Technology sakal
संपादकीय

विज्ञानवाटा : विद्याशाखांचा सर्जनशील मेळ

तंत्रज्ञानाने आजकाल सारे जीवन व्यापलेले आहे. आता बहुविध विषयातील ज्ञान तसेच आंतरविद्याशाखीय शिक्षण यांचा जमाना आहे.

डॉ. अनिल लचके

तंत्रज्ञानाने आजकाल सारे जीवन व्यापलेले आहे. आता बहुविध विषयातील ज्ञान तसेच आंतरविद्याशाखीय शिक्षण यांचा जमाना आहे. जो त्यात निपुण, अधिकाधिक विषयाचे ज्याला ज्ञान तो उद्योगधंदा आणि नोकरीत यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे.

उद्योगधंदा किंवा नोकरी यशस्वीपणे करताना आंतरविद्याशाखीय शिक्षण नक्कीच उपयोगी पडतं. विज्ञान, वैद्यक, वाणिज्य, कला, अभियांत्रिकी या शाखांमधील पदवीसह अन्य काही कौशल्ये असल्यास करिअरसाठी ते पूरक असतं. योग, सहयोग आणि उपयोग हे शिक्षणाचे तीन पैलू आहेत, असं आचार्य विनोबा भावे म्हणत.

माझे एक स्नेही भौतिकी-रसायनशास्त्र विषयात एम. एस्सी., पीएच.डी. झाले होते. ‘प्राचीन इतिहास’ हा त्यांचा विषय नव्हता. योगायोगाने त्यांना पुरातत्त्व खात्यात नोकरी लागली. उत्खनन करताना सापडलेल्या प्राचीन वस्तू किती जुन्या आहेत ते ‘कार्बन डेटिंग’ तंत्राद्वारे ठरवण्यासाठीचे आणि अन्य रासायनिक पृथक्करणाचे प्रशिक्षण त्यांना मिळाले होते.

त्यांना पुरातत्त्व (अर्क्यालॉजी) विषयातील सहकाऱ्यांच्या सहयोगामुळे आपोआप इतिहासाची गोडी लागली. याचा अर्थ रसायनशास्त्रातील पदवीधारकाचा अभ्यास/अनुभव पुरातत्त्व विषयाला पूरक ठरून त्यात तो मनस्वी रमून जातो! एवढंच काय; पण जगात जिथे उत्खनन चालते तेथील प्राचीन इतिहासात डोकावून त्यात करिअर करायची संधी मिळू शकते.

त्यातील निष्कर्षांवर आधारित शोधनिबंध प्रकाशित करता येतात. विज्ञान शाखेमधील व्यक्तीला पदव्युत्तर शिक्षणासाठी कदाचित कला शाखेमध्ये सहजासहजी प्रवेशही मिळाला नसता! विविध विद्याशाखांच्या सहकार्यामुळे अनेकांचं शिक्षण/प्रशिक्षण आणि संशोधन परिपूर्ण व बहुआयामी होऊ शकतं. दोन किंवा अधिक विषयांच्या संयोगामुळे संशोधनाला अधिक बळकटी येऊन ते दर्जेदार होते. या दृष्टीने विचार करून काही विद्यापीठांनी आंतरविद्याशाखीय शिक्षणासाठी दरवाजे खुले करण्यात स्वागतार्ह पुढाकार घेतला आहे.

सध्या अभ्यासाचे अनेक विषय न कळत काही प्रमाणात तरी आंतरविद्याशाखीय झालेले आहेत. जीवशास्त्रामध्ये वैद्यकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जेनेटिक्स, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैववैविध्यता आदी विषय एकमेकांत मिसळून गेल्यासारखे आहेत. केमिकल इंजिनिअरिंग किंवा बायोफिजिक्सची आवड असणाऱ्याला दोन्ही विषयात आवड आणि गती असायला पाहिजे.

बायोमेडिकल उपकरण (इन्स्ट्रुमेन्ट) बनवायचं असेल तर संशोधनाला वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकीशास्त्र, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, नॅनोटेक्नोलॉजी इत्यादी विषयांची जोड मिळावी लागते. कृषिविज्ञान, पर्यावरणशास्त्र, हवामानशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात तर सर्व विद्याशाखा येतात.

जीवशास्त्रातील पदवीधर विद्यार्थी जीनॉमिक्स, प्रोटियॉमिक्स, मेटॅबोलोमिक्स, ट्रान्सक्रिप्टोमिक्स या उपशाखांमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. अर्थशास्त्रात वाणिज्य, मानसशास्त्र, गणित, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र असे विषय येतात. गणित आणि संगणकशास्त्र यांचा संचार सर्वत्र असतो.

मानसशास्त्रामध्ये खूप उपशाखा असून त्यात मनोरचना, मनोविकार, मनोविश्लेषण आदी मुद्द्यांचा विचार होतो. या विषयाचे प्रवर्तक सिग्मन्ड फ्रॉइड (१८५६-१९३८) हे वैद्यकशास्त्रातील पदवीधर होते. त्यांनी रसायनशास्त्र, मज्जाशास्त्र, इंद्रियविज्ञानशास्त्र, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र अशा अनेक शाखांचा सखोल अभ्यास केला होता.

त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीचे मनोजीवन म्हणजे हवं असणारं सुख आणि त्याच्या आड येणारी बंधनं यांच्यातला नाट्यमय संग्राम असतो. या संघर्षात जो जेवढा यशस्वी होतो, तेवढं मानसिक स्वास्थ्य त्याला मिळू शकतं!

नल-दमयंतीच्या पौराणिक कथेत दमयंतीची तब्येत ठीक नसताना ती म्हणते ‘औषध नलगे मजला’ औषधापेक्षाही नल राजाचा भावनिक आधार दमयंतीला स्वास्थ्य मिळावं म्हणून हवाहवासा वाटतो. मनाच्या श्लोकांमध्ये अखेरीस समर्थांनी ‘मनाची शते ऐकता दोष जाती’, असं म्हटलंय.

मनाच्या अंतरंगात प्रवास केल्यावर नानाविध दोष कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे सायकोथेरपी, सायकोडेलिक थेरपी किंवा सायकोइम्युनोथेरपी अशा विषयांना का महत्त्व आलंय ते लक्षात येतं. या विषयांमध्ये रुग्णाचं मानसिक बळ वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते.

रोगप्रतिकारक पेशी शरीराच्या अनेक भागांमध्ये असतात. त्या आवश्यक ठिकाणी पोहोचवल्या जातात. मनोवैज्ञानिक उपचार पद्धतीमुळे काही व्याधींवर चांगले/पूरक परिणाम दिसले आहेत. मानसशास्त्राचा उपयोग व्यवसाय व्यवस्थापन आणि औद्योगिक क्षेत्रातही होतो.

तू जाग सके तो जाग!

संगणक आणि स्मार्टफोनचे प्रवर्तक स्टीव्ह जॉब्ज यांनी पदवीपूर्व शिक्षण घेताना कॅलिग्राफी, म्हणजे झोकदार हस्तलेखनाची कला शिकली होती. त्याचा उपयोग त्यांना मॅक संगणकासाठी आकर्षक ‘फॉन्ट’ तयार करण्यासाठी झाला होता. यामुळे त्यांना व्यावसायिक यश मिळत गेले.

‘लिबरल आर्ट्स अँड टेक्नॉलॉजी’ एकत्र यायला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. रोबोटिक्समध्ये करिअर करणाऱ्याला अभियांत्रिकीशिवाय संगणकशास्त्र, गणित, भौतिकीशास्त्र, मटेरियल सायन्स अवगत असावं लागतं. जैवतंत्रज्ञान विषयात तर कायदेपंडितांनाही भरपूर वाव आहे.

कारण कायदेशीर पेटंट लिहून ते दाखल करताना बौद्धिक आणि आर्थिक मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी ते आवश्यक असतं. यासाठी खास करून बायोएथिक्सची जाण असणं गरजेचं आहे. कारण टेस्टट्यूब बेबी, सरोगसी माता, जेनेटिक इंजिनिअरिंग, जेनेटिकली इंजिनिअर्ड वनस्पती/जीवाणू हे नवे शोध आहेत.

या संबंधीची पेटंटस् किंवा कायदेकानू तयार करताना सामाजिकशास्त्राची आणि जनमानसाची जाण असायला हवी. प्रत्येक विद्यार्थ्याची काही बलस्थाने असतात. यश मिळवण्यासाठी त्यांनी ती वेळीच ओळखायला पाहिजेत. संत कबीर म्हणतात- जैसे तील में तेल हो, जो चकमक (गारगोटी) में आग; तेरा साई तुझ में है, तू जाग सके तो जाग!

एखाद्या यशामागे आंतरविद्याशाखीय शिक्षण किती उपयोगी असू शकतं, या संबंधीचं उदाहरण लक्षणीय आहे. दक्षिण भारतातील भरतनाट्यम् ही अभिजात नृत्यशैली आहे. भाव, राग आणि ताल सांभाळून भरतनाट्यममध्ये नयनरम्य वेशभूषा, कायिक हालचाली, डोळ्यांमधील हावभाव, पदन्यास, हातांचे आणि मानेचे मोहक आविर्भाव करून एखादे कथानक सादर केले जाते.

अमेरिकेत वास्तव्य असलेल्या श्रियाच्या आईने ती पाच वर्षांची असतानाच भरतनाट्यम् शिकवायला सुरवात केली होती. श्रिया व्यावसायिक नृत्यांगना आहे. आता ती बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. आहे. सध्या मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये श्रिया पोस्ट डॉक्टरल फेलो आहे. दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव तयार करणाऱ्या बायॉनिक्स (बायोलॉजी+इलेक्ट्रॉनिक्स) विभागात तिचे संशोधन चालू आहे.

गँगरीन, अन्य व्याधींमध्ये, युद्धात किंवा अपघातात एखाद्या व्यक्तीला बोटे, हात, पाय, कान असा कोणताही अवयव गमावावा लागला तर त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी हुबेहूब असे अनेक अवयव तिने तयार केले आहेत. अशांना कृत्रिम अवयवाचा आधार मिळाला तरी त्यात सामान्य संवेदनांची अनुभूती मिळत नाही.

उदाहरणार्थ, टेकडी किंवा जिना चढताना सामान्य माणसाच्या पायाला, पोटरीला, कंबरेला होणाऱ्या संवेदना; अथवा कप हातात घेऊन कॉफीचा आस्वाद घेताना बोटांना होणाऱ्या संवेदनांचे ‘फीलिंग’ रुग्णाला होत नाही. त्यासाठी श्रियाने संशोधन करून छोटे रोबोट तयार केले.

भरतनाट्यम् मधील कायिक हालचाली करताना कोणकोणत्या स्नायूंना किती ताण पडतो, किती दाब पडतो, या संबंधीचा तिला अनुभव होता. त्यानुसार संवेदनांचे संदेश मेंदूंकडे पाठवणारे कलात्मक छोटे रोबोट तिने तयार करून कृत्रिम अवयवात बसवले. चाळीसपेक्षाही अधिक रुग्णांना ते चपखल बसले. एवढंच नव्हे तर त्यांना सामान्य माणसांसारखेच ते (कृत्रिम) अवयव असल्याची अनुभूती मिळाली.

याचे मोठे श्रेय भरतनाट्यम् मधील केलेल्या स्नायूंच्या हालचालींचा सूक्ष्म अभ्यास आणि सराव यामुळे शक्य झाल्याचे श्रियाला वाटते. या विषयावर ‘दि डिझाईन अँड दि क्राफ्ट प्रॉस्थेटिक्स’ हे पुस्तक डॉ. श्रिया श्रीनिवासन् हिने लिहिले आहे. या शास्त्राला बायोमेकॅक्ट्रॉनिक्स म्हणतात.

श्रियाचे अंगभूत गुण आणि नृत्यकलेची देणगी हा म्हणजे एक योग. प्रो. एच. हेर यांचे मार्गदर्शन हा सहयोग. त्यातून निर्माण झालेले हुबेहूब कृत्रिम अवयव हा गरजूंना झालेला उपयोग. विनोबाजी म्हणायचे शिक्षणाचे तीन पैलू असतात - योग, सहयोग आणि उपयोग! त्याची प्रचिती आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT