Subhash Sabane and Jitesh Antapurkar Sakal
संपादकीय

अशोक चव्हाणांच्या प्रभावाचा कस!

मराठवाड्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघात कॉँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे येत्या ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान आहे.

दयानंद माने

विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांसमोर भाजपने आयातीत उमेदवार सुभाष साबणेंना रिंगणात उतरवून आव्हान दिले आहे. सहानुभूती, सरकारची कामगिरी आणि अशोक चव्हाणांचे नेतृत्व यांचा कस यानिमित्ताने लागत आहे.

मराठवाड्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघात कॉँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे येत्या ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान आहे. येथे कॉँग्रेसचे उमेदवार व अंतापूरकरांचे पुत्र जितेश अंतापूरकर आणि भाजपचे उमेदवार माजी आमदार सुभाष साबणे यांच्यात लढत होईल. महाविकास आघाडीच्या प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. कॉँग्रेस व शिवसेना हे दोन्हीही पक्ष राज्यात सत्तेत असल्याने ही निवडणूक फार चुरशीची होईल, असे कागदावर तरी वाटत नाही. त्यात हा मतदारसंघ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यक्षेत्रातला. या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेचे तीनदा आमदार राहिलेले सुभाष साबणेंना उमेदवारी दिलेली आहे.

२००९च्या फेररचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. त्यावेळी रावसाहेब अंतापूरकरांनी शिवसेनेच्या सुभाष साबणेंचा पराभव केला होता. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी नांदेड जिल्ह्यात नऊपैकी सात जागा कॉँग्रेसकडे तर दोन जागा मित्रपक्ष राष्ट्रवादीकडे गेल्या. २०१४मध्ये राज्यात सत्ताबदल होऊन भाजपची सत्ता आली. जिल्ह्यातील कॉँग्रेसला हादरे बसले. मात्र लोकसभेची निवडणूक अशोक चव्हाणांनी जिंकली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकरांनी पराभव केला आणि जिल्ह्यातील चव्हाण विरोधकांना बळ मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीत चव्हाणांनी लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत विधानसभेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत अंतापूरकरांसह काँग्रेसचे इतर तीन आमदार निवडून आले. सत्तांतरात चव्हाणांना महत्वाचे खाते मिळाल्याने त्यांची सत्तेची मांड पुन्हा पक्की झाली. या पार्श्वभूमीवर देगलूरची पोटनिवडणूक होत आहे.

या मतदारसंघावर कॉँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. चव्हाणांचे मेव्हुणे भास्करराव पाटील खतगावकर येथून तीनदा कॉँग्रेसचे आमदार होते. त्यांचे चव्हाणांशी बिनसल्यानंतर २०१४च्या भाजप लाटेत त्यांनी भाजपशी घरोबा केला. मात्र भाजपने त्यांना पक्षसंघटनेतच गुंतवून ठेवले. प्रदेश उपाध्यक्ष असूनही त्यांच्या सुनेला ते नायगावमधून उमेदवारी देऊ शकले नाहीत. आता या निवडणुकीत ते भाजपला मदत करतात की कॉँग्रेसला हा लाखमोलाचा प्रश्न आहे. कारण त्यांना विश्वासात न घेता भाजपने साबणेंना शिवसेनेतून आयात करत उमेदवारी दिली.

अशोक चव्हाणांनी येथे सावध पावले उचलली आहेत. पंढरपुरात दिवंगत भारत भालके यांच्याबाबतच्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालकेंना मिळाला नव्हता, हे हेरून इथे उमेदवारी देताना चाचपणी करण्यात आली. जिल्हा नियोजन व विकास, दलित वस्ती व इतर विविध निधींची खैरात देगलूर बिलोलीवर करण्यात आली. दुसरीकडे जितेश अंतापूरकरांनाही सक्रियेतेच्या सूचना दिल्या. मतदारसंघातील आपला कमकुवतपणा लक्षात घेऊन भाजपने सुभाष साबणेंना रिंगणात उतरवले आहे. त्यांनी आधी दोनदा शेजारच्या मुखेड (१९९९ व २००४) आणि देगलूरमधून (२०१४) आमदारकी भुषविली आहे. त्यांचे वडीलही मुखेडचे आमदार होते. रावसाहेब अंतापूरकरही दोनदा देगलूरचे (२००९ व २०१९) आमदार होते. त्यामुळे पुन्हा पारंपरिक लढत रंगणार आहे.

डॉ. उत्तमराव इंगोले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. गेल्या निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवाराने बारा हजारांवर मते मिळविली होती. अंतापूरकरांचा अर्ज दाखल करताना चव्हाण यांनी मित्रपक्ष शिवसेनेचे मराठवाड्यातील मंत्री अब्दुल सत्तार आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते कमलकिशोर कदम यांना आमंत्रित करून महाविकास आघाडीतील एकजिनसीपणाचा संदेश दिला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनीही अतिवृष्टी पाहणी दौऱ्यानिमित्ताने खतगावकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी साबणेंची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत साबणेंना पक्षात प्रवेशाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.

अशोक चव्हाणांचा जिल्हा आणि ताकद ओळखून भाजपने साबणेंमागे बळ उभे केले आहे. अर्थात प्रताप पाटील चिखलीकर यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. भाजपमधील अंतर्गत गटबाजी, साबणेंची शिवसेनेतील बंडखोरी, खतगावकर मागच्या निवडणुकीप्रमाणे आतून वेगळा प्रचार करतील का, जितेशना वडिलांच्या निधनाने सहानुभूती मिळेल का, अशा प्रश्‍नांच्या उत्तरावर निकालाचा कौल अवलंबून असेल. अतिवृष्टीने या भागातील शेतकरी अडचणीत आहे, त्याचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारने उचललेली पावले, केलेले पंचनामे आणि दिलेली मदत या बाबींचे भांडवल विरोधक किती करतात, हेही पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT