गुणवंतांच्या शिक्षणासाठी दानयज्ञ sakal
संपादकीय

गुणवंतांच्या शिक्षणासाठी दानयज्ञ

विद्यार्थी विकास योजनेत विद्यार्थ्यांसाठी एकच अट असते. ती म्हणजे उत्तम गुण मिळवून आपले उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण करावे. विशेष म्हणजे, ही अट पूर्ण करून यशस्वी झालेले विद्यार्थी नोकरी, उद्योग सुरू करतात आणि ते स्वयंस्फूर्तीने, अत्यंत कृतज्ञ भावनेने याच योजनेचे देणगीदार बनतात.

सकाळ वृत्तसेवा

विद्यार्थी विकास योजनेत विद्यार्थ्यांसाठी एकच अट असते. ती म्हणजे उत्तम गुण मिळवून आपले उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण करावे. विशेष म्हणजे, ही अट पूर्ण करून यशस्वी झालेले विद्यार्थी नोकरी, उद्योग सुरू करतात आणि ते स्वयंस्फूर्तीने, अत्यंत कृतज्ञ भावनेने याच योजनेचे देणगीदार बनतात.

- शैलेंद्र बोरकर, पुणे

शैक्षणिक कारकीर्द उत्तम असलेल्या, उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या, स्वबळावर काही करू पाहणाऱ्या परंतु उच्च शिक्षणासाठी पुरेसे पाठबळ नसलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्रात गेल्या चौदा वर्षांपासून एक महत्त्वपूर्ण योजना चालवली जात आहे. गुणी, कष्टाळू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या या योजनेचे नाव आहे विद्यार्थी विकास योजना.

ज्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला बारावीनंतरचे उच्च शिक्षण घ्यायचे आहे, ज्याची शैक्षणिक प्रगती उत्तम आहे, अशा विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण केवळ आर्थिक कारणांमुळे अडू नये, यासाठी अशा विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व साहाय्य करणारी ही योजना आहे. योजनेत सहभागासाठी एकच अट आहे आणि ती म्हणजे विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून आपले उच्च शिक्षण पूर्ण करावे.

ठाणे जनता सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रवींद्र कर्वे हे काम करत होते. या पदावरून सेवानिवृत्त होतानाच समाजासाठी काहीतरी भरीव कार्य करण्याचे निश्चित केले होते. त्याच विचारातून त्यांनी विद्यार्थी विकास योजना सुरू केली. श्रीकृष्ण हंबर्डे, अरुण करमरकर, शरद गांगल, संजीव करंदीकर या सामाजिक कार्यकर्त्यांची आणि अनेक मित्रांची मोलाची साथ कर्वे यांना मिळाली आणि हा उपक्रम विस्तारत गेला. सेवा सहयोग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही योजना कार्यान्वित केली जाते.

या योजनेत विद्यार्थ्यांची निवड करण्याची प्रक्रिया तशी साधी, सोपी पण थोडी आगळी वेगळी आहे. कोणत्याही माध्यमातून माहिती मिळवून विद्यार्थ्यांचा विद्यार्थी विकास योजनेच्या कार्यालयात संपर्क झाला की प्रथम त्याचे दहावी आणि बारावीचे गुण पाहिले जातात. त्याच्या स्वतःच्या गुणांवर तो पुढील अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतो का हे पाहिले जाते आणि त्याची निवड होते. विद्यार्थी ज्या भागात राहतो त्या जिल्ह्यातील संस्थेच्या कार्यकर्त्याकडे ज्याला मदतनीस म्हणता येईल, त्याच्याकडे या विद्यार्थ्याचे नाव, पत्ता दिला जातो. त्यानंतर होतो गृह संपर्क. त्या विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थिनीच्या घरची परिस्थिती आणि घरच्या मंडळींची मनःस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी हा गृह संपर्क केला जातो. समितीचे कार्यकर्ते स्वखर्चाने प्रवास करून हा संपर्क करतात. या संपर्कात गप्पांमधून आई-वडिलांशी बोलण्यातून ते मुलाच्या शिक्षणाबाबत काय विचार करत आहेत, हे समजून घेतले जाते. घरच्या लोकांच्या या सकारात्मक प्रतिसादावरच विद्यार्थी पाच वर्ष या योजनेमध्ये राहून उत्तम यश संपादन करतो असा अनुभव रवींद्र कर्वे सांगतात.

गृह संपर्कानंतर विद्यार्थ्याची निवड झाली की त्याला प्रवेश अर्ज देऊन या योजनेमध्ये सहभागी करून घेतले जाते. त्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शैक्षणिक वर्षाची फी त्याच्या महाविद्यालयाच्या खात्यात थेट संस्थेच्या खात्यातून भरली जाते. फी भरण्याची ही पद्धत खूप विचार करून ठरवली गेली आहे. या योजनेतील सर्व व्यवहार हे डिजिटल स्वरूपात होतात. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अत्यंत विश्वासार्ह ठरते.

या योजनेची काही वैशिष्ट्ये आवर्जून सांगायला हवीत. मुख्य म्हणजे ही संपूर्ण योजना समाजातून जो निधी मिळतो त्यातून चालते. वैयक्तिक सहाशे दाते, तसेच अनेक संस्था, संघटना या योजनेसाठी निधी देतात. शंभरहून अधिक कार्यकर्ते आहेत, जे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जातात. पाचशेहून अधिक हितचिंतक आहेत. ज्यांचा निरपेक्ष हातभार या योजनेला लागतो. शहरांबरोबरच ग्रामीण भागातूनही योजनेला वाढता प्रतिसाद आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ही योजना पोचली आहे. निवडल्या जाणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींचेही प्रमाण वाढते आहे. वैयक्तिक आणि संस्थात्मक दात्यांमुळे हे शक्य झाले आहे. या योजनेतील प्रत्येक विद्यार्थी हीच यशोगाथा आहे. या योजनेतून साहाय्य घेऊन गेल्या चौदा वर्षात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची संख्या आहे १ हजार ७९. तर सध्या या योजनेत ८९७ विद्यार्थी असून एकूण संख्या आहे १९७६. या योजनेद्वारे उच्च शिक्षणासाठी २१.०६ कोटी, तर ग्रामीण भागातील शाळा पुनर्बांधणी आणि शैक्षणिक साधने यासाठी ७.४० कोटी असे एकूण २८.४६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे.

या योजनेतील प्रत्येक विद्यार्थी आपले शिक्षण उत्तमरीतीने पूर्ण करून नोकरीत वा स्वतःच्या व्यवसायात उत्तम कामगिरी करत आहेत. हे विद्यार्थी आता कृतज्ञता भावनेतून या योजनेचे देणगीदार बनले आहेत आणि आपल्या पुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च उचलत आहेत. त्यांनी सक्रिय सहभाग घेत या योजनेसाठी ५१ लाख रुपये दिले आहेत. त्यांची ही कृती सर्वात महत्त्वाची म्हटली पाहिजे.

(लेखक ‘सेवा भारती’ या अखिल भारतीय संस्थेचे पदाधिकारी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT