कार्यक्षम अन्‌ शिस्तप्रिय sakal
संपादकीय

कार्यक्षम अन्‌ शिस्तप्रिय

महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या तब्बल ७५ वर्षांनंतर मुख्य सचिवपदी एका महिलेची सुजाता सौनिक यांची वर्णी लागली. मुख्य सचिवाच्या स्वागताला सचिवालयात कायम सुटाबुटात हजर असणाऱ्या बाप्यांची जागा काल साडीतल्या बायांनी घेतली होती.

- मृणालिनी नानिवडेकर

महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या तब्बल ७५ वर्षांनंतर मुख्य सचिवपदी एका महिलेची सुजाता सौनिक यांची वर्णी लागली. मुख्य सचिवाच्या स्वागताला सचिवालयात कायम सुटाबुटात हजर असणाऱ्या बाप्यांची जागा काल साडीतल्या बायांनी घेतली होती. पहिल्या रांगेत ‘त्या’ होत्या, ‘ते’ मागच्या रांगेत उभे होते ! महिला अधिकाऱ्यांचे चेहरे प्रफुल्लित तर होतेच; पण कर्तृत्वाने चेहऱ्यावर झळकणाऱ्या आत्मविश्वासाला अखेर संधीचे बळ मिळाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यामागचे कारणही तसेच होते. आजवर चंद्रा अय्यंगार, चित्कला झुत्शी आणि मेधा गाडगीळ यांची सेवाज्येष्ठता डावलून त्यांना मुख्य सचिवपदाची हक्काची संधी नाकारली गेली होती. सुजाता यांनाही सेवाज्येष्ठता असून दोनदा डावलले गेले. महिलांना वारंवार मिळणाऱ्या नकाराच्या प्रथेला काल ब्रेक मिळाला, ही आनंदाची बाब. अवतीभवतीच्या सर्व नजरांचे कौतुक स्वीकारत सुजाता सौनिक यांनी ‘‘आजवर ज्या ज्या महिलांना हे पद मिळू शकले नाही, त्यांचे मला स्मरण आहे,’’ असे नमूद करीत पदभार स्वीकारला.

शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या सुजाता सौनिक खरे तर बोलायला दिलखुलास. टापटीप आणि प्रत्येक कामावर स्वत:ची देखणी मोहोर उमटवणाऱ्या. त्या १९८७ च्या तुकडीत आयएएस झाल्या. त्यांच्या सहाध्यायी राजस्थान, उत्तराखंड, पंजाब अशा राज्यांच्या मुख्य कारभारी झाल्या आहेत. मनुकुमार श्रीवास्तव मुख्य सचिव पदावरुन निवृत्त झाले, तेव्हाच सुजाता सर्वात ज्येष्ठ होत्या. पण मुख्य होण्याचा मान मिळाला तो त्यांचे पती मनोज सौनिक यांना. खरे तर आयएएस लहान वयात उत्तीर्ण केल्याने त्या पतीपेक्षा नोकरीत ज्येष्ठ. मनोज यांचा अनुभव दांडगा. पण परस्परांत कोणताही अभिमानपट न घडता रिवाज-परंपरेने पती पुढे गेले.

काही वर्षांपूर्वी अर्थसचिव निवडायचा होता, तेव्हाही राज्यकर्त्यांसमोर पती की पत्नी असा पेच होता. त्यावेळी अमेरिकेत असलेल्या सौनिक दाम्पत्याच्या मुलाने आईला कामासाठी तिकडे बोलावल्याने पेच आपोआप सुटला होता! नंतर मुख्य सचिवपदाची संधी हुकली, तरी त्या शांत होत्या. पुढच्या काळात मनोज सौनिक मुख्यमंत्र्यांचे सल्लागार झाले अन् त्या कारणामुळे निवडणूक काळात त्यांच्या पत्नीला पदापासून दूर रहावे लागले. नितीन करीर मुख्य सचिव झाले. ते उत्तम अधिकारी. त्यांना आचारसंहितेमुळे मिळालेली मुदतवाढ संपली आणि शिंदे- फडणवीस यांनी अखेर सुजाता सौनिक यांना न्याय दिला. सौनिक यांना जवळपास एक वर्षाचा काळ मिळेल. या अल्पावधीतही सरकारी यंत्रणेला मानवी चेहरा देण्याचे काम त्या करु शकतील, असे वाटते. आघाडी- युतीची राजकीय रचना नोकरशाहीसमोर आव्हानात्मक परिस्थिती उभी करतात. त्यातून पुढे जात प्रगतीची चाके वेगाने फिरवायची आहेत. महिला अधिकारपदावर पोहोचत असल्या तरी एक छुपी भिंत त्यांच्याआड उभी आहेच. ती फोडून धडाडीने काम करण्याचे आव्हान मोठे आहे.

केंद्र सरकारमध्ये जेमतेम १२ टक्के महिला सचिवपदापर्यंत पोहोचल्या आहेत. अशा वेळी सुजाता यांना आपले कर्तृत्व सिद्ध करायचे आहे. चीमा हे सुजाता यांचे माहेरचे घराणे नागरी सेवेत आहे. त्यांचे वडील सी.डी. चीमा पंजाबात सनदी अधिकारी होते. ते नंतर निवडणूकआयुक्त झाले. सुजाता यांच्या आईचे वडील कर्तारसिंह हे केंद्रात सचिव होते. आता तिसऱ्या पिढीची प्रतिनिधी सर्वोच्चपदावर आहे. औरंगाबादेत नोकरीला प्रारंभ करीत केंद्र सरकारची विविध पदे, परदेशी नियुक्ती असे अनुभव त्यांनी घेतले. सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, गृहसचिव असा त्यांचा सध्याचा अनुभव. सुजाता सौनिक या त्यांना उशीरा का होईना; पण मिळालेल्या संधीचा कसा उपयोग करतील ते पाहायचे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT