Grains Sakal
संपादकीय

पुन्हा अवतरावे भरडधान्याचे युग

एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात सुद्धा तेवढीच चांगली, सकारात्मक आणि शाश्वत असू शकते, हे आपणास आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ यामधून नमूद होते.

डॉ. नागेश टेकाळे

एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात सुद्धा तेवढीच चांगली, सकारात्मक आणि शाश्वत असू शकते, हे आपणास आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ यामधून नमूद होते.

एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात सुद्धा तेवढीच चांगली, सकारात्मक आणि शाश्वत असू शकते, हे आपणास आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ यामधून नमूद होते. भरडधान्य म्हणजे एक प्रकारची तृणधान्येच! या गवत कुळामधील धान्यांना खाण्यापूर्वी भरडले जाते. या प्रक्रियेमध्ये फळाभोवतालचे पौष्टिक कवच अर्धवट सोलले जाते. यासाठी मुसळ अथवा पारंपरिक पद्धती वापरली जाते. भरडलेले हे धान्य कर्बाबरोबरच प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थाने श्रीमंत असतात तेवढेच पौष्टिक सुद्धा! यातील कर्ब पचावयास हलका असतो म्हणून भरडधान्ये बाल आहारात समाविष्ट केली जातात. पूर्वी आशिया खंडामधील लोकांचे हे पारंपरिक मुख्य अन्न होते. एकूण ११ महत्त्वाच्या भरडधान्यापैकी ९ भरडधान्ये भारतामधील आहेत आणि त्यांना प्रांताप्रमाणे तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी नावे आहे. उदा. कोदो, कुटकी, ज्वारी, सेन्द्री, बाजरी, भगर, कंगनी अथवा राळ, हरी कंगणी, छाना, राजगिरा आदी. ही सर्व भरडधान्ये समृद्ध जंगलाने दिलेली देणगी आहे.

प्रत्येक भरडधान्य पचावयास हलके म्हणून पौष्टिक मूल्य उच्च दर्जाचे आहे. आपण यांनाच गिरणीमध्ये पॉलिश करून त्यांच्यावरचे हलके कवच काढून त्याचा कोंडा म्हणून त्यास फेकून देतो. हरितक्रांतीपूर्वी म्हणजे ६०-७० च्या दशकाआधी आपल्या आहारात ही सर्व भरडधान्ये समाविष्ट असत. त्यामुळे लोकांचे आरोग्यसुद्धा उत्तम होते आणि प्रतिकार शक्तीही मजबूत होती. मेक्सिकोमधील गहू, भाताने देशामधील लोकांच्या भुकेचा कळवळा म्हणून शेतीवर आक्रमण करून त्यांचे स्वत:चे राज्य निर्माण केले. विविध प्रकारच्या गव्हाच्या, तांदळाच्या आणि मक्याच्या जातींनी पारंपरिक भरडधान्यांना जंगलात राहणाऱ्‍या अदिवासीच्या शेतात बंदिस्त केले आणि त्यांना संशोधनापासून वंचित केले. गहू, तांदूळ यांच्या मुबलक वापरामुळे पाच दशकांपूर्वी माहीत नसलेले मधुमेह, रक्तदाब, हृदयांचे विकार या श्रीमंत रोग माणसाचे मित्र झाले. आज आपण मधुमेहाची राजधानी या गौरवास प्राप्त झालो आहोत, ते भरडधान्यांना ताटाबाहेर काढून गहू, तांदूळास त्या जागी बसविल्यामुळेच.

भरडधान्ये त्यांची पौष्टिकता आणि कृषीमधील त्यांचे हजारो वर्षांचे पारंपरिक महत्त्व केंद्र शासनाच्या लक्षात आले आणि आपल्या देशाने रशिया, बांगला देश, नेपाळ, नायझेरिया, केनिया या देशांच्या मदतीने भरडधान्यांना संरक्षण मिळावे, त्यांचे लागवडीचे क्षेत्र वाढून लोकांच्या आहारात त्यांचा समावेश व्हावा, त्याचे महत्त्व सर्व राष्ट्रांना समजावे म्हणून आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष हा ठराव युनोमध्ये मांडला, ७० देशांनी या ठरावाला अनुमोदन दिले आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व १९३ सदस्य राष्ट्रांनी भारताच्या या प्रयत्नाचे कौतुक करत हा ठराव बहुमताने मंजूर केला. आपल्या देशाच्या या प्रयत्नामुळेच ३ मार्च २०२१ रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरले आणि सर्व सदस्य राष्ट्रांनी त्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली.

भरडधान्य उत्पादनासाठी शेतकऱ्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी आता केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने विविध योजना लागू करत आहे. त्यामध्ये अल्पभूधारकांना मोफत बीजवाटप, धान्याला उच्च भाव यांचा समावेश आहे. या योजनेमधून अल्पभूधारकांना कृषीसाठी शाश्‍वत पर्याय देणे, रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर कमी करून त्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविणे हा सुद्धा आहे. पाश्‍चिमात्य आहार शैलीमुळेच ही भरडधान्ये लुप्त झाली. आदिवासी बालकांचे कुपोषण तांदळाच्या खिचडीने दूर होत नाही. त्यासाठी अंगणवाडीमधील बालकांना दररोज एक राजगिरा लाडू दिला तरी उत्तम. माझ्या आदिवासी क्षेत्रात या लाडूने अंगणवाडीमधील उपस्थिती १०० टक्के केली होती. राजगिरा लागवडीचा प्रयोग आदिवासी भागात यशस्वी होऊ शकतो हे देखील मी सिद्ध केले. कारण या भरडधान्यांची तीच तर खरी भूमी आहे. भरडधान्याचे सहा हजार वर्षांचे सुखी राज्य हरितक्रांतीच्या ६० वर्षांच्या राज्याने धुळीला मिळवले. कमी पाण्यावर, ताणतणाव सहन करणारी ही भरडधान्य पिके येणाऱ्‍या भविष्यात वातावरण बदलावर यशस्वी मात करू शकतात. आज शेतकरी मजूर विविध समस्यांमुळे पीडित आहे, भरडधान्याचे कुटुंबास पुरेल एवढे उत्पादन त्यांना घरीच तयार करता येते, त्यास फार पाण्याची गरज नाही आणि रासायनिक खतांची तर अजिबात नाही. हे धान्य बरेच वर्षे सहज टिकते आणि प्रत्येक वर्षाला त्यांची चवही वाढत जाते. आमच्या घरी या भरडधान्याची उतरंडच होती. प्रत्येक वर्षाचा स्वतंत्र माठ. जेवढे धान्य जुने तेवढा त्याचा सुगंध जास्त.

भरडधान्याचा हा नैसर्गिक सुगंध भारताच्या प्रत्येक राज्यामधील गरीब श्रीमंताच्या जेवणाच्या ताटाजवळ येऊन थांबावा, ही केंद्र शासनाची इच्छा आहे आणि त्यास त्यांचे आर्थिक पाठबळ सुद्धा आहे. आता आपणच यात पुढाकार घेऊन शेतकऱ्‍यांना पुन्हा या आगळ्यावेगळ्या पारंपरिक पीकपद्धतीकडे वळवणे, त्यांचा आत्मविश्‍वास वाढवून त्यातून त्यांची शेती कशी जास्त शाश्‍वत होईल, हे पाहणे गरजेचे आहे. भरडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी आपण प्रत्येकानेच आपल्या आहारात बदल करून या तृणधान्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. ‘आठवड्यात एक दिवस भरडधान्याचा’ असे ठरविले तर हे सहज शक्य आहे. जेवणात पापड हा हवाच, कारण तो आमच्या रक्तदाबासाठी आवश्यक आहे, त्याची जागा भगरीच्या पापडीला द्या आणि पाहा हा बदल तुमच्या आहारात आणि आरोग्यात केवढा तरी बदल करू शकतो. शेवटी बदल हा स्वत:पासून केला तरच उत्पादकांना बळ मिळू शकते.

आजही आठवते...

मला आजही आठवते, राळीची खीर, भगरीचे थालीपीठ, उपवासाची भगर, राजगिऱ्‍याचे दामटे, दाण्याची आमटी हे सर्व मिळविण्यासाठी मी आईबरोबर लहानपणी कितीतरी उपवास केले आहेत. उद्देश एकच, आपल्या शेतामधील पौष्टिक भरडधान्यांची चव आईच्या हातून चाखता यावी.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT