congress rahul gandhi himachal pradesh vikramaditya singh political assembly election sakal
संपादकीय

‘मोहब्बत’ की दुकान, ‘नफरती’ विक्रेते

सकाळ वृत्तसेवा

- सुनील चावके

काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशभरातील ‘नफरती’च्या बाजारांमध्ये ‘मोहब्बत की दुकान’ थाटण्याचा प्रयोग राबवत आहेत. पण त्यांच्याच दुकानात चोरुन ‘नफरत’ विकणाऱ्या विक्रेत्यांची कमी नाही, हे काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी दाखवून दिले आहे.

योगी आदित्यनाथशासित उत्तर प्रदेशाप्रमाणे काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशातही खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या हॉटेल, ढाबे आणि दुकानांवर मालकांच्या ओळखपत्रांसह नाव, पत्ता आणि अन्य तपशील प्रसिद्ध करण्याची सक्ती करणारा आदेश त्या राज्याचे मंत्री या नात्याने विक्रमादित्य सिंह यांनी काढला.

उत्तरप्रदेशातील योगींच्या आदेशाला राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रा आणि ‘समस्त’ काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असताना विक्रमादित्यांनी हा आदेश काढण्याचे धारिष्ट्य दाखवले. काँग्रेसमध्ये राहून भाजपला मदत होईल, अशा कृती करण्यात गुंतलेल्या विक्रमादित्य सिंहांमुळे राज्यात मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांना बहुमतातील सत्ता शाबूत राखण्यासाठी सतत धडपडावे लागत आहे.

मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी केलेल्या उपद्व्यापांमुळे राज्यातील काँग्रेसची थोडक्यात सत्ता जाता जाता वाचली. तरीही राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी झालेल्या लढतीत काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा हमखास विजयाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

खुद्द विक्रमादित्य सिंह यांना लोकसभा निवडणुकीत कंगना राणावतकडून पराभवाचा दणका बसला. एवढे करुन राज्य मंत्रिमंडळातील स्थान कायम राहिले असले तरी त्यांची कुरापती करण्याची खोड मोडलेली नाही. शेवटी राहुल गांधी यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणुगोपाळ यांच्या हातून कठोर आणि स्पष्ट शब्दांत त्यांचे कान टोचावे लागले.

ही घडामोड साधी वाटत असली तरी त्यातून राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्षात वाढलेला दबदबा प्रथमच अधोरेखित झाला आहे. देशाच्या राजकारणात बदललेल्या हवामानाची जाणीव न ठेवता विक्रमादित्यांनी केलेल्या ‘गुस्ताखी’ने त्यांना ही आयतीच संधी मिळाली. पक्षाची विचारसरणी आणि धोरणे पटत असतील तर रहा, नाही तर खुशाल प्रतिस्पर्धी भाजपमध्ये जा, असा संदेशच त्यातून राहुल गांधींनी दिला आहे.

काँग्रेसचे निर्विवाद नेते म्हणून राहुल गांधींनी टाकलेले हे पहिले पाऊल ठरले आहे. अर्थात पक्षातील स्वार्थी, संधीसाधू, मतलबी आणि नाठाळांना वठणीवर आणण्यासाठी आपल्याला दोन दशके का लागली, हा राहुल गांधींसाठीही आत्मपरीक्षणाचा विषय ठरावा. केंद्रात सत्तेत आल्यावर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ‘काँग्रेसमुक्त’ भारताच्या घोषणेसाठी राहुल गांधी यांचा गेल्या दशकातील नेतृत्वाचा नाकर्तेपणाही कारणीभूत ठरला होता, हेही विसरुन चालणार नाही.

राहुल यांची तत्कालिन अनास्था

काँग्रेससारख्या देशव्यापी पक्ष केंद्रात सत्तेत परतत असताना वीस वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून विजयी होत राष्ट्रीय राजकारणात पदार्पण केले. पण केंद्रातील दहा वर्षांच्या सत्ताकाळात राहुल गांधी यांचे राजकारणातील वर्तन नामवंत विद्यापीठात प्रवेश मिळविल्यावर शिक्षणाविषयी अनास्था दाखविणाऱ्या विद्यार्थ्याप्रमाणे ठरले.

अहमद पटेल, पी.व्ही. नरसिंह राव, मनमोहन सिंग, पी.चिदंबरम, प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंह, दिग्विजय सिंह, आर.के. धवन, नटवरसिंग, अशोक गहलोत, के. करुणाकरन, ए.के.अँटनी, प्रियरंजन दासमुंशी, तरुण गोगोई, माखनलाल फोतेदार, गुलामनबी आझाद, सतीश शर्मा, जनार्दन द्विवेदी, एन.के.पी. साळवे, वसंत साठे,

जगन्नाथ मिश्रा, बलराम जाखड, अ. र. अंतुले, माधवसिंह सोळंकी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, कपिल सिब्बल, अभिषेक सिंघवी अशा अवघ्या देशातील दिग्गज काँग्रेसनेत्यांचा समावेश असलेल्या देशाच्या राजकारणातील समृद्ध विद्यापीठच राहुल गांधींच्या दिमतीला होते. या नेत्यांपैकी प्रत्येकाच्या राजकारणाची शैली परस्परभिन्न होती. पण प्रतिकूल परिस्थितीत पाय रोवून राजकीय अस्तित्व शाबूत राखण्याचे आणि अनुकूल स्थितीत उंच भरारी घेण्याचे दुर्मिळ कसब त्यांच्यापाशी होते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यापैकी कोणाचाही राहुल गांधींना विरोध नव्हता. उलट काँग्रेस मुख्यालयात गांधी घराण्यातील सदस्याची तसबीर लावून राजकारण केल्याने मिळणाऱ्या ‘मल्टीबॅगर’ परताव्याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. राहुल गांधींसाठी ते हात जोडून उपलब्ध होते. त्यांच्यातील सदगुण आणि दुर्गुणांची वर्गवारी यथावकाश करता आली असती.

या नेत्यांकडून राजकारणाच्या मैदानावरचे आणि मैदानाबाहेरचे धूर्त डावपेच आत्मसात करुन घेण्याची अपूर्व संधी राहुल गांधींना लाभली होती. पण या नेत्यांशी फटकून वागत ती त्यांनी कायमची गमावली. त्यांच्याशी संवाद साधताना ‘बिटविन द लाईन्स’ वाचण्याचा राहुल गांधींनी प्रयत्नच केला नाही. सोनिया गांधींप्रमाणे सर्वसहमती निर्णयप्रक्रियेचा अवलंब करीत राहुल गांधींनी त्यांच्याकडून राजकारणातले बारकावे शिकून घेतले असते तर काँग्रेसला सत्तेसाठी दीर्घ संघर्ष करावा लागला नसता.

अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असताना बराक ओबामा यांनीही सोनिया गांधी यांच्या आग्रहास्तव राहुल गांधी यांना जागतिक राजकारणातील अंतर्प्रवाहाची जाणीव करुन दिली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. काळाच्या ओघात काँग्रेसचे अनेक धुरंधर नेते लुप्त झाले, तर इतरांनी राहुल गांधींच्या अनास्थेला कंटाळून ‘जी-२३ गट’ स्थापन करुन त्यांना विरोध करण्याची खेळी केली.

काँग्रेसचे सत्तेत परतणे अशक्यप्राय असल्याची धारणा झाल्यामुळे काँग्रेसमधील चाळीशी-पन्नाशीतील अनेक नेत्यांवर राजकारणात अस्तित्व टिकवण्याच्या नाईलाजातून भाजपमध्ये जाण्याची वेळ आली. लोकसभा निवडणुकांमध्ये काँँग्रेसचा चेहरा बनल्यापासून राहुल गांधींनी अपयशाची हॅटट्रिक नोंदविली. काँग्रेसच्या इतिहासातील लोकसभेच्या संख्याबळाचे सलग तीन नीचांक गेल्या दहा वर्षांमध्ये नोंदविले गेले.

पक्षातील दिग्गजांची समृद्ध अडगळ भंगारात काढल्यावर राहुल गांधी यांना आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी दक्षिण-उत्तर आणि पूर्व-पश्चिम भारत पालथा घालावा लागला. सलग अडीच-तीन तास ट्रेड मिलवरच्या सातत्यपूर्ण सरावामुळे कन्याकुमारी ते काश्मीर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शिणवून टाकणारी दीडशे दिवसांची, चार हजार किलोमीटरची भारत जोडो पदयात्रा त्यांनी संयमाने आणि निर्धाराने पूर्ण केली.

या यात्रेची खिल्ली उडविण्याचा त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अंगलट आला. निर्णयप्रक्रियेतील गुप्तता आणि धूर्तपणा वाढला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून घरबसल्या मिळू शकणारा काँग्रेसचा वैचारिक वारसा त्यांनी अवघ्या भारताची यात्रा करुन काही अंशी परत मिळविला.

त्यामुळे लोकसभेत पन्नाशीत अडकलेले काँग्रेसचे संख्याबळ शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले. कोट्यवधी लोकांच्या संपर्कात आल्यामुळे राहुल गांधींना देशापुढच्या ज्वलंत वास्तवाची जाणीव झाली. त्यांच्या रस्त्यावरच्या आणि लोकसभेच्या सभागृहातील भाषणांना धार आली. शब्दांच्या मांडणीत नेमकेपणा आला. प्रतिकूलतेला आणि विरोधकांनी केलेल्या अपमानाला संयमाने सामोरे जाण्याची क्षमता निर्माण झाली. या आत्मविश्वासामुळेच त्यांनी आढेवेढे न घेता लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची संसदेत आणि रस्त्यावरची ‘केमिस्ट्री’ पक्षात जोम निर्माण करणारी ठरली. पक्षाशी वैचारिक प्रतारणा करीत प्रतिस्पर्धी भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत होईल, अशा वृत्तीने काम करणारे शेकडो ‘नफरती सेल्समन’ काँग्रेसमध्ये आहेत.

त्यांची ओळख पटवण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा पुरेशी आहे. राजकारणात अशा वृत्तींकडे कानाडोळा करणे किती महागात पडू शकते, याची गेल्या दोन-तीन वर्षांत काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांना जाणीव झाली आहे. पक्षावर स्वकष्टाने प्रस्थापित केलेले नियंत्रण राखता यावे म्हणून तंत्रस्नेही राहुल गांधींनी अशा वृत्तींवर नजर ठेवण्यासाठी ‘आयटी कक्ष’ उघडायला हरकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

आठ महिन्यांपासून अंतराळात...सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कशा येणार? स्पेसएक्स कॅप्सूल तयार, दोन जागा ठेवल्या रिकाम्या

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 300 अंकांनी तर निफ्टी 60 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Mumbai Crime: 3 काका रिक्षामधून आले अन्...; आई रागवत असल्याने शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव

Bigg Boss Marathi 5 : ड्युटीवरून अंकिता आणि अभिजीतमध्ये झालं जोरदार भांडण, "तू फक्त निक्कीसाठी जेंटलमन"

SCROLL FOR NEXT