसेच निवडणूक निकालांच्या अनिश्चिततेमुळेही बाजारात सावधगिरी आहे. येणारे सरकार हे फारसे अनुकूल नसेल अशा भीतीमुळे आज घसरण झाली. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार कुंपणावर बसून आहेत. अशा स्थितीत येथे काही दिवस तरी हाच कल कायम राहील. अमेरिकी चलनवाढीच्या भीतीमुळे जागतिक गुंतवणूकदारही सावध आहेत.''
विनोद नायर, जिओजिट फायनान्शिअल सर्विसेस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.