Sensex Sakal
संपादकीय

भाष्य : कहाणी ससा आणि कासवाची

कोरोनाच्या अतर्क्‍य आणि भीषण आजारयुक्त संकटातून भारतीय अर्थव्यवस्था आता हळूहळू मुक्त होऊ पाहते आहे; दुसऱ्या टोकाला शेअर बाजार उसळीच्या हिंदोळ्यावर नवनवीन उच्चांक करत आहे.

डॉ. अतुल देशपांडे

अर्थव्यवस्थेची गती आणि शेअर बाजाराची प्रगती यांचा अन्योन्य संबंध असतोच असे नाही, हे गेल्या पंधरा-वीस वर्षांत दिसून आले आहे. वास्तव आणि मनोभूमिका यांच्या विसंगतीतून ते ठळकपणे लक्षात येते.

कोरोनाच्या अतर्क्‍य आणि भीषण आजारयुक्त संकटातून भारतीय अर्थव्यवस्था आता हळूहळू मुक्त होऊ पाहते आहे; दुसऱ्या टोकाला शेअर बाजार उसळीच्या हिंदोळ्यावर नवनवीन उच्चांक करत आहे. हे असं कसं घडतं? म्हणजे अर्थव्यवस्था मरगळलेली, मात्र शेअर बाजार उत्साहित, टवटवीत? याला विरोधाभास म्हणावा की कसं? सर्वसामान्य, तुमच्या-आमच्या लोकांच्या डोक्‍यात हे गोंधळजागरण रुंजी घालतंय. ज्यांना ही परिस्थिती विरोधाभासाची वाटते त्यांच्या मनात एक समज पक्का असतो आणि तो असा, की अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार या दोहोंमध्ये जवळचा संबंध आहे. हे गृहितक ज्यांच्या मनात पक्कं बसलं आहे त्यांनाच हा विरोधाभास वाटेल. अशा लोकांच्या दृष्टीने देशांतर्गत उत्पादनातला (जीडीपी) विधायक बदल किंवा विघातक परिणाम शेअर बाजारातल्या विधायक अथवा विघातक बदलांमधून परिणाम साधत असतो. शेअर बाजारातली तेजी आणि जीडीपीतील वाढ या एकमेकांचा हात धरून जाणाऱ्या परस्परपूरक गोष्टी असू शकतात. याउलट परिस्थिती असेल तर दोन्ही गोष्टींमध्ये मंदीची शक्‍यता असू शकते. लोकांची अशा प्रकारची मनोभूमिका तयार होण्याचं कारण दडलंय एका वस्तुस्थितीत शेअर बाजार हा भावनाप्रधान (सेंटिमेंटल) निर्देशांक आहे. अन्य काही कारणांमुळे उसळी घेत असेल किंवा घसरणीचा असेल तर शेअर बाजाराशी संबंधित लोकांची मानसिकता अर्थात भावनाप्रधानता तशीच होऊन (आशादायक किंवा निराशवादी) लोकांच्या भविष्यकालीन उपभोगावर आणि खर्चावर त्याचा परिणाम दिसतो. जो सरतेशेवटी जीडीपीच्या वाढीत किंवा घटीत दिसतो. ज्या गोष्टींचा संबंध आपण बुल मार्केट (तेजीचा बाजार) आणि बेअर मार्केट (मंदीचा बाजार) या दोहोंशी जोडत असतो.

चित्र विरोधाभासाचे

अर्थव्यवस्था गतिमान असेल आणि शेअर बाजारही तेजीत राहील, अशी परिस्थिती दिसली नाही तर काहींना तो विरोधाभास जाणवतो. गेल्या दशकात परिस्थिती झपाट्यानं बदलली. 2021च्या वित्तीय वर्षात देशांतर्गत उत्पादन 7.3 टक्‍क्‍यांनी घटलं, पण याच काळात शेअर बाजार कोरोनापूर्व स्थितीच्या तुलनेत 32.03 टक्‍क्‍यांनी तेजीत आला. 2010-11 या वर्षातला जीडीपी आणि सेनसेक्सच्या परस्परसंबंधातला तक्ता अभ्यासला तर जीडीपी 8.4वरून 8.5 टक्के फक्त वाढला. मात्र सेनसेक्स 2500 अंशांनी वधारला. 2011नंतर जीडीपीच्या आधारे अर्थव्यवस्थेत मंदीसदृश परिस्थिती तयार होताना दिसते. याच काळात सेन्सेक्‍समध्ये सातत्याने वाढ दिसते. 2016 नंतर या दोहोंमध्ये काहीच परस्परसंबंध नाही, असे चित्र समोर येते. त्यामुळे शेअर बाजारतली हालचाल आणि वर्तणूक या गोष्टींचा अर्थव्यवस्थेशी कार्यकारणभाव म्हणून अर्थाअर्थी संबंध उरत नाही. शेअर बाजारातली वर्तणूक ही नेहमीच भविष्यकालीन अंदाज बांधण्याच्या प्रक्रियेशी निगडीत असते. त्यामुळे कोरोनापूर्व मंदीसदृश्‍य परिस्थिती व कोरोनानंतरची अर्थव्यवस्थेची पडझड आणि सेन्सेक्‍सची ‘न भूतो न भविष्यती’ ६१,००० अंशांचा टप्पा पार करण्याची वीरवृत्ती यात विरोधाभास आहे, असं मानण्याचं कारण नाही. गेल्या दशकात हा परस्परसंबंध जवळजवळ संपुष्टात आल्यासारखा आहे. म्हणून विरोधाभासापेक्षा ही वास्तवता आभासाच्या जवळ जाते.

