उपयुक्ततावाद मांडणारे दुसरे तत्त्वज्ञ म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल. बेंथम यांच्याप्रमाणेच मिल यांनाही माणूस जे काही करतो ते स्वतःच्या सुखासाठी असे सांगणारा मानसशास्त्रीय सुखवाद
उपयुक्ततावाद मांडणारे दुसरे तत्त्वज्ञ म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल. बेंथम यांच्याप्रमाणेच मिल यांनाही माणूस जे काही करतो ते स्वतःच्या सुखासाठी असे सांगणारा मानसशास्त्रीय सुखवाद मान्य आहे. माणसाच्या प्रत्येक कृतीचे एकमेव अंतिम उद्दिष्ट म्हणजे सुख. सुखाशिवाय ज्या-ज्या गोष्टी ‘चांगल्या’ समजल्या जातात, त्या एकतर सुखाचाच भाग असतात, किंवा सुख मिळवून देणाऱ्या असतात.
मिल यांच्या दृष्टीने सुख म्हणजे फक्त आनंद नाही, तर दु:खाचा अभावही. दुःख म्हणजे वेदना आणि आनंदाचा अभाव. प्रत्येकालाच सुखाची इच्छा असते. मात्र जी कृती स्वतःच्या सुखासाठी नाही तर अधिकांच्या अधिक सुखासाठी केली जाते ती नैतिक दृष्टीने योग्य असते असे बेंथम यांच्याप्रमाणे त्यांचेही मत आहे. पण स्व-सुख हीच माणसाच्या वर्तनाची एकमेव प्रेरणा असेल, तर माणसाने इतरांच्या सुखाची पर्वा करावी असे म्हणणे कितपत सयुक्तिक ठरेल? याला मिल यांचे उत्तर असे आहे की माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याला निसर्गतःच इतरांबरोबर जोडून घ्यायला आवडते. त्यामुळे त्यांच्या सुख-दुःखांबद्दल माणसाला आस्था असते.
इतरांचे दुःख पाहून त्याला वाईट वाटते. एवढेच नाही तर आपल्यामुळे कुणाला दुःख झाले तर त्याला अपराधीही वाटते. आपले हितसंबंध इतरांच्या हितसंबंधांत गुंतलेले असतात, आपले सुख-दुःख इतरांच्या सुख-दुःखांशी निगडीत असते हे माणसाला उमगते. यामुळेच त्याला इतरांचा विचार करून वागण्याची प्रेरणा मिळते. ही प्रेरणा नैतिक वर्तनासाठी पोषक असते. आपल्यापुढे निरनिराळ्या कृतींचे जे पर्याय असतात त्यातली जी कृती जास्तीत जास्त लोकांसाठी जास्त सुख निर्माण करेल असे आपल्याला वाटते, ती कृती आपण निवडली तर, ती नैतिक ठरतेच पण ती सर्वांच्या एकंदर सुखाच्या निर्मितीलाही हातभार लावत असते. कधी-कधी परिस्थिती अशी असते की कृतीचे सर्वच पर्याय दुःखदायक असतात. अशा वेळी कमीत कमी दुःख निर्माण करेल अशी कृती निवडणे योग्य ठरते.
बेंथम आणि मिल यांच्या विवेचनातला महत्त्वाचा फरक वेगवेगळ्या सुखांची तुलना कशी करावी यासंबंधीचा आहे. बेंथम यांनी सुखाचे मोजमाप करण्यासाठी जे निकष सांगितले आहेत, ते उपयुक्त असले तरी पुरेसे नाहीत. एक तर सुख ही भौतिक वस्तू नसल्यामुळे त्याच्याबद्दल संख्यात्मक निष्कर्ष खरे तर काढता येत नाही. मिल यांचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुखा-सुखातला फरक गुणात्मक असतो. एक सुख दुसऱ्या सुखापेक्षा वरचढ आहे किंवा तुच्छ आहे असे आपण म्हणतो, ते सुखाचे परिमाण किंवा संख्यात्मक स्वरूप बघून नव्हे, तर त्यांचे गुणधर्म बघून. पण तरी वेगवेगळ्या सुखांची तुलना कशाच्या आधारे करता येईल ही समस्या उरतेच.
सुख व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे कुणाला कशात सुख वाटेल हे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक घटकांवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत सुखाची उच्च-नीचता कुठला वस्तुनिष्ठ निकष वापरुन ठरवता येईल? मिल यांचे या प्रश्नाला उत्तर असे आहे की ज्या प्रकारच्या सुखांची तुलना आपण विशिष्ट प्रसंगी करू इच्छितो, ती सुखे ज्या व्यक्तींनी अनुभवलेली आहेत, त्यांचे त्यासंबंधीचे मत आपण मान्य करावे. हा निकष अर्थातच वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक नाही. तरीही तो सामान्यांना उपयोगी वाटू शकेल असा आहे. ‘महाजनो येन गतः स पंथः’ या उक्तीच्या जवळ जाणार आहे.
उपयुक्ततावादावर त्या काळात अशी टीका झाली की त्यांनी मांडलेला सुखवाद माणसाच्या जीवनाची गुणवत्ता प्राण्याच्या तुच्छ पातळीवर आणून ठेवतो. याचा प्रतिवाद करताना मिल यांनी अभिव्यक्त केलेले एक वचन सुप्रसिद्ध आहे. ते म्हणतात, “एखादे संतुष्ट डुक्कर असण्यापेक्षा असंतुष्ट माणूस असलेले चांगले. एखादा संतुष्ट माणूस असण्यापेक्षा असंतुष्ट सॉक्रेटीस असणे चांगले.” याचा मतितार्थ असा की बुद्धिशाली माणसाचे असमाधान केवळ शारीर पातळीवर जगणाऱ्या प्राण्यांच्या सुखापेक्षा श्रेष्ठ असते आणि सॉक्रेटीस यांच्या सारख्या बुद्धिमान माणसाचे असमाधान सर्वसामान्य माणसाच्या समाधानापेक्षा श्रेष्ठ असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.