devendra fadnavis sakal
संपादकीय

ढिंग टांग : धर्मवीर ३ : नवे कथानक..!

ब्रिटिश नंदी

प्रचंड गर्दीत ‘धर्मवीर २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे रसिकांकडून स्वागत होत असल्याचे पाहून आमचा ऊर भरुन आला आहे. कां की, आम्हीही काही वर्षे ठाण्यात राहून आलो आहो. तेथे आम्हाला ठेवण्यात आले होते. ठाण्यात काही मोठी माणसे राहतात, काही ॲडमिट होतात, हे उघड आहे.

‘धर्मवीर २’ च्या प्रीमियरला आम्ही उपस्थित राहिलो. तेव्हा आमचे उपपरममित्र नानासाहेब फडणवीस हे चित्रपट चालू असताना अंधारातच नोट्स घेत होते. त्यांच्या करेक्ट मागल्या सीटवर आम्ही होतो.

‘‘काय लिहिताय?,’’ आम्ही उत्सुकतेने विचारले. शुक..शुऽऽ…चूप असे आवाज आमच्या मागल्या बाजूने (पक्षी : मागल्या रांगेतून) आले. आम्ही दुर्लक्ष केले. ‘‘अहो, धर्मवीर ३ ची पटकथा मी लिहिणार आहे,’’ नानासाहेबांनी मान वळवून आमच्या डाव्या कानात कुजबुजून सांगितले. आम्ही च्याट पडलो!

‘‘ काय सांगताय काय?,’’ आम्ही चित्कारलो. पाठीमागून (पक्षी : मागल्या रांगेतून) पुन्हा काही निषेधाचे आवाज आले. ‘‘धर्मवीर २ जिथे संपतो, तिथूनच धर्मवीर ३ सुरु करावा, असा आधी विचार होता, पण आता संपूर्णपणे वेगळं कथानक डोक्यात शिजलंय!’’ नानासाहेबांनी पेनाने डोके खाजवत सांगितले. त्यांच्या मुखावर सृजनाची प्रभा फांकली होती. अंधारातही आम्हाला ती स्पष्ट दिसली.

‘‘तुमच्या डोक्यात काय काय शिजेल, सांगता यायचं नाही!,’’ आम्ही कौतुकोद्गार काढले. पुन्हा मागल्या बाजूने (पक्षी : मागल्या रांगेतून! दरवेळी हा खुलासा करणे कठीण आहे!) आवाज आले. यावेळी त्या आवाजात एकप्रकारची चीड होती. कारण खास ठाण्यातच ऐकू येतात, असे काही शब्द उच्चारले गेल्याचे आम्ही ऐकले, आणि कानाआड केले.

सुप्रसिद्ध पटकथाकार फडणवीसनाना यांनी धर्मवीरः३ लिहायला घेतला आहे, ही खळबळजनक ब्रेकिंग न्यूज आमच्या एकट्याच्या कानांत होती. कधी एकदा जगाला ही बातमी देतो, असे झाले होते. ‘‘साधारण स्टोरीलाइन सांगा की, साहेब!’’ आम्ही अंधारातच गळ घातली, आणि उजवा कान पुढे केला. नानासाहेबांनी एक सुस्कारा सोडला, आणि थोडक्यात कथासूत्र ऐकवले…

‘‘धर्मवीर २ मध्ये नवा नायक महाराष्ट्राला मिळतो. फर्स्ट डिव्हिजनमध्ये बीए पास करुनही त्याला आवडता गाजर का हलुवा मिळत नाही. तो हिरमुसतो. पण एक चतुरबुद्धी चतुरसेन त्याच्या मनातील भावना अचूक ओळखून त्याला गाजर का हलुवा लांबून दाखवतो,

आणि सांगतो, माझ्यासवे येशील, तर गाजर का हलुवा काय, हलवायाचं सगळं दुकान शेवगाठियासकट मिळेल…‘धर्मवीर २’ चा नायक मनाचा हिय्या करुन खोक्यात बसून शिताफीने पळतो, आणि हलवायाच्या दुकानात जाऊन बसतो…अशी साधारण स्टोरी आहे!’’

‘‘सिनेमा बिग बजेट असणार…ना?’’ आम्ही.

‘‘बिगबजेट, मल्टिस्टारकास्ट ब्लॉकबस्टर..!,’’ नानासाहेबांनी नोट्स पाहून उत्तर दिले.

‘‘ व्हिलन कोण?’’ आम्ही उत्सुकतेने विचारतें जाहलो.

‘‘तीन आहेत! तिघांचेही बुर्जे उडतात, असं दाखवलंय!’’ नानासाहेबांनी विजयी मुद्रेने सांगितले.

‘‘नायकही तीन असतील?,’’ आम्ही.

‘‘एक हिरो, आणि दोन साइड हिरो आहेत!,’’ नानासाहेबांनी खुलासा केला.

‘‘धर्मवीर २ चा नवा नायक कंटिन्यू करणार की नवीन कास्टिंग?’’ आम्ही नकळत तपशीलात शिरलो.

‘‘अंहं! धर्मवीर २ मधला नवा नायक धर्मवीरः३ मध्ये साईड हिरो असणार...,’’ मान हलवत नानासाहेब म्हणाले.

‘‘अरेच्चा!,’’ आम्ही मघाशीच च्याट पडलो होतो, पण ‘अरेच्चा’ आत्ता म्हटले इतकेच.

‘‘धर्मवीर ३ ची कथा नागपुरात सुरु होते, मिस्टर!’’ नानासाहेब म्हणाले, ‘‘ धर्मवीर ३ : मैं फिरसे आऊंगा..’ असं चित्रपटाचं पूर्ण टायटल आहे!’’

…आम्ही पुन्हा ठाण्यात येऊन ॲडमिट झालो आहो!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: रघुराम राजन मोदी सरकारच्या 'या' योजनेचे झाले फॅन; दिला महत्त्वाचा सल्ला

Israel Attack On Lebanon : इस्राईलने 10 दिवसांत मोडलं हिजबुल्लाचं कंबरडं; जाणून घ्या आत्तापर्यंत कधी काय झालं?

Pune Crime: दोघांनी अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये नेलं; एकाने लैंगिक अत्याचार केला तर दुसऱ्याने वहिनी म्हणून विनयभंग

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

Vegetables Rate: टोमॅटोचे दर भिडले गगणाला, गृहिणींचे बजेट बिघडले

SCROLL FOR NEXT