donald trump sakal
संपादकीय

भाष्य : प्रतिमानिर्मिती आणि दांभिकतेचा अमेरिकी ‘अर्थ’

अमेरिकेतील न्यायालयाने माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या आठवड्यात आर्थिक गुन्ह्यांत दोषी ठरवले. शिक्षेची सुनावणी पुढील महिन्यात होणार असून, ट्रम्प यांना अटक व्हायची शक्यता आहे.

निखिल श्रावगे

अमेरिकेतील न्यायालयाने माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या आठवड्यात आर्थिक गुन्ह्यांत दोषी ठरवले. शिक्षेची सुनावणी पुढील महिन्यात होणार असून, ट्रम्प यांना अटक व्हायची शक्यता आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित आहे. ट्रम्प यांच्या या प्रकरणाचे परिणाम, त्यांचे निवडणुकीतील भवितव्य आणि एकंदर दांभिकपणा यांच्याबाबत ऊहापोह.

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील न्यायालयाने माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आर्थिक गुन्ह्यांत दोषी ठरवले. या प्रकरणाच्या शिक्षेची सुनावणी पुढील महिन्यात होणार असून, ट्रम्प यांना अटक व्हायची शक्यता आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होत असून ट्रम्प यांना त्यांच्या रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित आहे. या प्रकरणातील दोषारोप आणि शिक्षेनंतर ट्रम्प यांना निवडणूक लढवणे शक्य आहे का आणि त्यांनी ती लढवल्यास त्याचे काय परिणाम होणार हे समजणे आवश्यक आहे.

अमेरिकेतली अध्यक्षपदाची निवडणूक ही प्रतिभेपेक्षा प्रतिमाकेंद्रित असते. उमेदवाराचे एखाद्या विषयाचे आकलन, धोरण, अभ्यास, आश्वासन यांपेक्षा उमेदवार कसे पाठांतर केलेली वाक्ये, चटपटीतपणे बोलतात यांवर मतदार आकर्षित होत आले आहेत.

उमेदवारांचा पोशाख, बोलायची लकब, प्रचारादरम्यान समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी त्यांनी साधलेला काही मिनिटांचा संवाद यांवर भर देत उमेदवार आपली सर्वसमावेशकता जनतेच्या मनावर ठासवायचा प्रयत्न करतात. सगळा मामलाच प्रतिमानिर्मितीचा असल्यामुळे स्वतःचे व्यक्तिमत्त्व जपताना विरोधी उमेदवाराचे वाभाडे काढायची एकही संधी सोडली जात नाही.

त्या प्रयत्नांत सुरू केलेली राजकीय टिपण्णी हमखास वैयक्तिक आयुष्यात जाऊन पोहोचते. एक असाच वैयक्तिक विषय झाकायच्या नादात ट्रम्प यांना दोषी ठरवले गेले आहे. ट्रम्प यांनी सन २००६ मध्ये काही काळासाठी एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले. सन २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय प्रचाराच्या चव्हाट्यावर येऊ नये म्हणून ट्रम्प यांनी आपल्या वकिलाकरवी त्या महिलेला वाच्यता न करण्यासाठी पैसे दिले.

त्यांची ही कृती बेकायदा नसली, तरी पैशांची जावक त्यांनी कागदोपत्री व्यावसायिक कामांसाठी खर्च झाल्याचे दाखवली. आर्थिक व्यवहारातील हा आडमार्ग बेकायदा ठरल्यामुळे ट्रम्प यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. या गुन्ह्यासाठी दंड, चार वर्षांचा कारावास अथवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे.

ता. ११ जुलैला शिक्षेची घोषणा होऊन ट्रम्प यांना कारागृहात जावे लागले, तरीही ते निवडणूक लढवू शकतात. गुन्हा सिद्ध झाल्यास निवडणुकीची पात्रता रद्द होण्याचा निकष अमेरिकेत नसल्यामुळे ट्रम्प यांची अडचण होणार नाही. उलटपक्षी, गुन्हा सिद्ध झाल्यांनतर ट्रम्प यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत न्यायालय आणि बायडेन प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.

ट्रम्प यांच्या प्रचारयंत्रणेने तातडी दाखवत, लोकभावनेला हात घालून, समर्थकांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत पाठीराख्यांनी तब्बल पाच कोटी डॉलरचा मदतनिधी एका रात्रीत ट्रम्प यांच्या झोळीत ओतला आहे. देणगीचा रेटा वाढल्यामुळे संकेतस्थळ बंद पडले. तसेच, या घटनेमुळे ट्रम्प यांची लोकप्रियता वाढल्याचे निरीक्षण काही संस्थांनी केले आहे.

मुळात कर-चोरी अथवा छुप्या मार्गाने पैसे वळवायचा प्रयत्न हा गुन्हा असला, तरी निवडणुकीत एखाद्याची आडकाठी करत प्रतिमाहनन करावी इतकी मोठी रक्कम व्यवहारात असेल, तरच आरोप करण्यात मजा आहे. ट्रम्प यांनी त्या महिलेला दिलेली रक्कम सुमारे सव्वा कोटी रुपये आहे. तेथील निवडणुकीचा बाज आणि एकूण आवाका बघता ही रक्कम नगण्य ठरते.

तसेच, ट्रम्प यांनी केलेला हा प्रकार त्यांची वैयक्तिक भानगड असून त्यांनी कायद्याला वळसा मारताना कुठल्याही सरकारी पदाचा वापर केला नाही. त्यामुळे, ट्रम्प यांचा विरोधी डेमोक्रॅटिक पक्ष आणि अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ सक्रियपणे चालवलेला हा खटला म्हणजे डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढायचा प्रयत्न म्हणावा लागेल.

बिल क्लिंटन यांनी १९९५ ते १९९७ या अध्यक्षपदाच्या कालावधीत थेट ‘व्हाईट हाऊस’मधील आपल्या कार्यालयात एका महिला सहकाऱ्यासोबत अतिप्रसंग केल्याचे जगजाहीर आहे. अमेरिकी संसदेपुढे हे प्रकरण सविस्तरपणे उघड होत, जगभरात देशाची नाचक्की होऊनही क्लिंटन या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडले.

सन २००१ ते २००७ मध्ये अध्यक्ष जॉर्ज डब्लू. बुश यांनी ‘दहशतवादाशी दोन हात’ करण्यासाठी अमेरिकेची सरकारी तिजोरी उघडली. अफगाणिस्तान आणि इराकवर वरवंटा फिरवून अमेरिकी करदात्यांच्या हजारो कोटी डॉलरचा खुर्दा उडवला. हाती काहीही न लागून, अशी कुठलीच शस्त्रे नसल्याची कबुली त्यांना द्यावी लागली. आपापल्या मार्गाने बरे चाललेले दोन देश झोपवूनही बुश कुठेही अडकले नाहीत.

सन २००८ ते २०१५ मध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा घेत, दूरवरच्या देशांत ड्रोनने हल्ला करत लोकांना संपवायचा सपाटा बराक ओबामांनी लावला. इजिप्त, ट्युनिशिया, इराण, लेबनॉन, सीरिया, लीबिया अशा देशांत लोकशाहीचा वसंत फुलवण्याचे पिल्लू सोडून सुरू असलेला कारभार संपुष्टात आणत हे देश भिकेला लावले. लाखो लोक निर्वासित करून त्यांचे तांडे युरोपच्या मार्गाला लावणारे ओबामा कुठेही दोषी म्हणून सापडले नाहीत.

हिलरी क्लिंटन यांनी, परराष्ट्रमंत्री असताना हजारो महत्त्वाचे आणि गोपनीय ई-मेल आपला वैयक्तिक खात्यावर पाठवत राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केला. विद्यमान अध्यक्ष बायडेन यांच्या घोडचुकांची यादी तर बरीच मोठी आहे. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात सोडून काढलेला पळ, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना चिथवत युक्रेनच्या ओंजळीत हजारो कोटी डॉलरची रसद ओतणारे बायडेन यांनी गेली दोन वर्षे रशिया-युक्रेन युद्धाचे कुंड पेटत ठेवले आहे.

जगभरात महागाई, पुरवठा साखळ्यांची झालेली ताटातूट कमी म्हणून की काय ते आता इस्राईल - पॅलेस्टाईन युद्धात इस्राईलच्या बाजूने आपले वजन ओतत निरपराधांचा बळी घेत आहेत. डिक चेनी, डोनाल्ड रम्सफेल्ड ही गेल्या दोन दशकांतील वादग्रस्त नावे आहेत. सांप्रत काळातील सुरू असलेल्या जागतिक अस्थिरतेला हे सगळे बऱ्याच अंशी जबाबदार आहेत.

या सगळ्यांच्या प्रमादापुढे ट्रम्प यांचे प्रकरण फारच शुल्लक ठरते. उलटपक्षी, २०१६ ते २०२० मध्ये आपल्या अध्यक्षीय राजवटीत ट्रम्प यांनी एकही नवे युद्ध सुरू केले नाही. ताळ्यावर आणलेली अर्थव्यवस्था आणि कमी केलेली बेरोजगारी हे त्यांच्या प्रशासनाचे यश म्हणावे लागेल. सन २०२०च्या निवडणुकीत फक्त ५१ टक्के लोकांनी बायडेन यांना मतदान केले. त्यामुळे, अमेरिकेवर ते निर्विवादपणे राज्य करतात हे म्हणणे चुकीचे ठरते.

सर्वसामान्य लोकांचे कष्टित होत चाललेले जीवनमान आणि अनाकर्षक कारभार याचा राग ट्रम्प समर्थक धरून आहेत. ट्रम्प यांच्या विरोधात चालवलेला हा राजकीय खटला त्यांच्या समर्थकांची एकजूट करतोय असे दिसते. तूर्तास मात्र ते राजकीय दांभिकतेचे बळी ठरले आहेत.

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT