Amitabh bachchan sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : मी कचरा करणार नाही...!

कु. सरोज चंदनवाले

नअस्क़ार! मैं अमिताभ बच्चन बोल रहां हू, ‘कौन करेगा कचरा’ से!! माझ्याच कार्यक्रमात मला स्वत:लाच हेल्पलाइनचा अवलंब करावा लागला, त्याची गोष्ट मी सांगणार आहे. तत्पूर्वी मला एक उग्र प्रतिज्ञा घ्यायची आहे, आणि माझ्या मराठी बंधू-भगिनींची (आप आजकल क्या कहते हैं…लाडकी बहीन…है ना, आँय?) माफी मागायची आहे…

महाराष्ट्र हे माझं राज्य आहे, आणि मराठी ही माझी मावशीभाषा आहे. मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की, मी कचरा करणार नाही, मी कुणाचाही कचरा करणार नाही. इतकंच काय, मी बटाट्याच्या काचऱ्याही खाणार नाही. ज्यामध्ये चमच्यातला ‘च’ असेल, ‘चामखिळी’मधला ‘च’ नसेल, अशा कुठल्याही गोष्टीबाबत मी चकार शब्द काढणार नाही.

मी यापुढे सारा कचरा कचऱ्याच्या डब्यातच जमा करीन. ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करीन. सुका कचरा सुकाच ठेवीन. ओला कचरा ओलाच ठेवीन. कचरा ओला करुन (आय मीन ओला कचरा करुन) कुठे जाणार नाही. कचऱ्याची विल्हेवाट लावीन. मुळात ओला कचराच करणार नाही. हे सारं करताना मी चमत्कारातला ‘च’ न वापरता, ‘चावट’मधलाच ‘च’ वापरीन.

‘कचरा रे, कचरा रे…’या फेमस गाण्यावर मी सहकुटुंब नाचलो आहे. पण मी तेव्हाही उच्चार चुकीचाच केला. ‘कचरा रे, कचरा रे’ असं म्हणण्याऐवजी ‘कजरा रे, कजरा रे’ असा उच्चार चुकून (च चमच्यातला) झाला. नंतर माझे मित्र सुदेश भोसले यांनी मला करेक्ट करायचा प्रयत्न केला. पण मी तेव्हा ऐकलं नाही. मराठी लोकही असे! ‘कजरा रे’च्या तालासुरात नाचले. चालायचंच. (च…चमच्यातलाच) आँय!

माझे उच्चार चुकतात म्हणून माझी गाणी सुदेशजींना गावी लागतात, अशी तक्रार तेच करत होते. मला फार संकोचल्यासारखं झालं. त्यात मी मराठीत बोलताना खूप मोठा प्रमाद केला. माझा उच्चार चुकला हो! हां, गलत उच्चारण हो गया हमसे…उच्चारण हो गया गलत…हो गया उच्चारण गलत…आँय!

मध्यंतरी मी एक फिल्म केली होती. त्यात विविध भाषांमध्ये मी एकच वाक्य म्हटलं, मैं कचरा नहीं करुंगा, हुं कचरु ना करु. म कचरो को नी करुला, मैं गंदगी नै फैलावांगा, अशी चौदा भाषात हे एकच वाक्य म्हटलं. त्यात मराठी वाक्याचा मात्र कचरा झाला! ‘कचरा’ म्हणताना मी ‘चामारी’मधला ‘च’ वापरला. पुन्हा एकदा सुदेश भोसले मदतीला आले!! त्यांनी माझं वाक्य व्याकरणदृष्ट्या साफसूफ करुन दिलं. ते स्वच्छ वाक्य दोनशे वेळा लिहून काढायला सांगितलं, आणि तीनशे वेळा म्हणून घेतलं.

मग ती दुसरा व्हिडिओ तयार केला, आणि मराठी लाडके भाऊ आणि लाडकी बहीनची माफी मागितली. ते बघून सुदेशजी भोसलेजी माझ्याच आवाजात गदगदले. म्हणाले, ‘‘अहो, उच्चार चुकल्याचं इतकं काय मनावर घेता? आँय’’ सुदेशजीसुद्धा सवयीनं माझ्यासारखंच ‘आँय’ करतात. कठीण आहे!

मी म्हटलं, ‘नथिंग डुइंग, चूक (च चमच्यातलाच) कबूल करण्यात कसली आलीय लाज? मी क्षमा मागणार, म्हणजे मागणार!’

मी कचरा करणार नाही, मी कचरा करणार नाही, मी कचरा करणार नाही, मी कचरा करणार नाही!! मराठी भाषेचा तर मुळीच करणार नाही. क्षमा!

(केवळ उच्चार चुकल्याबद्दल शहंशाह बच्चनसाहेबांनी समस्त महाराष्ट्राची माफी मागितली. त्यांचा माफीनामा ऐकून मी त्यांच्या ‘जलसा’ बंगल्यावर गेले. तेव्हा त्यांनी हातात वरील लेखी माफीनामाच ठेवला.) मी म्हणाले, ‘‘बच्चनजी, चला, काहीतरीच तुमचं, मराठी भाषेची एवढी काळजी कुणी करतं का?’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच उपमुख्यमंत्री केलं; अजित पवारांचा उल्लेख करत केजरीवालांची मोदींवर टीका

Latest Maharashtra News Live Updates : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्सप्रेसचा शुभारंभ, 800 लाभार्थी अयोध्येला

अब मजा आयेगा ना भिडू! निक्की तांबोळीची बँड वाजवायला घरात आली राखी सावंत; नेटकरी म्हणाले- चला आता...

Coldplay Concert: 'बुक माय शो'च्या सीईओला अटक होणार? कोल्डप्ले कॉन्सर्टचे प्रकरण पडणार महागात

बन्ना शेख बनली रिया बर्डे...'त्या' बांगलादेशी पॉर्न स्टारबद्दल धक्कादायक खुलासा; राज कुंद्राशीही आहे कनेक्शन

SCROLL FOR NEXT