dr aashutosh malwankar sakal
संपादकीय

‘नो सर’ म्हणण्याचे धारिष्ट्य असलेले मावळणकर

अरुण खोरे

पंडित नेहरूंनी ज्यांचा गौरवोल्लेख ‘फादर ऑफ लोकसभा’, असा केला होता, ते भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांचे नातू डॉ. आशुतोष मावळणकर यांच्याशी पुण्यात झालेल्या भेटीवर आधारित लेख.

डॉ. आशुतोष मावळणकर यांच्याशी एक छोटीशी भेट अलीकडेच पुण्यात झाली. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. त्यांचे वडील म्हणजे नामवंत संसदपटू पुरुषोत्तम मावळणकर हे होत. अपक्ष खासदार असलेल्या मावळणकरांशी माझा परिचय होता, त्याची दोन कारणे. त्यातले एक ‘सकाळ’शी संबंधित. 

पुण्याच्या बालगंधर्व  रंगमंदिरमध्ये ३१  डिसेंबर १९८१ रोजी सकाळ वृत्तपत्राचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम मावळणकर होते. मी तेव्हा ‘सकाळ’मध्ये काम करत होतो आणि सुवर्ण महोत्सवाच्या समारंभाला आम्ही सगळेजण सायंकाळी ‘बालगंधर्व’मध्ये गेलो होतो. ‘सकाळ’चे तत्कालीन संपादक श्री. ग. मुणगेकर यांच्या आग्रहामुळे ‘सकाळ’सारख्या मोठ्या वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवाला मावळणकर आले होते.

‘वृत्तपत्रांची भूमिका ही विरोधी पक्षाप्रमाणे असली पाहिजे, कारण त्यामुळे आपला विवेक जागा राहतो, असे सांगून तटस्थ आणि नि:पक्षपाती विचारांचा पाहुणा बोलवावा’, असे मत मुणगेकर यांनी मांडले व ते मान्य झाले. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मावळणकरांची झालेली ओझरती पहिली भेट अजूनही आठवते. त्यानंतर जवळपास दहा वर्षांनी मी गुजरातची लोकसभा निवडणूक कव्हर करायला गेलो होतो.

तेव्हा ते अहमदाबाद मतदारसंघातून उमेदवार होते. त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे गुजरातमधील प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांनी फार जोरदार वातावरण निर्माण केले होते. त्या वातावरणात अपक्ष उमेदवार म्हणून मावळणकर सर निवडणूक लढवत होते. अर्थात त्यात ते पराभूत झाले.

नेहरू, पटेलांशी स्नेह

या सगळ्या पार्श्वभूमीवर मावळणकरांशी नंतर माझा पत्रव्यवहारही झाला. त्यांना शेवटच्या काळात पार्किन्सनचा आजार झाला होता. त्यामुळे त्यांना लिहिता येत नव्हते. सहायकाकडून पत्र लिहून थरथरत्या हाताने सही करून त्यांनी ते मला पाठवले होते. भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष असलेले दादासाहेब मावळणकर हे गुजरातमधील एक फार मोठे नेते. तिथे स्थानिक संस्थांच्या राजकारणापासून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणापर्यंत ते आपल्या कामाने आणि व्यासंगाने पुढे गेले.

पंडित नेहरू, सरदार पटेल यांचा आणि त्यांचा फार घनिष्ठ स्नेह होता. दादासाहेबांचे नातू असलेले डॉक्टर मावळणकर यांनी मला सांगितले की, अहमदाबादमधील भद्र भागात वडील पूर्वी राहत होते. त्यांचे शेजारी होते सरदार पटेल. त्यामुळे दोघांच्या नेहमी भेटी व्हायच्या, गप्पा व्हायच्या. अनेकदा सरदार घरी पण यायचे. त्यानंतर मग महाराष्ट्र सोसायटीच्या भागात दादासाहेबांनी टुमदार बंगला बांधला. तेथे आम्ही लहानाचे मोठे झालो, असे त्यांनी सांगितले.

या बंगल्यातील दर्शनी भागात डॉ. मावळणकरांच्या पिताजींनी म्हणजे संसदपटू मावळणकर यांनी  दादासाहेबांचे एक फार सुंदर असे मोठे तैलचित्र लावले आहे. दारातून प्रवेश केल्यावर ते आपल्याला पाहायला मिळते. ज्यांनी भारतीय संसदेच्या विविध कार्यपद्धतींना चालना दिली, तसेच संसदीय लोकशाहीचा कारभार नेटकेपणाने नियमांच्या आधारे चालेल, याची काळजी घेतली. आज ज्या संसदीय प्रथा परंपरा निर्माण झाल्या आहेत, त्यातील अनेक गोष्टींची सुरुवात ही दादासाहेबांनी केली. मावळणकरांनी त्याचा उल्लेख माझ्याशी बोलताना अनेक वेळा केला होता.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभाराचा ठराव करण्याची प्रथा आणि त्या निमित्ताने व्यापक चर्चेचा संवाद सुरू करण्याचे श्रेय दादासाहेबांना जाते. म्हणूनच नेहरूंनी त्यांना ‘फादर ऑफ लोकसभा’ असे म्हटले होते. नेहरूंचे आणि त्यांचे खूप चांगले मैत्र होते, असे मला मावळणकर सरांनी सांगितले होते.

अहमदाबादमधील नव्या बंगल्यात ‘हेराल्ड लास्की सेंटर’ त्यांनी सुरू केले होते. वैचारिक आणि राजकीय भूमिका मांडण्यासाठी त्याच्यातर्फे काही प्रकाशनेदेखील होत असत. विशेषतः संसदीय लोकशाहीच्या पैलूंना स्पर्श करणारे अभ्यास निबंध या प्रकाशनातून प्रसिद्ध होत असत. अशी काही छोट्या निबंधाची पुस्तके त्यांनी मला भेट दिली होती.

आपल्या पित्याबद्दल बोलताना आशुतोष मावळणकर भारावून गेले होते. वडिलांचे निधन झाले त्या दिवशी आम्ही अंत्यविधीची तयारी करत होतो. थोड्या वेळाने गांधीनगर मधून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातील सचिवाने फोन करून ‘‘नरेंद्रभाई अंत्यविधीला येत आहेत’, अशी माहिती दिली. ते आले होते आणि आम्हा कुटुंबीयांशी बोलून त्यांनी सांत्वन केले होते, असे डॉ. मावळणकर यांनी सांगितले.

वडील वारल्यानंतर ‘लास्की सेंटर’ आम्हाला बंद करावे लागले. त्या काळात वडिलांना हे केंद्र सुरू करताना ज्यांनी आजीव वर्गणी दिली होती, त्यांचे पैसे आम्ही परत केले. ते घेताना हे सगळे लोक आश्चर्यचकित झाले होते! कारण हा कदाचित अनुभव त्यांना नवीन असावा. पण वडिलांची आम्हाला शिकवण होती; त्याप्रमाणे आम्ही केले, असे  डॉ.मावळणकर म्हणाले. 

आणीबाणीच्या काळात माझ्या वडिलांना अटक झाली नाही. पण त्यांनी लोकसभेत भाषण करताना तत्कालीन केंद्र सरकारच्या प्रत्येक भूमिकेला विरोध केला होता. आणि सगळेजण ‘येस सर’ म्हणत असताना मावळणकर मात्र ‘नो सर’ म्हणत होते. त्यांच्या या भाषणांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. त्या जुन्या इंग्रजी पुस्तकाची प्रत डॉक्टर मावळणकर यांनी मला दिली. 

दादासाहेब मावळणकर, नंतर पु.ग. मावळणकर आणि आता त्यांचे चिरंजीव डॉ.आशुतोष मावळणकर अशा तिन्ही पिढ्यांचे एक दर्शन या गप्पामधून मला झाले. या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वातील सात्विकता, सचोटी आणि व्यासंगाची दिशा अभेद्य असल्याचे जाणवले.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT