Dr Balaji Tambe Sakal
संपादकीय

स्मरण संस्कृतीचे... : कास विज्ञानाची

ज्ञान-विज्ञानाचा सर्वोत्तम स्रोत म्हणजे वेद, भारतीय संस्कृतीचे उगमस्थानही वेद. यामुळेच भारतीय संस्कृती विज्ञानाधिष्ठित आहे. वेदांतील विज्ञानाला काळाचं बंधन नसतं, तसं भारतीय संस्कृतीलाही नसतं.

श्रीगुरू बालाजी तांबे

ज्ञान-विज्ञानाचा सर्वोत्तम स्रोत म्हणजे वेद, भारतीय संस्कृतीचे उगमस्थानही वेद. यामुळेच भारतीय संस्कृती विज्ञानाधिष्ठित आहे. वेदांतील विज्ञानाला काळाचं बंधन नसतं, तसं भारतीय संस्कृतीलाही नसतं. किंबहुना वेदातील विज्ञान जनसामान्यांच्या कृतीत सहजतेने उतरावं, अंगवळणी पडावं यासाठी आपल्या ऋषिमुनींनी निरनिराळे सण, उत्सव साजरे करताना त्यात संस्कृती अशी काही कौशल्याने पेरली की त्यांच्या द्रष्टेपणाला तोड नाही. श्रीगुरुजी सांगत, वेदांमध्ये राम-कृष्णांचा उल्लेखही नाही, वेदांमध्ये निसर्गातील तत्त्वरूप देवता आहेत. उदा. अग्नी, वरुण, सूर्य, पर्जन्य वगैरे देवता वेदांमध्ये उल्लेखलेल्या आहेत. भारतीय संस्कृतीत नदी, वृक्ष, प्राणी, पर्वत, भूमी, समुद्र, चंद्र, सूर्य, ग्रह वगैरेंची पूजा केली जाते. अगदी साध्या दगडातही देव पाहण्याचे, त्याच्यापुढे नतमस्तक होण्याचे सामर्थ्य भारतीय संस्कृतीत आहे. अर्थातच संस्कृती जगताना आपण निसर्गातील प्रत्येक तत्त्वाबद्दल संवेदनशील होतो. प्रत्येकाने आपापल्या परीने ही सांस्कृतिक मूल्ये जोपासल्यास त्यातून पर्यावरणाचे आपोआप रक्षण होईल, ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्याची वेळच येणार नाही.

आत्मसंतुलनमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘संतुलन वेद उत्सव’ आयोजित करण्याची परंपरा आहे. यासाठी २०१९ पर्यंत देशविदेशातून १५० ते २०० लोक येत, या सात दिवसांच्या निवासी उत्सवात सहभागी होत. यातील एक आकर्षण म्हणजे प्रभातफेरी. भल्या पहाटे ॐकार मंदिरातून वाजत-गाजत निघालेली प्रभातफेरी येथील प्रत्येक रस्त्यावरून, प्रत्येक चौकातून फिरते. संपूर्ण संतुलन परिवार तसेच उत्सवात सहभागी झालेले सर्वजण अभंग गात, नाचत, टाळ-मृदुंगाच्या घोषात प्रभातफेरी करतात. श्रीगुरुजी सांगत, ‘प्रभातफेरीमुळे आपण निसर्गाच्या जवळ जातो, आपल्यात आणि निसर्गात शक्तीची देवाण-घेवाण होते, अनुबंध दृढ होतात. पर्यावरणातील या सकारात्मकतेचा आपल्याला फायदा होत राहतो.’

भारतीय संस्कृतीतील एक भाग म्हणजे पहाटे उठल्यावर सर्वप्रथम ‘करारविन्देन......... ’ हा श्र्लोक म्हणणे. यातील दुसरी ओळ आहे, ‘वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि’ म्हणजे वडाच्या पानावर पहुडलेल्या बाळकृष्णाचे मी मनोभावे स्मरण करतो. श्रीगुरुजी यामागचे विज्ञान सांगत असे, वडाचे पान दीर्घकाळ हिरवे राहते, हा हिरवा रंग क्लोरोफिल या तत्त्वामुळे आलेला असतो. सर्व सृष्टीचा नाश झाला तरी या तत्त्वाचा नाश होत नाही. प्रलयानंतर पुन्हा नव्या सृष्टीची रचना होते ती या तत्त्वातून. अंगठा तोंडात असलेल्या बाळकृष्णाचे चित्र हे सृजन-प्रलयाची चक्राकार गती दाखविणारे प्रतीकरूप असते. रोज सकाळी उठताना श्र्लोक म्हणण्याच्या निमित्ताने त्यामागचे विज्ञान मनात ठसत गेले तर त्या कृतीचा कितीतरी पटींनी अधिक फायदा होऊ शकेल.

भारतीय संस्कृती, भारतीय वेद हे ज्ञानाचे भांडार आहे, हे सर्वश्रुत आहे. या ज्ञानाचा लोककल्याणासाठी, आरोग्यप्राप्तीसाठी वापर कसा करावा हे श्रीगुरुजींना ज्ञात होते. संतुलन पंचकर्मामध्ये वेदसूक्तश्रवण हा उपचारातील एक भाग आहे, तो यामुळेच. कोणताही ध्वनी, विशेषतः संगीत किंवा वेदमंत्र श्रवण हे संस्काराचे सर्वोत्तम माध्यम असते असं श्रीगुरुजी सांगत. त्याच्या गर्भसंस्कार व स्त्रीसंतुलन या अल्बममध्ये ऋग्वेद, अथर्ववेद यांमधील ऋचांचा अंतर्भाव आहे, ज्यांचा उत्तम परिणाम सिद्ध झाला आहे. श्रीगुरुजींनी त्यांच्या वडिलांकडून, वेदशास्त्रसंपन्न वासुदेवशास्त्री तांबे यांच्याकडून, मिळालेला वेदपठणाचा वारसा पुढे चालवला. हृदयरोगासाठी सौरसूक्त, मानसिक तसेच मेंदूच्या विकारांवर त्रिसुपर्ण, समृद्धीसाठी श्रीसूक्त अशा त्यांच्या आवाजातील अनेक सूक्तांचा उपचारासाठी वापर केला जातो. ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः’ हा श्रीगुरुजींचा संकल्प पूर्ण होण्यासाठी घनपाठी ब्रह्मवृदांकरवी ॐकार मंदिरात तसेच संतुलन परिवाराच्या उपस्थितीत वेदपठण, हवन केले जाते. यज्ञ-याग-शांती सुद्धा नियमितरूपाने केले जातात.

वेदातील पुरुषसूक्तावर श्रीगुरुजींनी ‘अनटोल्ड सिक्रेटस् ऑफ लाईफ’ नावाचे पुस्तक लिहिले, जे युरोपमधील रॅँडम हाऊस या सुप्रसिद्ध प्रकाशनाने स्वतःहून जर्मन भाषेत अनुवादित करून प्रसिद्ध केले. वेदमंत्रांचा शब्दशः अर्थ न लावता त्यातील विज्ञान शोधण्याचे आणि त्याद्वारे परमपुरुष परमात्म्यापर्यंत पोचण्याचा मार्ग प्रशस्त करण्याचे अप्रतिम काम या पुस्तकात केलेले दिसते.

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ हे भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व दाखविणारे सूत्र. जेथे स्त्रीला सन्मान मिळतो, तेथे देवतांचा वास असतो, हा याचा अर्थ. स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटले जाते, तिला आदर सन्मान देणे आवश्यक आहेच, पण तिच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याचे दायित्व संपूर्ण परिवारावर आहे, समाजावर आहे, हे श्रीगुरुजी वारंवार सांगत. स्त्रीआरोग्य क्षेत्रात त्यांनी ज्या व्याप्तीने काम केले ते पाहिले तर थक्क व्हायला होते. आयुर्वेदाच्या माध्यमातून विविध स्त्रीरोगांवर औषधयोजना तर केलीच, बरोबरीने विशेष धूप तयार केले, उत्तरबस्तीसारखा क्वचितच केला जाणारा उपचार पंचकर्मात समाविष्ट केला, स्त्रीसंतुलन हे विशेष संगीत तयार केले, लेखनाच्या-व्याख्यानांच्या माध्यमातून स्त्रीआरोग्यामध्ये गर्भाशयाचे योगदान या विषयावर जनजागृती केली, पाळीचे विकार, रजोनिवृत्ती, प्रदर वगैरे संवेदनशील समस्यांवर सोपे, घरगुती पण प्रभावी उपचार सुचवले. ‘श्रीगुरुजींच्या लेखामुळे मी संतुलनमध्ये आले आणि माझे गर्भाशय काढून टाकण्याचे शस्त्रकर्म टळले,’ असे सांगणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत.

आवळीपूजनाच्या दिवशी श्रीगुरुजींनी आवळ्याच्या वृक्षाची पूजा केल्यावरच फार्मसीमध्ये ताज्या आवळ्यांपासून च्यवनप्राशादी रसायने तयार करण्याची परंपरा आत्मसंतुलनमध्ये पाळली जाते. औषधे बनविताना, विशेषतः दूध, दही, केशर यासारखी संवेदनशील द्रव्ये टाकण्यापूर्वी त्यांच्यावर विशेष प्रार्थना, मंत्र म्हणून संस्कार करण्याचीही पद्धत आहे. या सर्व गोष्टी श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनानुसार यापुढेही होत राहतील.

श्रीगुरुजींच्या शब्दांत सांगायचे तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ सिद्ध होण्यासाठी सांगितलेली कृती ती संस्कृती. एखादा उत्सव साजरा करण्याने, पूजा-पाठ करण्याने किंवा लवकर उठण्याने भारतीय संस्कृतीचे पालन होत नाही. या वरवरच्या कृतींनी संस्कृती सिद्ध होणार नाही. त्यासाठी चारीही पुरुषार्थ सिद्ध करणारा श्रेयसाचा मार्ग निवडावा लागेल आणि त्या मार्गाने पुढे जाताना संस्कृती ‘जगावी’ लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT