लढा व्यसनमुक्तीचा
सध्या तर दारूला सामाजिक मान्यता देण्याची मोहीम हाती घेतल्यासारखं दिसतंय. नवीन घराच्या इंटिरिअरमध्ये बार हवाच. घरात जिथे उदबत्ती लावतो, लहान मुलं बागडतात, तिथे बार असले की मोठेपणाचे लक्षण मानले जाते. मुलांना सोबत घेऊन पिणारेही आहेत; पण याची काय शाश्वती आहे की, ते पुढे संयम ठेवतील? त्यामुळे मुलांना व्यसनांपासून दूर ठेवले तरच तरुणाई सुदृढ आणि देश समृद्ध होईल.
डॉ. संगीता महाजन, मनोहर वैकर
नुकताच घडलेला प्रसंग! टेकडीवर जेव्हा तरुणाई मद्य आणि इतर मादक द्रव्यांचं सेवन करतात, बेशुद्ध किंवा झिंगलेल्या अवस्थेत सापडतात, वेळेत वैद्यकीय उपचारांसाठी नेलं, हे नशीब आणि लोकांचा चांगुलपणा. विचार करूनसुद्धा मन सुन्न होतं की, त्या मुलींवर काय अघटित घडलं असतं. असे प्रसंग बऱ्याच जणींवर आलेलेही आहेत. पण ‘पुढच्याच ठेच, मागचा शहाणा’ असे दिसत नाही.
त्यांनी व्यसन का केलं असेल? विविध कारणे सांगता येतील. १) प्रयोग म्हणून २) मित्र-मैत्रिणींचा प्रभाव ३) एखाद्या ग्रुपमध्ये आपण सहभागी असावे असे वाटणे ४) स्वतंत्र मनोवृत्तीचे प्रतीक व्हावे म्हणून (फॉरवर्ड)? ५) दहावी, बारावीनंतर सुटल्याची भावना, इत्यादी. कॉलेज, मित्र-मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठीही मुले असे प्रकार करतात. यातूनच ते व्यसनाच्या आहारी जातात.
वास्तव : पौगुंडावस्थेचं वयच निसरडं. अविचाराने धोका पत्करण्याचे कोवळे वय. व्यसनांची सुरुवात तर या वयापासूनच होते. दारूसारख्या पदार्थांमध्ये व्यसन लावण्याची ताकद जबरदस्त आहे. ‘एकच प्याला’च दुसऱ्या, तिसऱ्या आणि नंतर सतत हातात ‘प्याला’. कधी कोणाचं काय होईल?, सांगता येत नाही आणि आयुष्याची उतरण सुरू होते.
‘सोशल ड्रिंकर’च अल्कोहोलिक कोण, कधी होईल, हे कोडं आहे. एखाद्याला व्यसन लागले तर त्याला त्याशिवाय जगणेही अवघड होते आणि व्यसनांच्या पाशातून बाहेर पडणेही जमत नाही.ओळखीची एक गरीब मुलगी, वडिलांना दारूचं व्यसन. बायको-मुलीचा पगार त्यातच ते उडवतात. त्यामुळे तिला सांगितलं की, पगार बँकेत जमा कर. जेमतेम दोन महिने पगार खात्यात जमा झाला. वडिलांना अति दारूमुळे त्रास होऊन ॲडमिट करावं लागलं. घरात पैका नाही आणि शेवटी तिला खात्यातून सर्व रक्कम काढावी लागली. या मुलीला, तिच्या आईला काय ताण, जबाबदाऱ्या कमी आहेत का? पण त्यांनी दारूची वाट धरली नाही. कष्टाचे पैसे दारूने खाल्ले, घरी बाकीच्यांची उपासमार.
परदेशी ब्रँड ते देशी-अवैध सर्व प्रकार सर्वत्र उपलब्ध असतात. आकर्षक जाहिरातींमध्ये मॉडेलस वा हिरो-हिरोईन मिनरल पाणी, फ्रुटज्यूस घेऊन मजा करताना दाखवतात, पण खरी जाहिरात त्या कंपनीच्या दारूची असते. कॉलेज, नोकरी, ऑफिसची पार्टी आहे, तिथे मी नाही ड्रिंक घेतलं तर सगळे काय म्हणतील? हा न्यूनगंड. प्रेझेंटेशन आहे, ‘टेन्शन दूर करायला थोडी घेऊचा प्रवास’, ‘त्याशिवाय प्रेझेंटेशन करू शकत नाही’, असा होतो.
यात लग्नाच्या वेळी होणाऱ्या ‘कॉकटेल पार्ट्यां’चा आग्रह! ओळखीचे एक उच्चपदस्थ, जगभर कामानिमित्त वावर, पण दारू न पिणारे गृहस्थ. सुरुवातीपासून नाही म्हणायचे आणि त्यात कुठेही त्यांना कमीपणा वाटत नसे. परदेशात तिथल्या लोकांनी त्यांची कधीही यावरून चेष्टा-सक्ती केली नाही आणि दारू न घेतल्यामुळे कुठेही त्यांच्या प्रगतीत खंड पडला नाही. अधिकारी, यशस्वी मंडळी दारू-पान करताना दिसली की, या पदांचे होतकरू मुलेदेखील त्याचं अनुसरण करतात. ‘नो अल्कोहोल’ही चॉईस तितक्याच ताकदीची आहे. ‘न्यूनगंड नाही’ हे रुजायला आपण प्रयत्नशील का होत नाही?
दारूचे दुष्परिणाम : दारूमुळे अपघात, हाणामारी, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार घरी किंवा शेजारीपाजारी अनुभवलेले असतात. दारूचे परिणाम शरीरव्यापी आहेत. शरीरावरचे, मेंदूचे नियंत्रण जाणे, हातापायांना बधीरता, स्मरणशक्ती कमी होणे, नैतिक मर्यादांचे उल्लंघन, जठरात अल्सर, कर्करोग, मधुमेह, कावीळ, सिरोसीस, हृदयविकार आणि बरेच आजार उद्भवतात.
(डॉ. महाजन या पेस ग्रुपच्या सचिव व
विश्वस्त असून वैकर हे पेस ग्रुपचे समन्वयक आहेत.)
पेस ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क :
९८५०८८८२९०/ ९८९०६०६९९०
दारूने चांगलं काही होतं का?
चार मित्रमैत्रिणी (जे गरज असेल तेव्हा गायब होतील)
महसूल-खात्याला नफा (आरोग्य खात्याचा तोटा)
काही रोजगार (बऱ्याच ठिकाणी कामांवर दुष्परिणाम)
व्यसन सोडण्यासाठी काय करता येईल?
व्यसनांमुळे मेंदूत स्त्रवणारी रसायने तात्पुरती मजा देतील; परंतु बाकी बऱ्याच सकारात्मक कृतींमधून शाश्वत आनंद मिळू शकतो. उदा. खेळ, संगीत, गप्पा, सेवा-समाजकार्य इत्यादी. मित्र आणि दारू, सेलिब्रेशन आणि दारू हे समीकरण बदलणे आपल्याच हातात आहे. जवळच्या मित्रांशी, पालकांशी वा शिक्षकांशी याबद्दल बोलण्याचे धाडस करा. ठाम राहिलात तर व्यसन सोडता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.