नफ्याला जास्त महत्त्व

या निरीक्षणाच्या बाजूनं उभे राहणारे मुद्देही महत्त्वाचेच आहेत. निफ्टी, सेन्सेक्स या निर्देशांकावर वित्तीय सेवा टेलिकॉम, आयटी (इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी) या क्षेत्रातील व्यवहारांचा अधिक परिणाम होतो, मात्र केवळ ही क्षेत्रे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम करतात, असे नाही. भारतातला लक्षणीय रोजगार सूक्ष्म-लघु-मध्यम आकाराचे उद्योग (एमएसएमई), औद्योगिक उत्पादन, व्यापार आणि कृषिउद्योग यांमध्ये एकवटलेला आढळतो. मात्र या उद्योगांना शेअर निर्देशांकात नगण्य स्थान आहे. असेही आढळते, की शेअर बाजारात नफ्याचा अधिक विचार होतो; जीडीपीचा विचार असत नाही. उदाहरणार्थ दशकापूर्वी ज्या खासगी कंपन्यांच्या आर्थिक वृद्धीचा दर अधिक होता त्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर अधिक मोबदला देतील, हे भाकीत खरे ठरले नाही, असे दिसते. शेअर बाजाराकडून भविष्यतल्या गोष्टींचा अधिक वेध घेतला जातो. उदाहरणार्थ 2008 मधल्या आर्थिक आरिष्टानंतर शेअर बाजार 2009 मध्ये तात्काळ पुनर्स्थितीला आला, पण अर्थव्यवस्थेची गाडी रूळावर यायला 2012 वर्ष उजाडावं लागलं. या काळात कंपन्या आणि विशेषतः भारत आणि अमेरिकेतल्या मोठ्या कंपन्या आणि त्यांचे शेअर वैश्‍विक प्रारूप वापरून नफा कमावताना दिसतात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजारात (भारत आणि अमेरिकेतही) सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात मोठ्या आकाराच्या 10 ते 20 कंपन्यांचा लक्षणीय प्रभाव असतो. एकूणात अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग कमी असला आणि या मोठ्या 10 ते 20 कंपन्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावणारा असला की शेअर बाजाराचे एकूण वर्तन आश्‍वासक वाटते. या स्थितीत अर्थव्यवस्थेची प्रगती मंद असली तरी ते स्वाभाविक ठरते. कारण अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराच्या वर्तनावर परिणाम करणारे घटक वेगळे असतात. म्हणूनच 2020 च्या कोरोनासंकट काळात वित्तीय सेवा, आयटी, टेलिकॉम या क्षेत्रात काम करणारे आणि त्यांच्या शेअरना घरघर लागली नाही. याउलट चित्र रिअल इस्टेट, ट्रान्सपोर्ट, ऑटो, हॉटेल या क्षेत्रांबाबतीत दिसते.

कोरोना महासाथ, जागतिक मंदी, वित्तीय संकट यासारख्या अस्वाभाविक परिस्थितीत गेल्या दशकात अधोरेखित झालेली गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार यांच्या वर्तनात मूलभूत फरक आहे. त्यामुळे त्यांच्यामधल्या संबंधांची दरी वाढतच गेली आणि वाढतच आहे, असे दिसते. या दोहोंमधल्या फरकाच्या वाढणाऱ्या अंतरावर परिणाम करणारे मुख्य घटक मानवी वर्तन मानसिकता भविष्यकालीन अंदाज बांधण्याची सवय यासारख्या गोष्टींवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेत व्याजाचे दर खूप घटले असतील, तर गुंतवणूकदार भविष्यकालीन लाभांशाच्या वाढणाऱ्या वर्तमानकालीन मूल्याकडे लक्ष देऊन अधिक जोखीम पसंत करतात. भविष्यातला मोबदला आणि शेअरचं वर्तमानकालीन मूल्यांकन या दोन बाबींतून त्यांना मिळणारा मोबदला या संदर्भात गुंतवणूकदार आशावादी असल्यामुळे गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे अर्थव्यवस्था कितीही कमकुवत झाली तरी शेअर बाजाराचं मूल्यांकन वाढते. बाजार तेजीकडे पदक्रमण करायला लागतो. ‘लार्ज कॅप स्टॉक्‍स’बाबतही गुंतवणूकदार आशावादी असतात. कारण मोठ्या कंपन्या जोपर्यंत गुंतवणूकदारांना भविष्यातल्या परताव्याविषयी सकारात्मक आश्‍वासन देतात तोपर्यंत शेअर बाजारात गुंतवणूक चालूच राहते. भले अर्थव्यवस्था मंदीनं ग्रासलेली असेल. याखेरीज सट्टेबाजीची प्रवृत्ती सर्वसामान्य गुंतवणूकदारांची आशावादी मानसिकता, परकी थेट गुंतवणूक, परकी संस्थात्मक गुंतवणूक यासारख्या घटकांमुळे प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेची प्रगती आणि शेअर बाजाराचे वर्तन या दोहोंमध्ये फरक पडतो. तो स्वाभाविक म्हणावा लागेल. ही स्वाभाविकता कासव आणि ससा गोष्टीसारखी आहे. आजच्या परिस्थितीत शेअर बाजार सश्‍याच्या गतीनं पुढे जाताना दिसतो; तर अर्थव्यवस्था कूर्मगतीने चालते. भविष्यात ही परिस्थिती उलट्या दिशेनेही जाऊ शकते; पण एक गोष्ट खरी, प्रगतीचं उद्दिष्ट वेगळं असताना दृष्टिकोनात साधर्म्य राहील, अशी आशा बाळगणं वेडेपणाचं ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT