अनमोल मातीची महती sakal
संपादकीय

अनमोल मातीची महती

एखाद्या वस्तूला मातीमोलाचा भाव मिळणे हा वाक्प्रचार आपल्या बोलण्यात अगदी सहज येतो. पण खरे तर मातीचे मोल खूप मोठे आहे. अर्थव्यवस्थेत मातीचे मूल्यांकन होत नसल्यामुळे कदाचित याचे खरे मूल्य आपल्याला जाणवत नाही.

सकाळ वृत्तसेवा

हवामान-अवधान

डॉ. गुरुदास नूलकर

एखाद्या वस्तूला मातीमोलाचा भाव मिळणे हा वाक्प्रचार आपल्या बोलण्यात अगदी सहज येतो. पण खरे तर मातीचे मोल खूप मोठे आहे. अर्थव्यवस्थेत मातीचे मूल्यांकन होत नसल्यामुळे कदाचित याचे खरे मूल्य आपल्याला जाणवत नाही. जमिनीवर सर्वत्र उपलब्ध होणारे हे संसाधन अमूल्यच. याचे कारण माती नैसर्गिक परिसंस्था आणि मानवी शेतीचा पाया आहे. पृथ्वीवर अन्न बनवण्याची क्षमता फक्त प्रकाशसंश्लेषण करणाऱ्या वनस्पतींना आहे (आणि केमोसिंथेसिस करणारे सजीव). या वनस्पतींना मातीतूनच आधार आणि पोषण मिळते. सूक्ष्मजीवांना अधिवास देऊन जैविक मालाचे विघटन  करणे आणि अजैविक घटक उपलब्ध करून देणे  यामुळे अन्नउत्पादन शक्य होते. मातीतून अशा अनेक पर्यावरणीय सेवा मिळतात. मातीत कार्बनयुक्त सेंद्रिय पदार्थांचा साठा असतो. त्यामुळे हे एक महत्त्वाचे कार्बन सिंक आहे. मातीमुळे नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर काही पोषणद्रव्य चक्राकार पद्धतीने वातावरणात फिरत असतात. अर्थव्यवस्थेत मातीचा मोलाचा वाटा आहे. विटा आणि सिमेंटचा कच्चा माल मातीतूनच मिळतो आणि इमारतीचा पाया मातीचाच असतो.

मातीत बुरशी, एकपेशीय वनस्पती, प्रोटोझोआ, गोलकृमि (नेमाटोड्स), गांडुमाळ, मुंग्या, गोगलगाय आणि काही सरपटणाऱ्या प्राण्यांना अधिवास आणि खाद्य मिळते. या वैविध्यपूर्ण समुदायामुळे जमनीखालच्या परिसंस्थेत गुंतागुंतीची अन्नसाखळी बनते आणि सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन पोषणद्रव्ये प्राप्त होतात. मातीची रचना आणि आरोग्य यावर झाडांचे स्वास्थ्य अवलंबून असते. 

पण जागतिक हवामानबदल आणि त्यातून  उद्भवणारे तीव्र तापमान, अतिवृष्टी, चक्रीवादळ यांच्या तडाख्यातून माती सुद्धा सुटत नाही. हवामानबदलाचा  मातीच्या पोषणक्षमतेवर होणारा परिणाम अधिकाधिक स्पष्ट आणि चिंताजनक होत चालला आहे. हवेतील उष्णता वाढली की मातीचे तापमान वाढते आणि आर्द्रता कमी होते. अनेक अभ्यासातून असे दिसते की मातीमधील आद्रतेची पावसाळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. भारताच्या जमिनीतील आर्द्रतेचे नकाशे इसरो (आयएसआरओ) प्रकाशित करतात. यात अत्यल्प आद्रता असलेल्या कोरड्या मातीचे क्षेत्र वाढत असल्याचे स्पष्ट दिसते. कोरड्या मातीवर कडक आणि अभेद्य थर तयार होतो ज्यात पाणी शिरू शकत नाही. अशा क्षेत्रात सुपीक जमीन वाळवंटीकरणाकडे जाऊ लागते. 

एकीकडे तापमानवाढ तर दुसरीकडे तीव्र पर्जन्यवृष्टी होत आहे. या परिस्थितित भुसभुशीत माती पाण्याने संपृक्त होते, जे शेती आणि वनस्पतींसाठी योग्य नाही. तीव्र पावसाने माती वाहून जाण्याच्या प्रमाणात वाढ होते. महाराष्ट्रातील सह्याद्रीत २०२१मध्ये अभूतपूर्व भूस्खलन झाले. यात डोंगर उतरावरची प्रचंड माती वाहून नदीत शिरली. नदीची वहनक्षमता घटल्यामुळे अनेक गावात पूरपरिस्थिती होती. माती जिथून गेली तिथली वनराई नष्ट झाली. अति कोरडी असो वा अति ओली, दोन्हीमुळे मातीची रचना, त्यातील अन्नसाखळी आणि उत्पादकता यांच्यावर परिणाम होतो. 

अस्थिर हवामानामुळे काही भागात वारंवार फ्रीझ-थॉ सायकल म्हणजे गोठणे-वितळणे होत आहे. यामुळे मातीच्या सच्छिद्रतेत बदल होतात. याचा परिणाम हवा आणि पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर होतो आणि मातीची रासायनिक रचनासुद्धा बदलते. विघटन प्रक्रियेसाठी उबदार तापमान अधिक योग्य असते, आणि थंडीत बंद पडते. या आघातांमुळे वनस्पतींच्या वाढीत आणि मातीच्या अन्नसाखळीच्या कार्यात घट होते आणि कार्बन शोषणक्षमता, म्हणजेच हवामानबदल रोखण्याच्या क्षमतेत घट होते. 

हवामान बदलाचा कदाचित सर्वात लक्षणीय परिणाम मातीमधील सेंद्रिय पदार्थांवर होतो (सॉइल ऑर्गनिक मॅटर). तापमान, ओलावा, पोत, क्षारता, आम्लता, आणि जैविक माल आशा अनेक घटकांचा मातीतील सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणावर प्रभाव पडतो. मातीच्या आरोग्यासाठी, पोषण द्रव्य पुरवण्यासाठी, आणि आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असणे महत्त्वपूर्ण आहे. पण तीव्र उष्णतेत यांचे विघटन वेगाने होते, त्यामुळे त्यांचा कार्बन वातावरणात उत्सर्जित होतो आणि हरितगृह वायूंमध्ये भर पडते. मातीची धूप होण्याची शक्यता वाढते आणि सूक्ष्मजीव पोसण्याची क्षमता कमी होते. हवामान बदलाचे मातीवर होणारे आघात हे अन्नसुरक्षेसाठी धोक्याचे आहेत. सिंचन, शेतीची उत्पादकता, खतांचा वापर या सर्वांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मातीची काळजी घेणे, हे निसर्गसंवर्धनातील एक महत्त्वाचे काम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT