sanpadkiy 
संपादकीय

संकटकाळात ‘आम्ही एकशे पाच’

सकाळ डिजिटल टीम

जोपर्यंत सर्व समाज एकत्र येत नाही, तोपर्यंत करोनाविरुद्धची लढाई संपणार नाही. मात्र असा एकोपा सध्याच्या परिस्थितीत कुठे दिसत नाही. ना राजकीय पातळीवर, ना सामाजिक पातळीवर. संकटातून बाहेर यायचे असेल तर केवळ सरकारकडे पाहात बसून भागणार नाही. प्रबोधनाची आणि प्रत्यक्ष कामाची लोकचळवळ आकाराला यायला हवी. महाराष्ट्रातील अनेक रूढी परंपरांमधील एक विशेष बाब म्हणजे शत्रुत्व हे लग्नात, मरणात, संकटात ठेवावयाचे नसते. शत्रुच्या घरच्या लग्नातपण सहभागी व्हावयाचे असते. एरवी शत्रुत्व राहिले तर निःसंकोचपणे लढायचे, हा नियम. सध्या हिंदुत्वाचा अभिमान सांगणारे देशात सत्तेवर आहेत. यातील किती लोकांनी हिंदु धर्मात काय सांगितले आहे, हे तपासले आहे का? महाभारतातील एक कथा आठवते. दुर्योधनाला चित्रसेन गंधर्वाने युद्धात हरवून कैद केले. ही गोष्ट पांडवांना समजल्याबरोबर भीम व अर्जुन यांना आनंद झाला. पण युधिष्ठिर म्हणाला, जेव्हा आपापसात लढाई होईल, तेव्हा आपण ‘पाच विरुद्ध शंभर’ असू. पण बाहेरील शक्तीविरुद्ध आपल्या भावंडांचा वाद झाला तर ‘आम्ही एकशेपाच’ ही भूमिका असेल. म्हणजेच ‘वयं पंचाधिकम् शतम्’.
सध्या राजकीय पक्षांमध्ये कोरोनाचा प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येण्याऐवजी साठमारी सुरू आहे. मार्च २०२०मध्ये जगाच्या इतिहासात कधीही न घडलेली, ‘न भूतो न भविष्यती’ अशी कोरोनाची महासाथ आली आहे. तिचा सामना करताना जगातल्या शक्तिशाली देशांना गुडघे टेकवावे लागले. प्रगतीशील देशांतही  रुग्णालये अपुरी पडली.  वैद्यकीय सेवा देताना हजारो लोक मृत्युमुखी पडले. नुकसान किती लाख कोटींचे झाले,याचा हिशोब नाही. पोलिसांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी, डॉक्टरांनी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता लढाई लढवली. पण या लढाईत राजकीय पक्ष एकमेकांच्या खांद्याला खांदा देवून लढावयाच्या ऐवजी समोरासमोर शड्डू ठोकून उभे राहिले. उद्योगपतींना, व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य माणसांना लॉकडाऊन नको आहे. या बिकट प्रसंगात सर्व जगात दुसरी लाट आली. तिसऱ्या लाटेची शक्यता दिसत असताना आपल्याच समाजातील सुशिक्षितांचे वागणेदेखील कसे होते? काही प्रसंग पाहूया. जयेश हा एक उद्योगपती. पत्नी फिटनेस तज्ज्ञ. कारण नसताना बाहेर पडले आणि कोरोनाचा प्रसाद घेवून परतले. घरातल्या नोकरांनाही संसर्ग झाला. जयेशची ऑक्सिजनची पातळी खाली जाऊ लागली. शनिवार, रविवारी २० किमी सायकल चालवणारा जयेश व त्यांचे कुटुंबीय दवाखान्यात जागा मिळेना म्हणून तडफडत राहिले. नशिबाने साथ दिली म्हणून वाचले. केतन आय.टी. क्षेत्रात महत्त्वाचे काम करणारा तरुण. कोरोना पॉझिटिव्ह आहे, हे माहीत असूनही प्रकृती दाखविण्यास डॉक्टरांकडे गेला. दोष कोणाला द्यायचा? बोलावणाऱ्या डॉक्टरला का या रुग्णाला? उच्चशिक्षित मुलांचा एक गट. त्यातील दोघांना कोरोना आहे किंवा लक्षणे आहेत, हे माहिती असताना मित्रमैत्रिणींना भेटले आणि त्यांना कोरोनाची भेट दिली. अशी यादी खूप मोठी आहे. घोड्यावरून लग्नाची वरात काढणाऱ्यांना, शेकडोंनी जेवायला बोलावणाऱ्यांना आणि अंत्यसंस्कारासाठी गर्दी करणाऱ्या लोकांना संकटाचे गांभीर्य समजत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काय करावे, अशी अपेक्षा आहे?  टाळेबंदी हे उत्तर नाही, हे मान्य. पण समाजामध्ये वर नमूद केल्याप्रमाणे सुशिक्षित लोक वागत असतील तर ज्यांना काहीच माहिती नाही, ते काय करत असतील? लस देण्यावरून राजकारण, लस देणे-घेणे याबद्दल प्रचार-अपप्रचार. देशाचा इतिहास बघितला तर जेव्हाजेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष एकत्र आले. बांगला देशासाठी झालेल्या युद्धाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधानांनी विरोधी पक्षाला विश्वासात घेतले होते. या संकटाच्यावेळी मात्र आता सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोधासाठी विरोध म्हणून रस्त्यावर येण्याची भाषा केली जात आहे. कोरोना नियंत्रणात कसा आणायचा याची चर्चा विरोधी पक्ष का करत नाही? 
रस्त्यावर आय.टी. कंपनीतील अभियंते झालेली मुलंमुली घोळक्याने फिरताना दिसतात. अनेकांच्या तोंडावर मास्क नसतो. औषध दुकानदार मास्क न घालता औषधे देतो. काही जण तर एकटे काम करताना मास्क घालून काम करतात आणि सहकाऱ्यांशी बोलताना तो बाजूला करतात. म्हणजे ज्यावेळी त्याची सर्वाधिक आवश्यकता असते, त्याचवेळी तो बाजूला केलेला असतो. न्यायालयात अनेक वकील मास्क न घालता फिरतात. ही जर सुस्थित वर्गाची स्थिती असेल तर रस्त्यावर वस्तू विकून रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करणाऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? जोपर्यंत सर्व समाज एकत्र येत नाही, तोपर्यंत करोनाविरुद्धची लढाई संपणार नाही. वारंवार ट्विट करणाऱ्या, क्रिकेट खेळाडूंना गाड्या देणाऱ्या उद्योगपतींना समाजात जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न करावयाची गरज का भासू नये? त्यांनी सक्रिय सहभाग घ्यायला हवा. सर्वत्र जाहिरात करणाऱ्या कंपन्यांनी नागरिकांनी काय करणे आवश्यक आहे, याचाही प्रचार करून या कार्यात वाटा उचलावा.कोणी किती रुग्णालये उभी केली आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा बनायला हवा. 
मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टसिंग पाळा, या त्रिसूत्रीचा जागर करणारी लोकचळवळ उभी राहायला हवी. अनावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका,असा प्रचाराचा धडाका लावला व घडलेल्या उदाहरणांची समाजाला जाणीव करून दिली तर कोरोना नियंत्रणात येईल. लस घेतल्याचे फोटो दाखवण्यापेक्षा नुकसान झालेल्या दुकानदारांना सहकार्य करणे, उपाहारगृहचालकांना मदत करणे, व्यावसायिकांना मदत करणे, अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. 
सरकार चालविण्यासाठी पैसे कुठून येणार,कसे येणार याची इत्थंभूत माहिती असूनही पूर्वी सत्तेत असलेला विरोधी पक्ष विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरतो. कोरोनाविरुद्ध एकत्र लढण्याऐवजी काही पक्षाचे लोक सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरताहेत. ‘न्यायाधीशांना व वकिलांना ताबडतोब लस द्यावी’, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलेले विचार महत्त्वाचे आहेत. त्यांनी सांगितले, की माझी भूमिका जहाजाच्या कप्तानासारखी आहे व जहाजाचा कप्तान वादळाच्या प्रसंगी जहाज सोडत नाही. तो जहाजाबरोबर मृत्यूला सामोरे जाणे पसंत करतो. आत्ताच्या या कठीण काळात सर्वांनी खांद्याला खांदा लावून लढाई लढण्याशिवाय पर्याय नाही. सर्वांना ही सुबुद्धी येवो.
(लेखक मुंबई उच्च न्यायालयात  ऍडव्होकेट आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT