Anna Bhau Sathe sakal
संपादकीय

परिवर्तन चळवळीला बळ देणारा साहित्यिक

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज १०४ वी जयंती. शंभर वर्षे उलटून गेली तरीही आज अण्णा भाऊ जिवंत आहेत, असेच वाटते, याचे कारण त्यांचे साहित्य कालप्रस्तुत आहे.

भीमराव पाटोळे

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज १०४ वी जयंती. त्यानिमित्त माणसाच्या जीवनात येणाऱ्या संघर्षाचा, त्याच्यावरील अन्यायाचा आरसा म्हणता येईल, असे प्रत्ययकारी साहित्य लिहिणाऱ्या अण्णा भाऊंचे वैशिष्ट्य आणि महत्त्व विशद करणारा लेख.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज १०४ वी जयंती. शंभर वर्षे उलटून गेली तरीही आज अण्णा भाऊ जिवंत आहेत, असेच वाटते, याचे कारण त्यांचे साहित्य कालप्रस्तुत आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया नेहमी म्हणत ‘‘लोग मुझे याद करेंगे, मेरे मरने के बाद’. आज अण्णा भाऊंबद्दल हेच घडते आहे. कारण त्यांच्या साहित्यावर शेकडो पीएचडी केल्या गेल्या. त्यांच्या समग्र साहित्याचे विश्‍लेषण सतत केले जात आहे.

अण्णा भाऊंनी विपुल साहित्य निर्माण केले. अनेक कादंबऱ्या, कथा, अनेक पोवाडे असे साहित्य केवळ दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णा भांऊनी लिहिले, हा एक चमत्कारच वाटेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांनी पोवाडा लिहिला व नंतरही अनेक पोवाडे लिहिले. त्यांचे साहित्य म्हणजे माणसाच्या जीवनात येणाऱ्या संघर्षाचा, त्याच्यावरील अन्यायाचा आरसा म्हणावा लागेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याची सनदच मिळवून दिली. अण्णा भाऊंवर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळेच ‘जग बदल घालुनि घाव, मज सांगून गेले भीमराव’ या ओळी खूप काही सांगून जातात.अण्णा भाऊंच्या साहित्याचा मागोवा घेताना महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीचाही मागोवा घ्यावा लागतो. त्यांचे व्यक्तिमत्व मुळातच बंडखोर होते. त्यामुळेच त्यांच्या साहित्यातून दीनदुबळ्यांना लढण्याची प्रेरणा मिळते.

माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांनी लेखन केले. अण्णा भाऊंच्या अनेक कांदबऱ्यांवर मराठी चित्रपटही निघाले, याचे कारण त्यांच्या साहित्यात त्यांनी सामान्य माणसाला नायक म्हणून उभे केले. काळाची हाक ओळखणारे हे साहित्य होते. त्यामुळेच चित्रपटनिर्माते त्याकडे आकर्षित झाले.

‘पॄथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे’, हे त्यांनी धाडसाने सांगितले. जगातील सर्व श्रमिकांना त्यांनी सन्मानित केले आहे. शाहीर म्हणून तर अण्णा भाऊंनी महाराष्ट्रातील जनतेला वेड लावले. याचे कारण त्यांची शाहिरी ही संयुक्त महाराष्ट्र राज्यनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली.

शाहीर अमर शेख, गव्हाणकर व अण्णा भाऊ या तीन शाहिरांनी जर आपल्या शाहिरीने महाराष्ट्र जागृत केला नसता, तर महाराष्ट्र राज्य निर्मिती लवकर झाली नसती, असे महाराष्ट्र राज्य शिल्पकार समाजवादी नेते एसेम जोशी नेहेमी म्हणत. तसे पाहता महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे मोठे अधिष्ठान आहे. कोणत्याही चळवळीला राजकीय-सामाजिक नेतृत्‍व आवश्यक असते,तसेच त्यामागची वैचारिक, सांस्कृतिक पूर्वपीठिका मांडणारे, चळवळीची आवश्यकता प्रतिपादन करणारे साहित्यही आवश्यक असते.

चळवळीची ही आघाडी कमी महत्त्वाची नसते, उलट तीच चळवळीला खरी रसद, ऊर्जा आणि सातत्य पुरवते. त्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण अण्णा भाऊंच्या साहित्याचा विचार करतो, तेव्हा त्याचे महत्त्व ठळकपणे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही. १९६०-७० च्या दशकातील चळवळींचे एकूण वातावरण, त्यावेळची आव्हाने लक्षात घेतली तर हा मुद्दा आणखी स्पष्ट होतो.

साहित्याची खरी ताकद

त्या काळात महाराष्ट्रातील समाजवादी, कम्युनिस्ट, शेकाप, लाल निशाण या पक्षांनी परिवर्तनवादी चळवळीला पाठिंबा देण्याचे काम केले. याच काळात महाराष्ट्रातील तळातल्या वर्गाच्या आयुष्याचे चित्रण अण्णा भाऊ आपल्या साहित्यातून करीत होते. केवळ चित्रण करून थांबत नव्हते, तर परिवर्तनासाठी लढायला ते या माणसांना प्रवृत्त करीत होते.

अनेक जटिल प्रश्न असूनही ही जीवनसन्मुखता कधी त्यांच्या साहित्यातून हरवलेली दिसत नाही. माझ्या मते हे त्यांच्या साहित्याचे एक लोभस वैशिष्ट्य आहे. अण्णा भाऊंचे साहित्य अन्याय-अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणाऱ्यांना प्रेरणा देणारे ठरले. त्याची आज नितांत गरज आहे. किंबहुना ती आज जास्त आहे, याचे कारण असे की राजकीय पक्ष आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ यांची त्यावेळी जी सांधेजोड झालेली होती.

ती सध्याच्या काळात मात्र निसटलेली दिसते. नुसती निसटलेलीच नाही, तर परस्परांना छेद देणाऱ्या घटनांची संख्या वाढली आहे. चळवळ सर्वच बाजूंनी क्षीण होत असल्याच्या या स्थितीत अण्णा भाऊ साठे यांचे ‘जनांचे नायक’ नक्कीच हताश मनांना पुन्हा उभारी देऊ शकतील. खरे तर हीच साहित्याची खरी ताकद असते आणि ती अण्णा भाऊंमध्ये होती.

कर्पुरी ठाकूर यांनी बिहारमध्ये समाज बदलण्याचे प्रत्यक्ष काम केले, तर अण्णा भाऊ यांनी साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम केले, असे मला वाटते. मला दोघांचाही सहवास लाभला हे माझे भाग्य. पण या निमित्ताने एक विचार प्रकर्षाने मनात येतो. तो असा की कर्पुरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा उचित सन्मान केला गेला. अण्णा भाऊंनाही तो सन्मान मिळाला पाहिजे.

मी गेली बरेच वर्षे अण्णा भाऊंना ‘भारतरत्न’ किताब मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे. तसेच महाराष्ट्रासह देशातील अनेक संस्था, प्रतिष्ठित नागरिकांनी तशी मागणी केंद्र सरकारकडे अनेकवेळा केली आहे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण होवो, हीच इच्छा अण्णा भाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते.

(लेखक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT