संपादकीय

मन मंदिरा... : आपुलीच प्रतिमा होते...

डॉ. विद्याधर बापट

न्यूनगंड हा एक असा गंड आहे, ज्यामध्ये व्यक्ती स्वत:च स्वत:ला कमालीची कमी लेखत असते. आणि त्यामुळे ती जीवनात कर्तृत्वाच्या क्षेत्रात तर ती मागे राहतेच, तसेच व्यक्तिगत आयुष्यातही सतत अस्वस्थ अवस्थेत राहते. सतत इतरांशी तुलना करत राहते. वस्तुत: प्रत्येकात काही ना काही कमतरता असतेच. कुठलीही व्यक्ती परिपूर्ण नसते. पण, न्यूनगंड असलेली व्यक्ती काही बाबतीत स्वत:त असलेली कमतरता सतत मनात ठेवून वावरत असते. आपल्यात असलेल्या बलस्थानांकडे संपूर्णपणे डोळेझाक करते. याचे कारण साधारणपणे कुठलेही मूल जन्मत:च न्यूनगंड घेऊन जन्माला येत नाही.

जगाचा अनुभव, त्यातून निर्माण होणारे नकारात्मक विचारांचे तरंग,  त्यातून होत गेलेलं मनाचं नकारात्मक प्रोग्रामिंग, निर्माण होत गेलेली दुबळी आत्मप्रतिमा अशा अनेक गोष्टींचं पर्यवसान न्यूनगंडात होतं. काहीवेळा पालकांची pessimistic personality आणि मेंदूतील रासायनिक असंतुलनाबरोबरच न्यूनगंड निर्माण व्हायला बरीच कारणं असू शकतात उदा. - लहानपणी सतत टीका सहन करावी लागणं.भावंडांमध्ये सतत तुलना होणं . शाळेमध्ये जिव्हारी लागलेला सततचा अपमान.निगरगट्ट मुलांनी हळव्या मुलांची केलेली अवहेलना, त्यांचा अपमान. शिक्षकांनी व समाजातील इतर व्यक्तींनी दिलेली चुकीची, अन्याय्य वागणूक.आर्थिक परिस्थिती किंवा जातीवरून केलेला आणि जिव्हारी लागलेला अपमान. लहानपणी झालेला शारीरिक वा मानसिक छळ. पौगंडावस्थेत झालेला लैंगिक छळ किंवा त्याबाबतीत झालेली टिंगल. बुद्धी, शारीरिक ठेवण, व्यंग, दिसणं,बोलण्यातील दोषावरून झालेली टिंगल. मुख्य म्हणजे असं काही घडलं असलं, आणि ते कितीही चुकीचं आणि अन्याय्य असलं तरी आपण कमी महत्त्वाचे ठरत नाही. आपल्याप्रमाणेच पुष्कळांच्या बाबतीत असं घडलेलं असू शकतं. त्यांनी काही स्वत:वर ‘बिन महत्त्वाचा माणूस’ असं लेबल चिकटवलेलं नसतं, हे ह्या व्यक्ती लक्षात घेत नाहीत.

पराभूत मनोवृत्ती आणि दुबळी आत्मप्रतिमा निर्माण होण्यात स्वत:शी असलेला नकारात्मक संवाद हे मोठं कारण असू शकतं. न्यूनगंडग्रस्त व्यक्तींचा स्वत:शी असलेला संवाद नकारात्मक असतो. ‘माझी पात्रताच नाही’, ‘मला हे जमणारच नाही’, ‘मी कमी आहे असं सगळ्यांना वाटतं’ असली वाक्‍य त्यांच्या मनात सतत रुंजी घालत असतात. अशा विचारांनी आत्मप्रतिमा आणखी दुबळी होत जाते. आत्मविश्वास कमी होतो. आपण इतरांपेक्षा नेहमी सर्वच बाबतीत कमी रहाणार, अपयशी ठरणार हे जणू ठरवूनच टाकलं जातं. आपल्या स्व- संवादात वास्तवाचा भाग किती आहे आणि काल्पनिक किंवा चुकीची धारणा कशी आहे, ह्याचा विचार केला जात नाही. त्यामुळे स्व-संवाद जाणीवपूर्वक पाहाणे आणि तो सकारात्मक करणं महत्त्वाचं ठरतं.

न्यूनगंडावर मात 
बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत न्यूनगंडावर मात करता येते. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन रुजावा. त्यासाठी पुढील गोष्टी समजून घ्यायला हव्यात आणि करायला हव्यात. भूतकाळातल्या कडवट आठवणी व अनुभव विसरूया आणि पुढे जाऊया. ह्या जगात प्रत्येक माणसांत काही ना काही बलस्थानं असतात. तशी ती आपल्यातही आहेत, हे लक्षात घेऊया. आपल्या क्षमता ओळखणे महत्त्वाचे. माझा आतला गाभा नेहमीच शांत असला पाहिजे. स्वत:विषयी व इतरांविषययीही सतत चांगला विचार करूया. इतरांच्या चांगल्या कृतीबद्दल, त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करूया.ज्या लोकांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवलं त्यांचा आदर्श ठेवूया. आपला स्व-संवाद सकारात्मक होतोय ह्याकडे जाणीवपूर्वक पाहूया. असहाय्य वाटलंच तरी त्याचा अर्थ सगळं संपलं असं नव्हे. 

आयुष्यात कुठलीच परिस्थिती कायम रहात नाही. म्हणूनच विपरित परिस्थिती आलीच तर ती बदलेलच ह्यावर ठाम विश्वास ठेवूया. जर आपण नकारात्मक विचारसरणीचे असू तर स्वत:त बदल घडवणं अत्यावश्‍यक आहे हे मान्य करूया. असा बदल घडवता येतो हे मान्य करुया. स्वत:वर टीका करणं थांबवूया आणि आव्हानांना सामोरं जायचं ठरवूया. साक्षीभावाने माणसं, प्रसंग, घटना अनुभवायचा प्रयत्न करुया. साक्षीभाव म्हणजे औदासिन्य नव्हे, तर शांतपणे परिस्थिती न्याहाळण्याची ती एक कला आहे. मनाचं पॉझिटिव्ह रिप्रोग्रामिंग आणि न्यूनगंडावर मात शक्‍य आहे. फक्त स्वत:त बदल घडवण्याची तीव्र इच्छा हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT