माझ्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर कुंभारआळी आहे. त्याच्या पुढे गेलं की वाचनालय. तिथं मोठाली गुलमोहराची झाडं आहेत. तो भाग मला फार आवडतो. एकतर तिथं रस्त्यावरच्या वर्दळीपेक्षा जास्त शांतता असते. तिथली माणसं निवांत असतात. अव्याहत वाहणाऱ्या रस्त्याकडे ते लोक त्रयस्थपणे बघत असतात.
म्हणजे सतत धावणाऱ्या, कर्कश्श रस्त्यावरच्या या अजस्र धांदलीत आपला सहभाग नाही, असा काहीसा प्रवासात लागणाऱ्या स्टेशनवरच्या बाकड्यांवर काही लोक असेच निवांत बसले असतात. त्यांच्या वाट्याला प्रवास नाही, जागा मिळवण्याचा संघर्ष नाही, फक्त एक पूर्ण निवांतपण आहे. तशीच तिथली माणसं आहेत. मला त्यांचा कधीकधी हेवा वाटतो.
पण एक गोष्ट मात्र आहे की, तिथून जाताना मला फार छान वाटतं. जुलै महिन्यात तिथं माती मळण्याचं काम सुरु असतं. मग त्यातून हळूहळू गोकुळ तयार होतं. ओल्या मातीच्या गोळ्याचा गोपाळकृष्ण ते थेट सावळा, लोणी चोरून खाणारा इथवरचा प्रवास रोज येता जाता बघता येतो. ते झालं की लगेच गणपतीचे साचे तयार होतात.
मोठ्या जागेत मांडव घालून गणेशाच्या भव्य मूर्ती आकार घेत असतात. रोज तीच वेळ, तोच रस्ता, तेच कार्यालय, तीच माणसं असली तरी त्या जागी आल्यावर मला बदलाची , काळ पुढे सरकतोय, याची जाणीव होते. तीही घाईघाईत नाही.
सावकाश, मंदपणे होते. अनंत चतुर्दशीनंतर तिथल्या कामांना अधिक वेग आला. आता दुर्गेची मूर्ती घडवण्यात ते कलाकार मग्न आहेत. सिंहाची आयाळ, देवीचा आशीर्वादाचा हात, तिची बोटं, तिचे सुंदर तेजस्वी डोळे,
गणपतीची सोंड, त्याच्या हातात खरा वाटावा इतका देखणा मोदक, मूर्तीचे बारीक तपशील घडवताना त्यांची बोटं किती नाजूक होतात ! आणि हे सगळं करताना त्यांची तल्लीनता इतकी असते की त्यांना रस्त्यावरचा गोंधळ ऐकूच येत नसावा. कशानेही त्यांची समाधी मोडत नाही.
आता नवरात्र होत आलं की, तिथं सुंदर पणत्या, निरनिराळे दिवे दिसतील. माझा वेग तिथं मंद होतो. थांबते, निरखून बघण्याचा प्रयत्न करते. एरवी बोलताना सहकारी बायका “बापरे, हा हा म्हणता दसरा आला, दिवाळी आली.” म्हणत दीर्घ श्वास घेतात. पण मला त्याची चाहूल फार आधी लागली असते. तीही नुसत्या कृतीतून लागते.
सण उत्सवांचा कोणताही ताण त्या चाहुलीत नसतो . असते फक्त तल्लीनता. त्यादिवशी पितृपक्षातल्या वाढत्या उष्णतेच्या नावाने चिडचिड करत मी स्कूटर हाकत निघाले. आळीपाशी आले तर मातीतून सुंदर वीणा आकाराला येत होती. मी क्षणभर थांबून हेल्मेट काढून मनभर श्वास घेतला.अश्विनाची चाहूल लागली. शरदातलं पहाटेचं धुकं आठवलं आणि त्रागा संपला. गारवा येतोय म्हटलं, की ताप कमी होतो. सावली पुढे आहे, म्हटलं की रखरख सोसता येते.
दिवाळी झाली की ती माणसं लग्नांसाठी लागणारे शकुनाचे कलश तयार करतील, सुगडी करतील नंतर फेब्रुवारीत झाडांचा वाळला पाचोळा भिरभिर करत उडत जाईल, तेव्हा माठ, रांजण, सुरया करतील. त्यांचे माती माखले हात, कार्यमग्नता, कल्लोळाकडे पाठ करत मिळवलेली एकरूपता आणि त्यांच्या कृतीतून ऋतूबदलाची मिळणारी वर्दी मला आवडते.
जणू निसर्गाच्या तलम वस्त्रातला एक धागा त्यांच्या तंद्रीचा असावा. असे हात गुंफून असतात त्यांचे. माझ्यासाठी तर आपलं काम इतक्या तल्लीनतेने कान,डोळे,मन एक करून करत राहण्याची प्रेरणाच असते ती.
जगण्याची धावपळ सुरूच असते. ती कोणाला चुकली आहे? एक अध्याय संपतो, नवा सुरु होतो. महत्त्व आहे तंद्रीला , मन:पूर्वकतेला. सरून गेलं ते समरसून केलं आणि येणार आहे, तेही त्याच भावनेनं अनुभवायचं आहे. इतकी प्रामाणिक जाणीव मनात असली पाहिजे. प्रतिपदेच्या चंद्रकोरीकडे पाहून शरदाचं स्वागत मी त्याचं मन:पूर्वकतेनं करते आहे. बारीकसारीक प्रत्येक कामात माझी, आपल्या सर्वांचीच देखणी तंद्री लागो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.