dwarkanath sanzgiri 
संपादकीय

कूस बदलणारे क्रिकेट

द्वारकानाथ संझगिरी

क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब होय. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील कुठलाही संघ आता जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो, अशी स्थिती आहे.

भा रतातलं म्हणजे घरचं क्रिकेट कूस बदलतंय का? खरं तर कूस बदलली आहे, असंच म्हणावं लागेल. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे विदर्भाने लागोपाठ दोन वर्षे जिंकलेला रणजी करंडक. फक्त विदर्भच नाही, गेल्या नऊ वर्षांत रणजी ट्रॉफीने तीन नवे कोरे चॅंपियन संघ पाहिले. मुंबई, दिल्ली, कर्नाटक वगैरे संघांचा एकेकाळी घरचा झालेला शोपिस आता इतरांनी पळवलेला आहे. विदर्भाने जो पराक्रम केला, तोच  राजस्थाननं २०१०-११ आणि २०११-१२ मध्ये केला होता. दोन वर्षांपूर्वी गुजरातने आपल्या कोऱ्या पाटीवर अक्षरं लिहिली. सौराष्ट्र तेवढा नशीबवान नसला तरी २०१२-१३ पासून त्यांनी तीनदा अंतिम सामन्यात धडक मारली, हेही महत्त्वाचं. त्यावेळी त्यांच्यासाठी दरवाजा उघडला नाही. पण तो उद्या उघडू शकतो.

पण या सर्वांचं कौतुक हेच आहे की, काही वर्षांपूर्वी ते कुणाच्या खिजगणतीतही नव्हते. गुजरात म्हटल्यावर एके काळी नरी कॉन्ट्रॅक्‍टर, जसू पटेल, दीपक शोधननंतर त्यांच्या कसोटी रत्नांची नावं संपायची. आणि आता तिथलाच जसप्रित बुमरा जगातला सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे. मुंबईचे जुने खेळाडू नेहमी एक किस्सा सांगायचे. १९६० च्या दशकात गुजरात, सौराष्ट्र ब्रेबॉनवर रणजी खेळायला आले. मुंबईची फलंदाजी सुरू झाली की मुंबईचे गोलंदाज जवळच्या ‘इरॉसला’ सिनेमाला जाऊन बसायचे. त्यांच्यापर्यंत फलंदाजी यायची शक्‍यताच अत्यल्प असायची. सौराष्ट्राला एकेकाळी क्रिकेटची परंपरा होती. कारण तो रणजित सिंग, दिलीप सिंगचा प्रांत होता. पण तिथले विनू मंकड, सलिम दुराणी, अजय जडेजा, दिलीप दोशी वगैरे इतरत्र खेळायला गेले. आज ती परंपरा पुनर्जीवित झालीय. तिथल्या चेतेश्‍वर पुजाराने ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाजीचा गोवर्धन उचलला. नागपूरला क्रिकेट परंपरा होती. पण विदर्भाच्या कसोटी क्रिकेटपटूचे चटकन आठवणारं नाव म्हणजे प्रशांत वैद्य. (पण तोही बंगालसाठी खेळला.) आणि आता उमेश यादव. त्याआधी फलंदाज अनिल देशपांडे, प्रीतम गंधेवर बऱ्याच नजरा रोखल्या गेल्या होत्या. या ऑफ स्पिनरकडे चांगला लूप होता. पण कसोटीचा दरवाजाच काय;पण त्याच्यासाठी दारावरची पत्र टाकायची फटही उघडली नाही.

आज हे सर्व संघ मुंबई, कर्नाटक, दिल्लीला तुल्यबळ ठरतायेत. याचे कारण काय? त्याची सुरवात मी १९९० पासून करेन. १९९०मध्ये पंतप्रधान नरसिंह राव आणि मनमोहनसिंगांनी आर्थिक सुधारणा केल्या. त्यानंतर देशात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या, त्यात टेलिव्हिजन चॅनेल्स आले. याच काळात सचिन तेंडुलकरचा उदय झाला. मोठ्या शहराबाहेरच्या घराघरांत टीव्ही गेला. तिथून सचिन तेंडुलकर एक स्वप्न घेऊन घराघरात शिरला. त्याच्या आदर्श प्रतिमेमुळे ते स्वप्न छोट्या शहरातल्या मुलांना आपलं स्वप्न वाटलं. आणि हा मेट्रो शहरातला खेळ छोट्या शहरातल्या मुलांना आपलासा वाटला. त्यांच्यात देशासाठी खेळण्याची ऊर्मी निर्माण झाली.

पुढे दहा, बारा वर्षांनी साधारण २००४ नंतर क्रिकेट नियामक मंडळाच्या तिजोऱ्या पैशांनी दुथडी भरून वाहायला लागल्या. तो पूर पाहून पूर आलेल्या गंगेलाही हेवा वाटला असता. टीव्हीचे हक्क हा या गंगेच्या महत्त्वाचा स्रोत होता. ही पैशाची गंगा आणणारा भगीरथ होते दालमिया ऊर्फ ‘डॉलरमिया’.त्यानंतर या गंगेच्या पैशाचं पाणी देशाच्या विविध क्रिकेट संघटनांना मिळायला लागलं. आता राष्ट्रीय खेळाडू आणि महिला खेळाडूंना माध्यमाचे हक्क, स्पॉन्सरशिपची मिळकत यातून १३ टक्के मिळतात. २०१६-१७ मध्ये ही रक्कम ८० कोटी होती. एकेकाळी म्हणजे साधारण १९८०च्या दशकात रणजी खेळाडूंना २५० रुपये भत्ता असेल तर आज ते दशलक्षात बोलतात. ज्या संघटना ‘आयपीएल’चे सामने भरवतात, त्यांना वर्षाला ३० कोटी मिळतात. ‘गंगा आली रे अंगणी’ हे गाणं आता विविध संघटनाही आनंदाने एका सुरात गात असतात.

त्याचा फायदा काय झाला? वेगवेगळ्या असोसिएशनमध्ये प्रशिक्षणासाठी अद्ययावत शाळा (ॲकॅडमी) उभ्या राहिल्या. एकेकाळी विदर्भाचा रणजी सराव पहिल्या रणजी सामन्यापूर्वी एक महिना अगोदर सुरू होई. त्यांना दोन खेळपट्ट्या दिलेल्या असत. खेळाडूंना नोकऱ्या असत. कारण रणजी क्रिकेट हे घरची चूल पेटवण्याचं इंधन नव्हतं. २००९मध्ये नागपूरमध्ये अद्ययावत प्रशिक्षण शाळा उभी राहिली. आता विदर्भ असोसिएशनची दोन मैदाने आहेत. अनेक खेळपट्ट्या आहेत. इनडोअर सुविधा आहेत. तिथे खेळाडू आता वर्षभर सराव करू शकतात. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षक आहे. क्रिकेटच्या अद्ययावत सुविधा ही फक्त मुंबई, दिल्ली, बंगळूर वगैरेंची मक्तेदारी नाही. त्यामुळे गुणवत्तेचं चीज करण्यासाठी छोट्या शहरातल्या खेळाडूंना मेट्रो शहरात येण्याची गरज नाही. बरं या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी जो अनुभव लागतो, तो पुरवण्याचं काम विविध प्रांतातले अनुभवी खेळाडू करू शकतात. इतर प्रांतातल्या अनुभवी खेळाडूंचा अनुभव आता हवे तेवढे पैसे मोजून विकत घेता येतो. चंदू पंडित आणि वासिम जाफरचा केवढा मोठा वाटा विदर्भाच्या यशात आहे. वासिमचा चाळिसाव्या वर्षी खेळण्याचा उत्साह २० वर्षाच्या मुलासारखा आहे. पैशाची गंगा अंगणी आल्यावर या गोष्टी सुकर झाल्या. अर्थात आणखी एका गोष्टीचा ऊहापोह करायला हवा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर इतकं भरगच्च आहे, की वरच्या स्तरावरच्या वीसएक खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळायला मिळतच नाही. त्यामुळे गोलंदाज आणि फलंदाज यांचा कस लागतोच असं नाही. ज्या संघाचे खेळाडू भारतीय संघात जास्त खेळतात, त्यांना दुय्यम संघ उतरवावा लागतो. त्यामुळे रणजी ट्रॉफी ही सर्वोच्च दर्जाची स्पर्धा राहिलेली नाही. पण त्यात विजेत्यांचा काही दोष नाही. आणि हो अंतिम सामन्यात पुजारा खेळलाच ना?  एक मुंबईकर म्हणून एकेकाळी रणजीचं सम्राटपद भूषवणाऱ्या संघाचं होणारं पानिपत मला जिव्हारी लागतं. पण क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली. तिथेही लोकशाही आली. त्याचा आनंद आहे. आता कुठलाही संघ जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. आता देशभरातून खेळाडू भारतीय संघात यायला लागले. भारतीय संघातल्या पंधरा खेळाडूंना आणखीन पंधरा खेळाडू खो द्यायला तयार आहेत. हे चित्र जे दिसतं ना ते कितीतरी सुखद आहे.

सध्या जगात भारतीय संघाला जे कसोटी, वनडे किंवा टी-२० त यश मिळतंय त्याचं रहस्य या मुबलकतेत आहे. आणि ही मुबलकता क्रिकेट तळागाळात झिरपल्याने आलीय. आजचं विदर्भाचं यश उद्या त्रिपुरा, ओडिशा, केरळ वगैरे प्रांतातल्या खेळाडूंनाही जिंकण्याची ऊर्मी देऊ शकतं. त्यामुळे रणजी ट्रॉफी ही खऱ्या अर्थाने आता राष्ट्रीय स्पर्धा झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT