Sarkarwada Sakal
संपादकीय

राज आणि नीती : शिवदृष्टी ते शिवसृष्टी!

अलिकडेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची 99 वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण केले.

विनय सहस्रबुद्धे

रसाळ वाणी, चित्रदर्शी कथनाने शिवचरित्र उभे करणाऱ्या शिवशाहिरांनी सूत्रसृष्टीचा वापर करून ‘शिवसृष्टी’चा प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्याद्वारे नव्या पिढीला आपला उज्ज्वल इतिहास समजायला मोठी मदत होणार आहे.

अलिकडेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची 99 वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने काही निवडक उपक्रम झाले आणि शिवशाहिरांनी जी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प सोडला आहे, त्या शिवसृष्टीच्या अंतर्गत असलेल्या सरकारवाड्यातच एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे अतिशय आपुलकीने आणि आदराने अभिष्टचिंतनही केले गेले. लोकसभेच्या माजी सभापती श्रीमती सुमित्रा महाजन या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या अभिष्टचिंतनाप्रित्यर्थ खास संदेशही पाठविले होते. शिवशाहिरांनी इतिहास कथनात रंजकता आणण्यासाठी कधीही वस्तुनिष्ठता आणि वास्तविकता यांच्याशी तडजोड केली नाही, हे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. शिवाय, शिवचरित्र घराघरात पोचविण्यात शिवशाहिरांचे योगदान सर्वात मोठे आहे, याचाही उल्लेख पंतप्रधानांच्या संदेशात स्वाभाविकपणे होता.

सांप्रतच्या वातावरणात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस राजकारणाचा विषय न बनता, तरच नवल. असे असूनही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील अन्य पक्षांना काय वाटेल? त्याचा विचार न करता मुख्यमंत्र्यांनी अतिशय मनःपूर्वकतेने शुभेच्छा संदेश पाठविला हेही उल्लेखनीयच! आणखी उल्लेखनीय म्हणजे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही या प्रकल्पाबद्दल आणि शिवशाहिरांच्या शिवचरित्र कथनाबद्दल एकेकाळी आक्षेप घेतले होते. आज आक्षेप घेणारे ते नेतेही भारतीय जनता पक्षात आहेत आणि त्या पक्षाचा सहभाग असलेल्या सरकारचे प्रमुखही शिवशाहिरांबद्दलचा आदर निःसंकोचपणे व्यक्त करीत आहेत.

रसाळ वाणी, चित्रदर्शी कथन

लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला आणि त्याच परंपरेतून पुढे आलेल्या बाबासाहेबांनी शिवचरित्र ऐकणे, समजून घेणे याचाच उत्सव घडवून आणला. सलग आठ-आठ दिवस बाबासाहेब आपल्या रसाळ वाणीने, चित्रदर्शी कथन शैलीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रमी आणि कर्तृत्वसंपन्न जीवन श्रोत्यांपुढे प्रभावीपणे उभे करीत आणि लोक तिकिटे काढून त्यांची भाषणे ऐकायला जात हे आजच्या पिढीला कदाचित ठाऊकही नसेल. अशा शतकवीर बाबासाहेबांनी काही वर्षांपूर्वी सुमारे 300 कोटी रुपये खर्चाच्या ‘शिवसृष्टी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आणि आपल्या तरूण सहकाऱ्यांच्या मदतीने त्यातला पहिला टप्पा पूर्णत्वासही नेला.

हा प्रकल्प पूर्ण होण्यातून शिवशाहीरांचा संकल्प तर सिद्धीस जाईलच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या प्रस्तुतीकरण प्रधानतेच्या जमान्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक कार्याचे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे मनोज्ञ दर्शन नव्या पिढ्यांना नव्या तंत्रज्ञानासह घेण्याची संधी उपलब्ध होईल. इतिहासाचे भान हा कोणत्याही समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक अस्मितेचा महत्त्वाचा घटक असतो. हे भान राखण्यासाठी इतिहास संशोधन जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच इतिहास कथनही! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे काम आता व्याख्यानमालेच्या माध्यमाच्या खूप पुढे जाऊन, कालसुसंगत अशा सूत्र-सृष्टीच्या (थीम पार्क) माध्यमातून करीत आहेत. यापुढच्या अनेक पिढ्या ही शिवसृष्टी पूर्णत्वाने साकारली गेल्यानंतर शिवशाहिरांना खचितच धन्यवाद देत राहतील. त्यासाठीच समस्त शिवप्रेमींनी शिवसृष्टी प्रकल्पाच्या मागे आपली ताकद उभी करून हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यास मदत केली पाहिजे.

जाज्ज्वल्य देशभक्ती

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे कधीच नुसते वाचीवीर म्हणून ओळखले गेले नाहीत. ‘जाणता राजा’ या महानाट्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन महाराष्ट्राच्या बाहेरही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची जाण प्रभावीपणे निर्माण केली. व्याख्यानमाला, ‘जाणता राजा’सारखे महानाट्य आणि अलिकडच्या काळात ‘शिवसृष्टी’’ ही क्रमाक्रमाने पुढे आलेली शिवशाहिरांची सृजन संपदा त्यांच्याकडे असलेले कालसुसंगत माध्यमे निवडण्याचे भान ठळकपणे पुढे आणते. पण या सृजनाच्या मागे त्यांची आपला समाज आणि देशाप्रती असलेली बांधिलकीच त्यांच्या दादरा-नगर हवेली मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेण्यासाठीची प्रेरणा ठरली. त्यामुळेच बाबासाहेबांकडून शिवचरित्र ऐकताना चरित्र सांगणाऱ्याची जाज्ज्वल्य देशभक्ती मनावर ठसते व शिवछत्रपतींपासून प्रेरणा घेणाऱ्यांचा परीघ निरंतर विकसित होत जातो.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना आणि 14 ऑगस्ट हा फाळणीच्या वेदनेचा स्मृतीदिन म्हणून पाळला जाण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली असताना, शिवशाहिरांचे अभिष्टचिंतन आणखीनच महत्त्वाचे ठरते. फाळणीच्या वेदनांचे स्मरण हे राष्ट्रीय एकात्मतेच्या सार्वकालिक महत्त्वाचेही स्मरण ठरते. भारतीय राष्ट्रवाद हा मूलतः सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे; कारण या देशाच्या ऐक्‍याचा पाया इथल्या संस्कृतीत आणि ही संस्कृती ज्या पायावर उभी आहे त्या भावनिक एकात्मतेत आहे. ही भावनिक एकात्मता संकुचित राजकारणासाठी फासावर लटकविली जाते. त्यातूनच समाजाच्या विघटनाला खतपाणी मिळते. तसे ते मिळू द्यायचे नसेल तर फाळणीचा इतिहास सदैव लक्षात घ्यावा लागेल. भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणजे इथली आध्यात्मिक लोकशाही!

इथल्या लोकतांत्रिक अध्यात्म दृष्टीत ‘‘आमचाच मार्ग तुम्हाला मोक्षाप्रत पोहोचवू शकेल आणि अन्य मार्ग हे अवैध आहेत,’ अशी एकारलेपणाची, एकाधिकारवादाची भूमिका कधीच नव्हती. ‘एकम्‌सत, विप्रा बहुदा वदंती’ हे भारतीय आध्यात्मिक लोकशाहीचे मूल-वाक्‍य राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेतही हीच आध्यात्मिक लोकतांत्रिक भूमिका होती. या भूमिकेला सोडचिठ्ठी देऊन पुढे आलेल्या आध्यात्मिक एकाधिकारवाद्यांना आपण परास्त करू शकलो नाही आणि त्यातूनच फाळणीची नामुष्की ओढवली. फाळणीच्या वेदनेचे स्मरण करायचे ते आपल्यासमोर आजही उपस्थित असलेल्या या आव्हानाचे लख्‍ख भान राहावे, यासाठी!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विविधांगी कर्तृत्व समाजाला समजावून सांगण्याचे ऐतिहासिक काम केले. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाइतकेच एक शासक, प्रशासक या नात्याने त्यांनी केलेले काम कसे लाखमोलाचे आहे, तेही शिवशाहिरांनी तपशिलात जाऊन सांगितले. त्यांच्या ‘हिंदवी स्वराज्याच्या’ संकल्पनेत सुशासन, विकास, सामाजिक न्याय आणि अर्थातच अध्यात्मिक लोकशाहीचाही अंतर्भाव होता. ही समग्र ‘शिव-दृष्टी’ समाजाला देऊन महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांच्या मन-बुद्धीची मशागत करण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अथकपणे केले. ही ‘शिव-दृष्टी’ देणाऱ्या अलीकडच्या काळातील प्रबोधन पर्वाच्या या महानायकाविषयीची कृतज्ञता म्हणून ‘शिव-सृष्टी’ साकारण्यासाठी शिवप्रेमींनी योगदान द्यायलाच हवे. खऱ्याखुऱ्या समाज शिक्षकाला ती गुरूदक्षिणा ठरेल!

vinays57@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT