artificial intelligence sakal
संपादकीय

भाष्य : ‘एआय’बाबतची भीती अनाठायी

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही मानवासाठी कशी घातक आहे, याबाबत सध्या शेकडो लेख लिहिले जात आहेत. ही भीती अनाठायी आहे.

सकाळ वृत्तसेवा

- अनिल राजवंशी

कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास आणि वापर दोन्हीही वाढत असताना मानवापेक्षा ही यंत्रणाच वरचढ ठरू शकेल, माणसाच्या अस्तित्वावरच ती उठेल, अशी भीती व्यक्त होते आहे. तथापि, ती अनाठायी आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही मानवासाठी कशी घातक आहे, याबाबत सध्या शेकडो लेख लिहिले जात आहेत. ही भीती अनाठायी आहे. त्याला तशीच काही भौतिक आणि तात्त्विक कारणेही आहेत. त्याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करूया! ‘एआय’मुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या जातील, ज्यामुळे जागतिक स्तरावर मनुष्यबळाचे गणित कोलमडू शकते, अशी भीती व्यक्त केली जाते.

दुसरी भीती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चुकीची माहिती निर्माण करून प्रसारित करता येऊ शकते. यातून समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वास्तवाच्या आणि आभासी जगाच्या सीमा अत्यंत धूसर होतील. सर्वात महत्त्वाची भीती म्हणजे यातून मानवाप्रमाणे संवेदना असणाऱ्या यंत्रांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही गडबड झाल्यास समस्त मानवजातीला प्रचंड मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

जेव्हा कोणतेही नवीन तंत्रज्ञान येते तेव्हा ते तात्पुरत्या स्वरुपात आणि काही अंशी सुरळीत असणाऱ्या प्रक्रियेमध्ये उलथापालथ घडवून आणते. परंतु काळाच्या ओघात त्यावर पुरेसे काम होऊन संबंधित तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली अस्थिरता दूर होऊन पुन्हा सर्व स्थिरस्थावर होते. नोकऱ्या जाण्याची जी भीती व्यक्त होते त्याबाबतही वरील तत्त्व लागू होणारे आहे.

याउलट कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कोड क्रिएटर या स्वरुपाचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सॉफ्टवेअर तयार करणे आणि ‘एआय’च्या जमान्यात बनावट आणि अस्सल यातील फरक शोधून काढणे, हे त्यांचे प्रमुख काम असेल. कारण सध्या अशा पद्धतीने अस्सल आणि नक्कल यांतील फरक ओळख हे सर्वात मोठे आव्हान आहे.

अयोग्य व्यक्ती या गोष्टीचा गैरफायदा घेण्याची दाट शक्यता आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे सामर्थ्य प्रचंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोड क्रिएटरची आवश्यकता भासणार आहे. विशेष म्हणजे, यापासून कोणतेही कार्यक्षेत्र अलिप्त राहू शकणार नाही. मग ते मौखिक किंवा श्राव्य असो, मुद्रित असो अथवा दृकश्राव्य स्वरुपाचे असो.

या सर्व क्षेत्रातील कामांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि या सर्व क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून फसवेगिरी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. हीच स्थिती ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित यंत्र उद्योगांबाबतही होणार आहे. या क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत यंत्र आणि मनुष्यबळ यांचा सुयोग्य मेळ बसविणाऱ्या आणि मानवी समूहाच्या विकासासाठी अधिक तत्पर असणाऱ्या सर्जनशील अभियंत्यांची मोठी गरज भासेल.

वर्तमानातही ज्या कंपन्यांमध्ये उत्पादनासाठी अथवा अन्य प्रक्रियेसाठी यंत्रमानवावरील अवलंबित्व खूप जास्त आहे, तेथेही प्रोग्रॅमिंग, त्याचप्रमाणे देखभाल-दुरुस्तीसाठी मोठे मनुष्यबळ आहे. काही मोठ्या कंपन्या नफा वाढवण्यासाठी मनुष्यबळात कपात करण्याची शक्यता निर्माण झाली तरीही त्यांना त्यांच्या कारखान्यातील यंत्रणा अथवा कार्यालयातील काम सुरळीतपणे चालावे यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘कोड रायटर’ आणि हार्डवेअर इंजिनियरची आवश्यकता भासेल.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाच्या कल्पक मेंदूतून आलेली संकल्पना आहे. आपण अशा पद्धतीनेच मोठ्या प्रमाणात गणितातील आकडेमोड आणि अन्य असंख्य कामे चुटकीसरशी करण्यासाठी संगणकाची निर्मितीही केली आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेग आणि विस्तार हा त्याच्याही एक पाऊल पुढे असल्याने अधिक भीती उत्पन्न झाली आहे. पण ती अनाठायी वाटते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात जो डाटा संग्रहित होत आहे त्याचे विश्लेषण करण्यासाठी, त्यातून निष्कर्ष काढण्यासाठी किंवा शक्यता वर्तविण्यात मोठ्या प्रमाणात अभियंत्यांची आणि शास्त्रज्ञांची गरज भासणार आहे. यात प्रामुख्याने हवामान बदल, भौगोलिक परिस्थितीतील बदल, यांसह मानवी जीवनातील अनेक बाबतीत होणाऱ्या बदलांचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने करता येणे सोपे होणार आहे.

फक्त याचा वापर विधायक कार्यासाठी होणे गरजेचे आहे. २००१ मध्ये प्रदर्शित ‘स्पेस ओडिसी’ या हॉलिवूडपटात अत्याधुनिक संगणक ‘एचएएल’ ज्याप्रमाणे कार्य करताना दाखवला आहे, त्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे संवेदना असणाऱ्या यंत्रांच्या निर्मितीची आणि त्यातून मानवी प्रजातीच्या अस्तित्वावर घाला येण्याची भीती व्यक्त होत आहे.

ही यंत्रे म्हणजे मानवाप्रमाणे इंद्रियज्ञान असणारी, बाह्य ज्ञानाचे आकलन करून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणारी यंत्रप्रणाली. मात्र काहींना या यंत्रांच्या निर्मितीमध्ये, ती यंत्रे सजीवाप्रमाणे भासण्याची आणि काळाच्या प्रवाहात मानवाप्रमाणे विकसित होत जाण्याची भीती वाटते. परंतु ती अगदीच निरर्थक आहे. त्याची कारणे अशीः

अ) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेल्या या यंत्रामध्ये भावभावना आणि सहानुभूती अथवा राग-द्वेष असणार नाही. या यंत्रांच्या माध्यमातून केवळ मोठ्या संख्यांची आकडेवारी आणि त्यांचे विश्लेषण होणार आहे. बाहेरून मिळालेल्या माहितीवर अथवा आकडेवारीवर विचार करणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे इतपतच हा विकास होणार आहे.

या यंत्रांना कोणतेही ध्येय अथवा भावना असणार नाहीत. त्यामुळे मनुष्य कायम वरचढ ठरणार आहे. प्राचीन कथांमध्ये वर्णन केलेल्या प्रचंड शक्ती आणि काम करू शकणाऱ्या, परंतु कोणतीही भावना अथवा राग-द्वेष नसणाऱ्या प्राण्यांप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली यंत्रे कार्य करतील

ब) सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चॅट जीपीटी अथवा गुगल यांच्या माध्यमातून केला जात असून, याच्या वापराचे स्वरुप हे प्रामुख्याने विविध विषयांची माहिती मिळवणे एवढेच आहे. त्यातही योग्य प्रश्नांचा वापर न केल्यास या माध्यमातून मिळणारी माहितीही चुकीची ठरते.

क) कृत्रिम बुद्धिमत्तेची सर्व यंत्रणा ही प्रोसेसर आणि सर्व्हरवर अवलंबून आहे. हे सर्व सर्व्हर ऑप्टिकल फायबर आणि वायरद्वारे टॉवरला किंवा सेकंडरी प्रोसेसरला जोडलेले आहेत. त्यामुळे मानवाप्रमाणे यामध्ये संवेदना निर्माण होण्याला आणि त्यातून काही कार्य करण्याला मर्यादा आहेत. कारण माणसाचा मेंदू हा अशा पद्धतीने कोणत्याही वायर अथवा ऑप्टिकल फायबरने कुठेही जोडलेला नाही. त्यामुळेच उत्क्रांतीचे सर्वात महत्त्वाचे लक्षण असणारी हालचाल आणि गती ही दोन्ही लक्षणे ‘एआय’मध्ये अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये नाहीत. या दोन लक्षणांच्या अभावी ही यंत्रणा क्षणार्धात नष्ट करता येऊ शकते; अथवा काम करण्यापासून थांबवताही येऊ शकते.

ड) वर्तमानात मानवाकडून ज्या विज्ञानाच्या सहाय्याने विकास केला जातो, तो निसर्गाच्या विज्ञानाच्या तुलनेत अगदीच स्वल्प आहे. निसर्गाचे विज्ञान हे कोट्यवधी वर्षे विकसित होत आलेले आहे. त्यातील प्रत्येक घटक एकमेकांशी तारांशिवाय जोडलेले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये याचादेखील अभाव आहे. या सर्व मर्यादांमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास झाला तरीही मानव हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुलाम न होता मालकच राहील.

(अनुवाद - रोहित वाळिंबे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT