नअस्कार! आनंदातिरेकानं एखादं लोकनृत्य करावं अशी ऊर्मी मनात दाटून येत आहे. लोकनृत्य याचा अर्थ ते समूहात लोकगीतावर करतात ते ! ‘होऊन जाऊ दे लोकनृत्य फर्मास!’ अशी फर्माईश काही चहाटळ लोकांनी आगाऊपणानं करू नये, म्हणून आधीच खुलासा केला. लावणी हेदेखील लोकनृत्यच आहे, हे मला ठाऊक आहे. चावट मेले!!
मी अगदीच बेसावध असताना अचानक ती आनंदाची बातमी येऊन थडकली. फेब्रुवारीत दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. ताराबाई भवाळकर यांची सन्मानपूर्वक निवड झाली, त्याबद्दल त्यांचं मन:पूर्वक अभिनंदन. साहित्य महामंडळाचंही जोरात अभिनंदन.
दिल्लीत होणाऱ्या मराठी नावाच्या अभिजात भाषेच्या साहित्य संमेलनात डॉ. ताराबाईंना हा सन्मान मिळावा, हा अपूर्व योग आहे. या ऐतिहासिक संमेलनाचा अध्यक्ष राजधानी दिल्लीच्या तोलामोलाचा असावा, अशी आणखी एक अट येऊन पडली होती. संमेलनाचे संयोजक संजय नहार यांनीही मनावर घेतलं. आणखी एक अट अशासाठी म्हटलं, की संमेलनाध्यक्ष तंदुरुस्त, धष्टपुष्ट आणि आरोग्यवान असावा, अशा कडक अटी आमच्या ठालेपाटील यांनी आधीच घालून ठेवल्या होत्या.
उतारवयात डॉ. ताराबाईंना हा सन्मान मिळाला हेही नसे थोडके. अजूनही त्या ठालेपाटलांच्या अटींमध्ये बसतात आणि संजयजी नहारांची नवी अटही पुरी करतात. सत्तर वर्षांपूर्वी दिल्लीत संमेलन झालं होतं, तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अध्यक्ष होते. तेव्हा त्यांचं वय अवघं ५३ होतं. डॉ. ताराबाईंच्या समोर लोकसाहित्य किंवा स्त्रीवादाचा काही विषय काढा, बाई अगदी तरुणाला लाजवेल, असा उत्साह दाखवतात. अगदी नुकतंच त्यांचं ‘सीतायन’ हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.
…पण संमेलन दिल्लीत आहे, आणि तेही फेब्रुवारीत. तेव्हा उत्तरेत थंडी असते. तो गारठा डॉ. ताराबाईंना झेपेल का, असा एक तद्दन असाहित्यिक प्रश्न अध्यक्षनिवडीच्या बैठकीत कुणीतरी उपस्थित केला. असा वयाचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल डॉ. उषा तांबे यांनी संबंधित अत्यंत तरुण व्यक्तीला जागेवरच गप्प केलंन, अशी बातमी बाहेर फुटली आहे. खरी खोटी देव जाणे.
काही महाभागांनी डॉ. ताराबाईंकडून मेडिकल सर्टिफिकेट मागावं, किंवा सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वैद्यक प्रमाणपत्र आणायला सांगावं, अशीही सूचना काही जणांनी मांडली म्हणे. पण प्रचंड गदारोळात ही मागणीही खोट्या सर्टिफिकेटाप्रमाणे फाडून टाकण्यात आली. काहीही असलं तरी डॉ. ताराबाईंना बहुतेकांचा पाठिंबा होता. बहुतेक म्हणजे, मसाप, पुणे, मराठवाडा आणि बृहन्मुंबईवाले.
एवढे तीन घटक ‘बहुतेकां’मध्ये येतात. बाकीच्यांनी ‘पानिपत’कार विश्वासराऊ पाटील यांच्यासाठी जबर झुंज दिली, परंतु, पुण्यातील काही गारद्यांनी त्यांचा गेम केला, अशीही अफवा (पुण्यात) पसरली आहे. खरेतर विश्वासराऊंनी साहित्यिक मेंबरांचे विश्वासमत ऑलमोस्ट जिंकले होते, पण पुण्यातल्या एका व्यक्तीने (वेळीच सावध होत) त्यांना अध्यक्षपदाच्या कड्याला घोरपडच लावू दिली नाही, असं कळतं.
सगळ्या सांगोवांगीच्या गोष्टी. विश्वासराऊ अध्यक्ष झाले असते, तरी मला आनंद झालाच असता. एवढ्या दणादण आणि बेस्ट सेलर कादंबऱ्या लिहिणारा बिनीचा शिलेदार अभिजात मराठीत आहे तरी कवण?
मी विश्वासराऊंना डब्बल शुभेच्छा देत्ये. पुढलं ९९ वं संमेलन शतकमहोत्सवाच्या प्रारंभाचं होणार आहे. त्या सेंच्युरीला लाष्ट बॉलवर सिक्सर मारण्याचा वर त्यांनी महामंडळाकडून आत्ताच मागून घ्यावा. पाहिजे तर तीन वर मागून घ्यावेत. एक अध्यक्षपदाचा, दुसरा तंदुरुस्तीच्या प्रमाणपत्राचा आणि तिसरा, ऐनवेळी काहीही मागण्याचा!! सध्या डॉ. ताराबाईंचं लोकसाहित्य जिंकलं असलं, तरी पुढल्या खेपेला नक्की कादंबरी जिंकेल!!
सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.