various Persons sakal
संपादकीय

भाष्य : सहविचाराचा नेतृत्वधर्म

जेव्हा विविध प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र येतात तेव्हा या वैविध्याचे स्वागत केले पाहिजे. वैविध्य हा सृष्टीचा व आजच्या युगाचा धर्म आहे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. अजित कानिटकर

जेव्हा विविध प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र येतात तेव्हा या वैविध्याचे स्वागत केले पाहिजे. वैविध्य हा सृष्टीचा व आजच्या युगाचा धर्म आहे. एक तर शंभर टक्के आज्ञाधारकता किंवा दुसरीकडे वितंडवाद, या दोन्ही टोकांपासून दूर राहून सुवर्णमध्य साधता येतो. देशातील सध्याच्या राजकीय स्थितीत हा संदर्भ खूपच महत्त्वाचा ठरतो.

अनेक भिन्न प्रवृतींच्या व्यक्तींच्या समूहाने काही काळ अथवा दीर्घकाळ काम करणे, यासाठी उपयुक्त व प्रभावी नेतृत्वशैली या विषयांवर अनेक पुस्तके जगात लिहिली गेली आहेत; विशेषतः गेल्या पन्नास वर्षांत. मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र यांचा अभ्यास करून या ज्ञानाचे उपयोजन उद्योग-व्यवसाय, सैन्य किंवा राजकीय क्षेत्र यांत कशारीतीने करता येईल, याचे दिशादर्शन त्यात असते.

नेत्याच्या कोणत्या निर्णयशैलीमुळे अंतिमतः उद्योग व्यवसायाची वाटचाल भरभराट होत गेली; अथवा लढाईत विजय अथवा पराभव झाला, असे निष्कर्ष त्यात असतात. आपल्या देशात लोकसभेच्या जूनच्या निवडणूकनिकालानंतरचे संदर्भ लक्षात घेता हा विषय आपल्या समाजजीवनासाठी  महत्त्वाचा ठरेल.

विविध क्षमतांच्या, विचारसरणीच्या, प्रवृत्तीच्या व प्रसंगी मतमतांतराच्या व्यक्तींना एकत्र बांधून संस्था-संघटना-अथवा उद्योग संघटना यांचे काम प्रगतिपथावर नेणे याचेही एक शास्त्र आहे. गटाच्या वाटचालीत अनेक आंतर्प्रक्रिया होतात. असे गट एकत्र आल्यानंतर पहिली पायरी म्हणजे एकत्र काम कसे करायचे, हे ठरत असताना काही खडखडाटही  होतो. छोटी मोठी वादळेही येतात.

त्या वादळातून सुखरूपपणे बाहेर येऊन मग गटाने कसे काम करायचे, याचे संकेत ठरतात. कोणत्या पद्धतीने सुकाणू न्यायचे हे ठरते. मग एकदा हे संकेत म्हणजेच कार्यसंस्कृती ठरली की तो गट ठरलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे उत्तम पद्धतीने वाटचाल करतो. इंग्रजीत या चार प्रक्रियांचे वर्णन केले आहे ते forming, storming norming and performing या शब्दांनी. 

गप्प बसण्याचे दुष्परिणाम

गटामध्ये, त्याच्या विचार व निर्णयप्रक्रियेमध्ये आणखी एक महत्त्वाची प्रक्रिया होत राहते. ती म्हणजे ‘गप्प’ बसण्याची. गप्प बसणे म्हणजे आपले मत न मांडणे. 'कशाला चांगल्या कामाला नकारघंटा वाजवायची’, ‘चालले ते सगळे ठीक असताना उगाच कशाला वेगळे मत मांडून हसे करून घ्या’ इत्यादी. याचे साधे उदाहरण पाहू. समजा १९७० मध्ये ११ वी उत्तीर्ण झालेल्या वर्गमित्रांचा गट एकदम २०२४ मध्ये एकत्र जमतो.

रविवारी सिंहगडला जाऊयात असा विचार मांडला जातो. सर्वांची वये ७०च्या आसपास. सगळेजण हो ला हो म्हणतात. खरे तर रविवारी ‘सिंहगड’वर प्रचंड गर्दी असते. पावसामुळे रस्ते घसरडे झाले असतात. दोन्ही बाजूला रस्त्यांवर गर्दीमुळे ट्रॅफिक तुंबलेले असते. याचा अनुभव गटातील एका मित्राने अगोदरच्याच महिन्यात घेऊन आलेला असतो; पण या व अनेक मुद्यांकडे गटाचे पूर्ण दुर्लक्ष होते. दुर्लक्ष होते हे म्हणणेही चूक आहे.

याचे कारण गटातील एका व्यक्तीला असे म्हणायचे असते; पण व्यक्त झालेल्या सहमतीत खोडा कशाला घालायचा, असा विचार करून व्यक्ती गटाच्या अव्यक्त दबावामुळेच शांत बसते. सर्वजण ‘सिंहगड’ला जायचे ठरवतात आणि जसे घडायचे तसेच घडते! पायथ्यापाशीच दीड तास जाताना व येताना अडीच तास वाहनांच्या गर्दीमध्ये एका जागी थांबावे लागते.

प्रचंड गर्दी असल्याने अर्ध्या वाटेवरून परत यावे लागते आणि एका ज्येष्ठाचे हृदयाचे ठोकेही चुकतात. याच व्यक्तीने रविवारऐवजी म्हणजे मंगळवार किंवा बुधवारी सहलीला जाऊ, हे का सुचवले नाही? त्याचे कारण गटामध्ये एकमताचाही अतिरेक होणे! याच प्रक्रियेला गटविचार ( ग्रुप थिंक) आणि प्रमाणाबाहेरची सहमती (ग्रुप कोहेजन) असे म्हटले जाते.

आपण या गटाबरोबरच आहोत आणि गटापेक्षा ‘विरोधी’ म्हणजे वेगळा विचार जर केला तर आपली गटनिष्ठा नाही, असा इतरांचा समज होऊन आपल्यावर ठपका येऊ नये म्हणून ती व्यक्ती आपले मत मांडायला घाबरते.  परिणाम अत्यंत धोकादायक ठरू शकतात.

१९६०-६१ च्या काळातील अमेरिका व नंतर अमेरिका व रशिया यांच्यातील क्युबा क्षेपणास्त्रांच्या तणावामधील केनडी सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या सर्व निर्णयप्रक्रियांचे जेव्हा अनेक वर्षांनी तज्ज्ञांनी बारकाईने विश्लेषण केले, तेव्हा त्यांना असे लक्षात आले की सरकारमधील सर्व अतिबुद्धिमान व तज्ज्ञ मंडळींचा हा गट ‘ग्रुप थिंक’ या प्रक्रियेत बळी गेला होता.

प्रत्येकाने आपली नीरक्षीर  विवेक करण्याची बुद्धीची क्षमता जणू काही त्या दिवसात गहाण ठेवली होती. त्यामुळे क्युबामध्ये अमुक एक प्रकारे कृती करावी, ही राष्ट्राध्यक्षांची सूचना कोणतीही विरुद्ध प्रतिक्रिया न येता, साधकबाधक चर्चा न होता सर्वांनी मान्य केली. या चुकीच्या निर्णयप्रक्रियेमुळे जग जणू काही तिसऱ्या महायुद्धाच्या व अण्वस्त्र विध्वंसाच्या उंबरठ्यावरच येऊन पोचले.

वरील दोन उदाहरणे आपल्यासाठी महत्त्वाची आहेत, याचे कारण आपल्या देशात अशाप्रकारे एकत्र विचार करून त्यातून सकारात्मक निर्णयाकडे जाण्याचे वातावरण व प्रशिक्षण याची अजून पुरेशी खोलवर जाणीव झालेली नाही.  एक तर शंभर टक्के आज्ञाधारकता किंवा दुसरीकडे १०० टक्के वितंडवाद व त्यातून फाटाफूट, ताटातूट, त्यातून मतभेद आणि मनभेद.

पण यातही एक सुवर्णमध्य असू शकतो, याचे मानसशास्त्रीय अंगाने संशोधन व प्रत्यक्ष प्रयोग पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीचे डॉ. अप्पा पेंडसे यांनी त्यांच्या १९६०च्या पीएचडी प्रबंधात मांडले. एक कोणीतरी राजा किंवा हुकूमशहा सांगेल आणि सर्व प्रजा हलेल ही एकाधिकारशाही बाजूला ठेवून आणि दुसरीकडे वितंडवाद बाजूला ठेवून मध्यममार्ग म्हणजे मोकळ्या मनाने,  सर्वांनी आपापले विचार एकत्र मांडणे.

त्यातील चांगले-वाईट घटक तपासून घेऊन त्याकडे निःपक्षपातीपणे बघणे आणि मग त्या उद्योगाचा वा संस्थेचा जो कोणी नेतृत्व करणार असेल त्याने सारासार विचार करून एक मध्यम-उत्तम मार्ग निवडायचा. असा सहविचार,  सर्वांचा एकत्र विचार आणि त्यातून जो सगळ्यात चांगला पर्याय असेल त्या पर्यायाची नेत्याने केलेली निवड आणि ती निवड सर्वांच्या विचारांती झाली असल्यामुळे त्यामध्ये समावेश असलेल्या प्रत्येकाला तो निर्णय आपलाच आहे, असे वाटून त्याची १०० टक्के कार्यवाही! 

ही निर्णयपद्धतीची व विचारमंथनाची संस्कृती आपल्याकडे येणे खूप आवश्यक आहे.  केवळ कारखाने अथवा उद्योग-व्यवसाय यामध्ये नाही, तर ज्या ज्या ठिकाणी अनेक व्यक्ती, एकत्र कोणत्यातरी ध्येयासाठी येतात,  त्या सर्वच संघटित क्षेत्रामध्ये या प्रक्रिया आवश्यक आहेत.

स्वामी  विवेकानंदांनी, महात्मा गांधी यांनी विविध ठिकाणी  म्हटले आहे की, खोलीचे दरवाजे आणि खिडक्या उघडे असू देत आणि वेगवेगळ्या प्रकारचे विचार आतमध्ये येऊ देत. पश्चिमेचे तंत्रज्ञान व पूर्वेचे अध्यात्म यातून नवा भारत घडवू असे विवेकानंद म्हणत.

तात्पर्य, जेव्हा विविध प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र येतात तेव्हा या वैविध्याचे स्वागत केले पाहिजे. वैविध्य हा सृष्टीचा व आजच्या युगाचा धर्म आहे. सर्व फुले एकसारखी असली, सर्व झाडे एकाच उंचीची असली, सर्व प्रजाती एकसारख्याच असल्या,  सर्व माणसे एकसारखी दिसू लागली, तरी जग नीरस व कंटाळवाणे असे होईल.  वैविध्य आहे त्यामुळे जगण्यात आनंद आहे.

ते टिकवण्यासाठी या वैविध्यातून समान धर्म शोधणे आणि तो परस्परांवर असलेला विश्वास ठेवत सहविचाराच्या पद्धतीतून अनेक प्रश्नांना सामोरे जाणे हाच खरा नव्या युगाचा धर्म आहे.  दिल्लीतील राजकीय परिस्थितीबद्दल अनेक तज्ज्ञांनी भाष्य केले आहे. विविध प्रकृतीच्या व्यक्ती एकत्र आल्यानंतरही उत्तम प्रकारे सहविचार करून देशाच्या हिताचे निर्णय घेता येऊ शकतात आणि त्याचा नव्याने पायंडा पडण्याची संधी जणू काही येत्या पाच वर्षात आहे, अशी आशा वाटते.

(लेखक आर्थिक-सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Aadhaar Update : अलर्ट! आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल; हे कागदपत्र नसेल तर बदलता येणार नाही माहिती

Kamthi Assembly Election 2024 : कामठीमधील १७ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त...निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मते घेण्यात ठरले अपयशी

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...

Stock Market: महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर अदानी शेअर्समध्ये तुफान वाढ; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीत

SCROLL FOR NEXT