Gorden Mure sakal
संपादकीय

विज्ञानवाटा : मूरे गेले; पण ‘लॉ’ राहिला!

आधुनिक तंत्रज्ञानाच्या विशाल क्षेत्रात विशाल दूरदृष्टी लाभलेल्या मूरे यांच्या प्रखर निरीक्षणातून व्यक्त झालेला ‘लॉ’ पन्नास वर्षांहून जास्त काळ टिकला आणि घरोघरी ‘डिजिटल वर्ल्ड’ समृद्ध करून गेला!

डॉ. अनिल लचके anil.lachke@gmail.com

आधुनिक तंत्रज्ञानाच्या विशाल क्षेत्रात विशाल दूरदृष्टी लाभलेल्या मूरे यांच्या प्रखर निरीक्षणातून व्यक्त झालेला ‘लॉ’ पन्नास वर्षांहून जास्त काळ टिकला आणि घरोघरी ‘डिजिटल वर्ल्ड’ समृद्ध करून गेला!

आधुनिक तंत्रज्ञानाच्या विशाल क्षेत्रात विशाल दूरदृष्टी लाभलेल्या मूरे यांच्या प्रखर निरीक्षणातून व्यक्त झालेला ‘लॉ’ पन्नास वर्षांहून जास्त काळ टिकला आणि घरोघरी ‘डिजिटल वर्ल्ड’ समृद्ध करून गेला!

जगातील संगणक उद्योग वाळूवर उभा आहे, असं म्हणतात. वाळूमध्ये असलेल्या सिलिकॉन पासून इंटिग्रेटेड सर्किट किंवा मायक्रोचिप बनतात. मात्र ते शुद्ध सिलिकॉन पाहिजे. याचे कारण ते एक उत्तम प्रतीचे अर्धसंवाहक (सेमिकंडक्टर, ट्रान्झिस्टर) आहे. साहजिकच इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये सिलिकॉन, ट्रान्झिस्टर आणि त्यातून तयार होणाऱ्या मायक्रोचिपचे महत्व वाढत गेले. ट्रांझिस्टरचा आकार परमसूक्ष्म होत गेला. पन्नास वर्षांपूर्वी छोट्या मायक्रोचिपवर शंभर ट्रान्झिस्टर ‘बसवले’ जायचे. तिथे २०० ट्रान्झिस्टर सहज आसनस्थ होऊ लागले! हे लक्षात घेऊन संगणकनिर्मिती करणाऱ्या इंटेलचे संस्थापक गॉर्डन मूरे १९६५मध्ये एक व्यावसायिक भविष्य वर्तवले होते, ते ‘मूरेज् लॉ’ म्हणून जगभर प्रसिद्ध झाले. मूरे यांचा ‘लॉ’ काय सांगतो, तर दरवर्षी मायक्रोचिपमधील ट्रान्झिस्टरची संख्या आधीच्या दुप्पट होईल.

मात्र दहा वर्षांनी, १९७५ मध्ये मूरे यांनी ‘लॉ’ मध्ये थोडा बदल केला. तो म्हणजे दर दोन वर्षांनी मायक्रोचिपवरील संख्या दुप्पट होईल! खरं पाहिलं तर हे वाक्य त्यांनी एका लेखात आणि व्याख्यानामध्ये म्हटलेलं होतं. हा काही वैज्ञानिक ‘लॉ’ नाही! गॉर्डन मूरे यांनी व्यक्त केलेला फक्त व्यावसायिक अंदाज होता. हा अंदाज त्यांच्या अनुभवामुळे आणि प्रखर निरीक्षणक्षमतेने परिपक्व झाला होता. तसेच सिलिकॉन चिपमागील केमिस्ट्री त्यांना पक्की माहिती होती. याचे कारण ते रसायनशास्त्र विषय घेऊन १९५०मध्ये बी. एस्सी. झाले होते. त्यावर्षी त्यांनी ‘कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये प्रवेश घेऊन नायट्रिक ऑक्साईडच्या भौतिकी गुणधर्माचे संशोधन करून चार वर्षात पीएच.डी. मिळवली होती.

गॉर्डन यांची शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन अमेरिकेतील डाऊ कंपनीने त्यांना प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक म्हणून निवडले होते. नियमाप्रमाणे त्यांनी मूरे यांना त्यांच्या मनाचा ‘कल’ लक्षात घेण्यासाठी मानसशास्त्रज्ञाकडे पाठवले. मूरे यांची एकंदरीत मानसिक बैठक लक्षात घेऊन त्याने ‘हा उमेदवार तांत्रिक दृष्टीने उत्तम काम करणारा असला तरी याच्यात व्यवस्थापकीय गुण नाहीत’, असा शेरा मारला. परिणामी त्यांची ‘प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक’पदावरील निवड रद्द झाली. अशा अनेक नोकऱ्या त्यांच्याकडे चालून आल्या आणि तशाच गेल्या! अखेरीस विल्यम शॉकली यांच्याकडे गॉर्डनला संशोधन करण्याची संधी मिळाली. शॉकली यांना बेल कंपनीने छोटे कार्यक्षम ट्रान्झिस्टर बनवण्याचे संशोधन करण्यासाठी निधी दिलेला होता. या ग्रुपने वाटाण्याएवढे छोटे ट्रान्झिस्टर यशस्वीरीत्या तयार करून दाखवले. या शोधाबद्दल विल्यम शॉकली यांना १९५६ चे भौतिकीशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

मात्र या ग्रुपमध्ये विल्यम शॉकली यांच्यासह कोणालाही ‘प्रॉडक्शन’चा किंवा व्यवसायाचा अनुभव नव्हता. गॉर्डन मूरे यांना सिलिकॉन चिप आणि ट्रान्झिस्टरमधील चांगली माहिती होती आणि या व्यवसायात मोठा वाव असल्याची जाणीव होती. मायक्रोप्रोसेसर तयार करणारी एखादी कंपनी सुरु करावी, असं त्यांना वाटू लागलं. सुदैवाने त्यांना रॉबर्ट नॉईससारखा पक्का व्यावसायिक मित्र मिळाला. त्याला मूरेंकडून पाचशे डॉलर भांडवल म्हणून मिळाले. बाकीचे भांडवल रॉबर्ट यांनी उभे केले. त्यातून १९६८ मध्ये इंटेल आणि फेअर चाईल्ड सेमीकंडक्टर या कंपनीची स्थापना झाली. त्यात मूरे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक म्हणून विविध पदे विभूषवली; पण ते शक्यतो प्रयोगशाळेत संशोधक म्हणून कार्यरत राहिले. जगातील पहिला मायक्रोप्रोसेसर इंटेलने बनवून सर्वात जास्त मायक्रोप्रोसेसर बनवणारी कंपनी म्हणून नावलौकिक मिळवला.

मूरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ‘मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर’ तंत्रानुसार मायक्रोचिप खूप कार्यक्षम झाली. त्यांनी १९७१मध्ये विकसित केलेला २३०० ट्रान्झिस्टर असलेला ४००४ मायक्रोप्रोसेसर चांगले कार्य करू लागला. संगणकाच्या मायक्रोचिपवर जितके जास्त ट्रान्झिस्टर, रेझिस्टर्स आणि डायोड तितकी त्याची क्षमतापण जास्त! त्यांच्या पेंटियम-४ मायक्रोप्रोसेसर मुळे इंटेलचा दबदबा वाढला. या मायक्रो प्रोसेसरवरती गॉर्डन मूरे यांची (सूक्ष्म) स्वाक्षरी असे! यानंतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे हलकी, लहान आणि तुलनात्मकरीत्या स्वस्त झाली.

‘मूरेज लॉ’प्रमाणे दर दोन वर्षांनी मायक्रोचिपवरील अर्धसंवाहकांची संख्या घातांकीय पद्धतीने प्रचंड वाढत गेली. त्याचप्रमाणात मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गूगल, फेसबुक, अमेझॉन अशा अनेक कंपन्यांची आर्थिक प्रगती झपाट्याने होत गेली. कारण स्पर्धेमध्ये त्यांना त्या पद्धतीने संशोधन आणि विकास करावा लागला. विल्यम शॉकली यांच्याबरोबर गॉर्डन मूरेंनी शेंगदाण्याएवढा पहिला लहान ट्रांझिस्टर घडवला होता. त्याच मूरेंनी १७०० कोटी ट्रांझिस्टर असलेला छोटा मायक्रोप्रोसेसर २००५मध्ये बनवून दाखवला.

अपोलो-१७ या डिसेंबर १९७२च्या चांद्रमोहिमेत सेर्नान आणि स्मिट चंद्रावर उतरून चालले आणि पृथ्वीवर सुखरूप परत आले होते. त्यावेळी वापरण्यात आलेल्या संगणकापेक्षा आपल्या हातातील सध्याचा स्मार्टफोन एक कोटीपट जास्त सक्षम आहे! कारण स्मार्टफोन, संगणक, मोटार, विमान, द्रोण, घड्याळे, खेळणी आणि अनेक उपकरणांमध्ये आधुनिक वेगवान मायक्रोप्रोसेसर असतो. दर्जेदार मायक्रोचिपमुळे डेस्कटॉप मागे पडून कोट्यवधी लोकांच्या मांडीवर ‘लॅपटॉप’ विराजमान झाला. ‘मूरेज् लॉ’प्रमाणे इलेक्ट्रॉनिक्सच्या उद्योगक्षेत्रात तांत्रिक, सामाजिक आणि आर्थिक क्रांती झाली, हे निश्चित! या खेरीज आधुनिक उपकरणांची उत्पादकता देखील वाढली. या क्षेत्रातील गॉर्डन मूरे यांची कामगिरी लक्षात घेऊन अमेरिकेच्या अध्यक्षांनी २००२ मध्ये त्यांना ‘मेडल ऑफ फ्रीडम’ हा अमेरिकेतील सर्वोच्च किताब प्रदान केला.

गॉर्डन मूरे फक्त मायक्रोप्रोसेसर किंवा त्यांच्या ‘लॉ’साठी प्रसिद्ध होते, असं नाही. ते आणि त्यांची पत्नी बेट्टी मूरे पर्यावरणप्रेमी आणि दानशूर म्हणून जगप्रसिद्ध होते. दोघांनाही निसर्गात भटकण्याची आवड होती. आर्टिक्ट सागरापासून ते अमेझॉनच्या घनदाट वर्षावनांपर्यंतचे पर्यावरण सुधारण्यासाठी दोघांनी अनेक कार्यक्रम आखले. संशोधकांना निधी उपलब्ध करून दिला. त्यासाठी स्वकमाईची ६०० कोटी डॉलरपेक्षा अधिक रक्कम दान करून ‘गॉर्डन अँड बेट्टी मूरे फाऊंडेशन’ची स्थापना केली. मात्र ते दोघेही प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहण्याच्या प्रयत्न करत असत.

गॉर्डन मूरे यांचे हवाई आयलंड मध्ये २४ मार्च २०२३ रोजी ९४व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या बरोबर ‘मूरेज लॉ’ पण संपुष्टात आला, असं काही तंत्रज्ञ मानतात. पण तरीही त्यांचा ‘मूरेज लॉ’ अजूनही शाबूत आहे! आता काही मायक्रोप्रोसेसरवर २६० अब्ज सेमीकंडक्टर आसनस्थ होत आहेत. हायसेबर्ग यांच्या अनिश्चिततेच्या सिद्धांतानुसार २०३६ साली ‘मूरेज् लॉ’ ची इतिश्री नक्की होणार, असं तज्ज्ञ म्हणतात. सध्या डबल डेकर बस जशी असते, तसेच मायक्रोप्रोसेसर एकमेकांवर रचून तेवढ्याच जागेत भरपूर मेमरी साठवणाऱ्या चिप निघू शकतात, अशी मेमरी चिप म्हणजे विल्यम मूरे यांचे एक ‘मेमोरिअल’च आहे! तरीही आधुनिक तंत्रज्ञानाच्या विशाल क्षेत्रात विशाल दूरदृष्टी लाभलेल्या मूरे यांच्या प्रखर निरीक्षणातून व्यक्त झालेला ‘लॉ’ पन्नास वर्षांहून जास्त काळ टिकला आणि घरोघरी ‘डिजिटल वर्ल्ड’ समृद्ध करून गेला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT