china and america showing interest in taiwan election voting politics Sakal
संपादकीय

लक्ष तैवानच्या मतदानाकडे अन् चीनच्या प्रतिक्रियेकडे

भूराजकीय स्थानामुळे तैवानला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळेच साऱ्या जगाचे लक्ष तेथील निवडणुकीकडे लागले आहे. ही निवडणूक येत्या शनिवारी (ता. १३) होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

- धनंजय बिजले

काही देश आकाराने अगदी लहान असतात; मात्र त्यांच्यात जगाचे लक्ष वेधून घेण्याची ताकद असते. तैवान हा त्यापैकीच एक. जगाच्या नकाशावर तैवान छोट्या ठिपक्याएवढा देश. मात्र आपल्या भूराजकीय स्थानामुळे तैवानला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

त्यामुळेच अवघ्या सव्वादोन कोटी लोकसंख्या असलेल्या तैवानमधील निवडणुकीकडे साऱ्या जगाचे त्यातही चीन आणि अमेरिका या बलाढ्य महासत्तांचे लक्ष लागलेले आहे. तैवानी जनता येत्या शनिवारी (ता. १३) नवा अध्यक्ष निवडण्यासाठी मतदानाला सामोरे जाईल. तैवानची जनता उत्साहाने निवडणुकांत सहभागी होत आहे.

तैवान हा आमचाच भूभाग असल्याचा चीनचा ठाम दावा आहे. त्यामुळे अमेरिका व संयुक्त राष्ट्रेदेखील तैवानला मान्यता देत नाहीत. पण तेथे लोकशाहीप्रक्रिया सुरू राहावी, यासाठी अमेरिका शक्य तितके प्रयत्न करते.

त्यामुळे या दोन्ही महसत्तांमध्ये सतत कुरबुरी सुरू असतात. तैवानच्या निवडणुकीवर चीन डोळ्यांत तेल घालून नजर ठेवून आहे. तैवानमध्ये १९९६पासून लोकशाही पद्धतीने निवडणुका होतात. त्याला अर्थातच चीनचा विरोध आहे. मात्र बहुतांश तैवानी जनता निवडणुकांच्या बाजूची आहे. त्याला अमेरिका खतपाणी घालते.

तैवानची जनता येत्या शनिवारी एकूण तीनदा मतदान करेल. यातून देशाचा नवा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडला जाईल, तर तिसरे मत तो संसदसदस्य निवडीसाठी देईल. तैवानच्या संसदेत ११३ सदस्य निवडून येतात.

एक कोटी ९५ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तेथे अजूनही मतदानपत्रिकेचाच वापर होतो. सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होईल. त्यानंतर त्याच ठिकाणी तत्काळ मतमोजणीला सुरुवात होईल.

यातून त्याच दिवशी देशाला नवा अध्यक्ष मिळेल. विसाव्या वर्षी नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळतो. या वेळी तरुण मतदारांची संख्या मोठी असून ती निर्णायक भूमिका बजावण्याची चिन्हे आहेत.

तैवानमध्ये प्रामुख्याने दोन पक्ष आहेत. त्यातील कुओमिंतांग पक्ष (केएमटी) हा राजकीय पक्ष चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी जवळचा मानला जातो. आशिया खंडातील जुना पक्ष म्हणून त्याची ओळख आहे, तर दुसरा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (डीपीपी) नावाचा पक्ष लोकशाहीवादी असून अमेरिकेशी या पक्षाचे निकटचे संबंध आहेत.

गेली आठ वर्षे याच पक्षाची तैवानमध्ये राजवट आहे. १९९६ पासून तैवानमध्ये निवडणुका होतात. तेव्हापासून या दोन पक्षांतच सत्तेची अदलाबदल झालेली पाहायला मिळते; मात्र या वेळी सत्तारूढ पक्ष आघाडीवर असल्याचे मानले जाते. तैवान पीपल पार्टी (टीपीपी) नावाचा तिसरा पक्षदेखील निवडणूक रिंगणात आहे; मात्र या पक्षाचा परीघ तुलनेने छोटा आहे.

अध्यक्षपदासाठी लाय आघाडीवर

अध्यक्षपदासाठी तिघांमध्ये चुरशीची लढत आहे. अध्यक्षपदासाठी ‘डीपीपी’चे ६४ वर्षीय विल्यम लाय हे आघाडीवर असल्याचे मानले जाते. लोकशाहीवादी लाय हे पेशाने डॉक्टर असून गेल्या राजवटीत ते उपाध्यक्ष होते. उपाध्यक्षपदासाठी त्यांनी हसिओ बी किम या तरुण महिलेला संधी दिली आहे. त्यामुळे तरुणाई त्यांच्या पाठीशी राहील, असे मानले जाते.

हसिओ या तैवानच्या अमेरिकेतील माजी राजदूत आहेत. तैवानचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राखण्याकडे दोघांचाही कल आहे. गेली आठ वर्षे ‘डीपीपी’ सत्तेत असून याहीवेळी त्या पक्षालाच मोठी संधी आहे.

तैपेईचे माजी महापौर ६६ वर्षीय हू यू हे कम्युनिस्टधार्जिण्या ‘केएमटी’ पक्षाचे उमेदवार आहेत. पूर्वाश्रमीचे पोलिस अधिकारी असलेले हू हे तिसरे उमेदवार. त्यांना पक्षातील जुन्या पिढीची साथ असल्याने रंगत निर्माण झाली आहे. ‘टीपीपी’चे को वेन जे देखील रिंगणात आहेत. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणारस हे येत्या शनिवारी निश्चित होईल.

स्वायत्ततेचा मुद्दा

येथील निवडणूक प्रचारात चीनचा मुद्दा नेहमीच अग्रक्रमावर असतो. यंदाही तो आहेच. सत्तारूढ पक्ष तैवानची स्वायत्तता अबाधित राखण्याची भाषा करीत आहे, तर विरोधी पुराणतवादी पक्ष चीनच्या बाजूने झुकलेला आहे.

देशाची अर्थव्यवस्था, वाढती महागाई, परवडणारी घरे हेदेखील प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे बनू पाहात आहेत. आजही चीन तैवानचा महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. पण केवळ चीनवर अवलंबून राहणे धोक्याचे असल्याची भूमिका ‘डीपीपी’ने घेतलेली आहे.

अमेरिकेशी संबंध वाढून जगभरातील पर्यटकांना तैवानमध्ये आणण्यावर भर दिला पाहिजे तरच देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल, अशी पक्षाची भूमिका आहे, तर चीनधार्जिण्या ‘केएमटी’ पक्षाने चीनबरोबर शक्य तितका व्यापार वाढविल्यास फायदा होईल, अशी भूमिका घेतली आहे.

गेल्या चार वर्षांत देशात महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. तसेच घरांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. याकडे या पक्षाने लक्ष वेधून सत्तारूढ पक्षावर टीका केली आहे.

ड्रॅगनची प्रतिक्रिया काय?

हाँगकाँगप्रमाणेच चीनच्या मुख्य भूमीत तैवानचे हस्तांतर होणे हे क्रमप्राप्त असून २०४९ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी स्पष्ट भूमिका चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नववर्षांच्या स्वागतसोहळ्यात केलेल्या भाषणात मांडली होती.

यावरून चीनच्या मनात काय चालले आहे, याचा अदमास येतो. निवडणुकीत ‘डीपीपी’ या लोकशाहीवादी पक्षाची सत्ता आल्यास ‘ड्रॅगन’ काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. याआधी चीनने या पक्षाची सत्ता आली होती, त्या वेळी थेट क्षेपणास्त्रे डागून तैवानच्या उरात धडकी भरविली होती. आता चीन काय मार्ग चोखाळणार, हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT