तुम्ही काय पन बोला, नानाला आपला सलाम आहे. अरे, नाना की बदौलत आपन जिंदगीमधे काहीतरी करू शकलो. वरना आपल्यासारक्या सडकछाप मान्साला आजकाल कोन वाली आहे? जो येतो तो हात पुडे करतो. सर्व्यांना चिरीमिरी हवी. आपल्यालाच कोनी देयाला तयार नाही. परवा भर बॉम्बेमधे नानानी "फेरीवाल्यांणा पन मण णाही का?' असा शंभर नंबरी सवाल टाकला. सगळ्यांचा आवाज बंद. एकदम बंद! बोललो, ये है अपना असली हिरो. शेतकरी बेजार झाला, धावला नाना! फेरीवाले हैरान झाले, धावला नाना!! नाय तर आपन...लॅंड्सएंडला शूटिंग लागल्याची न्यूज ऐकल्यावर आर्जंट शूटिंग बघायला धावतो. नानाचं तसं नाय...एकवेळ शूटिंगला नाय धावनार, पन फेरीवाल्यांसाठी हंड्रेड मीटर स्प्रींट मारनार. म्हनून आपल्याला बाकीचे ष्टारलोक येवढे पसंद नाय येत. क्यूं की नाना के पास दिल है, दिल!!
बिचारे रस्त्यावर वरडून वरडून माल विकतात, त्यांनाच तुम्ही फटके देता? गरिबांची रोजीरोटी छिनून काय तुम्हाला भेटनार? असा एकदम मनशे सवाल त्यांनी केला... आपल्या डोळ्यात डायरेक पानी, माहिताय! आजकाल रस्त्यावरच्या गरीब लोकांची कोन इतकी बाजू घेतो? पन नानानी घेतली. इसलिये नानाला सलाम. नानाचं भाशन ऐकून इज्जतीत बबन गन्नेवाल्याकडे गेलो. बिचारा ठेला रिकामा करून नुसताच बसलेला. बोललो, ""बबन्या, ऐसा क्यूं बैठेला हय? तेरे गन्ने किधर गए? काम धाम नै क्या?'' बबन्या बोलला, ""बाबा रे, क्या करू? धंदा लावला तर मनशेवाले येऊन आपल्याच उसाच्या कांडकानं आपल्याला हानतात. नाय लावला तर थोच ऊस तिच्या *** ***...!!!''
बबन्याची कंडिशन बगूण वायट वाटलं. फेरीवाले पन मान्संच असतात णा? त्यांणा पन मण असतंच णा? त्यांणा पन पोरंबाळं, फ्यामिली असतेच णा? सुब्बेशे शाम तलक वरडत वरडत टोपलीभर माल विकायचा. वर पोलिसलोक, मुन्शिपाल्टीवाले ह्यान्ला चिरीमिरी देयाची. उरलेली चिल्लर घेऊन घरी वापस येयाचं...ही काय जिंदगी आहे? फेरीवाले इस बॉम्बेकी जान है. बॉम्बेच्या रस्त्यावर आज काय भेटत नाही? दुनिया भेटते. इसलिए, फेरीवालों को मत सताव...
रस्त्यातच मंग्या भेटला. बोलला, सांजच्याला साहेब मार्गेदर्शन करनार आहेत. रंगशारदाला ये आर्जंट.
साहेबांचं मार्गेदर्शन आपन आजपरेंत चुकवलं नाही. साहेब माझे, मी साहेबांचा!! साहेबांसाठी आपन आजच्या तारखेपरेंत किमान दोन डझन टायरं जाळली आहेत. ज्यास्ती आवाज केला की खळ्ळ नाय तर खट्यॅक...दुसरी बात नाही. साहेबांच्या भाशनाला गेलो. साहेब बोलले, ""शंभर रुप्पये हप्ता रोजचा देतो तो फेरीवाला गरीब कसा? तुम्ही लोक फेरीवाल्यांकडून भाजी घेऊ नका. बाकायदा दुकानात जाऊन घेया!! ह्या लोकांनी बॉम्बेची वाट लावली...'' आपल्याला पटलं. हल्ली साधी बाइक पन गल्लीत घालणे इंपॉशिबल झाले आहे. दोन्ही साइडला फेरीवाले!! मग काय होनार? त्यात रस्त्याची वाट लागलेली. मान्साने चालायचं तरी कसं? आपन साहेबांन्ला मानतो. बॉम्बेची काळजी करनारा एकमेव मराठी मानूस म्हंजे साहेब!! बाकी सर्वे निस्ती दुभती गाय म्हनून बॉम्बेकडे बघतात. हाय हुबी, घ्या पिळून!! अशानं बॉम्बेची वाट लागनारच.
साहेब नानाची डिक्टो टु डिक्टो माशी टु माशी नक्कल मारतात. खरं तर ते कोनाची पन सॉल्लिड नक्कल मारतात. नानाच्या ष्टाइलमधे बोलले, "" त्यांणा का मण णाही? दु:ख देऊ नका रे असं...'' हाहाहा!! हसून हसून आपली वजडी पिळवटली!! "पुन्ना फेरीवाला बसवू नका, हात जोडतो. पुन्ना सांगायला लावू नका, मग हात सोडावा लागंल,' असा साहेबांनी डवॉयलॉक टाकला. भाएर येऊन फेरीवालाच शोधायला लागलो. गावला असता, तर आईच्यान...
...आपल्याला नाना पन आवडतो, साहेब पन आवडतात. पन दोघं रोडच्या दोन साइडला हुबे.-आपन मधल्यामधे!! अबी क्या करें?
|