मुंबई - लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांना अन्नवाटप करताना महिला पोलिस कर्मचारी. 
संपादकीय

भाष्य : आव्हानात्मक पोलिसिंग

प्रवीण दीक्षित

‘कोरोना’च्या विरोधातील लढ्यात अन्य यंत्रणांबरोबरच पोलिसांवरील जबाबदारी मोठी आहे. लॉकडाउनच्या काळात लोकांना शिस्त लावतानाच, संसर्गापासून स्वतःचे रक्षण करणे असे दुहेरी आव्हान पोलिसांसमोर आहे. अशा कसोटीच्या वेळी जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे पंचवीस मार्चपासून देशातील सर्व व्यवहार पूर्ण बंद ठेवल्याने रुग्णांची संख्या आटोक्‍यात ठेवणे शक्‍य झाले आहे. परंतु जसजसे सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होतील, तेव्हा नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दी न करणे यासारखे उपाय राबविणे शक्‍य होतील काय, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. वैयक्तिक स्वच्छतेचे नियम पाळणे, बाहेर फिरताना मास्क वापरणे, हातमोजे वापरणे, उघड्यावर न थुंकणे, खोकला वा शिंक आल्यास रुमाल वापरणे या प्राथमिक गोष्टींमुळे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आटोक्‍यात राहू शकतो. परंतु हे उपाय केल्यानंतरही त्याचा प्रसार होणार नाही याची खात्री नाही.

विशेषतः दाट वस्ती असलेल्या शहरी भागात ही समस्या गंभीर आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणारे लाखो प्रवासी आहेत, त्यांना सुरक्षित अंतर पाळणे अशक्‍य आहे. सध्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वे वाहतूक व अन्य व्यवहार बंद असल्यामुळे या समस्या नियंत्रणात होत्या. परंतु आगामी काळात सर्व व्यवहार सुरू होतील, तसतशा या समस्या गंभीर होत जातील व त्यामुळे कायदा- सुव्यवस्था राखणे अवघड होईल. त्यामुळे पोलिसांवरील जबाबदारी वाढणार आहे.

या काळात उपचार करताना रुग्णांशी संपर्क आल्याने अनेक डॉक्‍टर, परिचारिका, तसेच बंदोबस्तावरील पोलिसांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे व दुर्दैवाने अनेकजण दगावले आहेत. ‘कोरोना’वर उपचारांसाठी रुग्णालयात डॉक्‍टर व परिचारिका आहेत, तर सुरक्षित अंतर व इतर उपाय करण्यासाठी पोलिस प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. वारंवार सांगूनही धार्मिक स्थळांच्या ठिकाणी, तसेच बाजारपेठांमध्ये कोणतेही नियम न पाळता लोक गर्दी करत आहेत. परराज्यांत जाण्यासाठी स्थलांतरित कामगार नवनवीन शक्कल लढवून टॅंकर, कंटेनर, बोटीमधून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणची स्वच्छता, या लोकांची मोजदाद व शांतता ठेवण्याची अवघड जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागत आहे. याशिवाय  केवळ मजा म्हणून दुचाकीवर फिरणाऱ्या टोळक्‍यांना आवरणे, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या लोकांना प्रतिबंध करणे ही कामेही पोलिसांना करावी लागत आहेत. साहजिकच पोलिस यंत्रणेवरील शारीरिक आणि मानसिक ताण वाढला आहे. 

मार्च महिन्यात चीन व अन्य देशांतून आलेल्या भारतीयांना विलगीकरणासाठी ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, तेथील व्यवस्थाही पोलिसांनी समर्थपणे हाताळली होती. परंतु आता लवकरच आखाती देशांतून हजारो भारतीय परतण्याची शक्‍यता आहे. त्यांची राहण्याची व वाहतुकीची व्यवस्था करण्याची मोठी जबाबदारी सरकारला व पोलिसांना पार पाडावी लागेल. त्याचबरोबर परराज्यांत परत जाऊ इच्छिणाऱ्या लाखो मजुरांना आरोग्य प्रमाणपत्रासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये जाणे सक्तीचे करण्यात आले आहे. तेथे लागणारा वेळ व त्यांच्या रांगा हाताळणे ही पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी झाली आहे. या शिवाय रेशन दुकानांसमोरील गर्दी व मद्याच्या दुकानांसमोरील गर्दी हाताळणे हेही काम पोलिस पार पाडत आहेत. त्यातच रेशन दुकानांबाबत भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत आहेत. दुकानात जाण्याऐवजी ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन व्यवहारामार्फत वैयक्तिक माहिती मिळवून फसवणूक होत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. लॉकडाउनमुळे स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण व तक्रारीदेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

अशा प्रकारे या काळात स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्यास जपणे, रस्त्यावरील लोकांना शिस्त लावणे, अफवा पसरविणारयांविरुद्ध कारवाई करणे, नवनवीन गुन्ह्यांचा तपास करणे, अशा अनेक जबाबदाऱ्या पोलिसांना पार पाडाव्या लागत आहेत. येत्या काही दिवसांतच न्यायालयांचे काम सुरू होईल, तेव्हा तुरुंगातून कैद्यांची ने -आण करणे, कैद्यांना रुग्णालयात नेणे ही जबाबदारीही पोलिसांना पार पाडावी लागणार आहे. या परिस्थितीत रस्त्यावर येणाऱ्या लोकांना हाताळताना पोलिसांची कसोटी लागत आहे.

जमाव पांगविण्यासाठी लाठीमार व अश्रुधूराचा वापर करणे या पारंपरिक पद्धती पोलिस वापरत आहेत. पण त्याऐवजी श्रमिक असोत, अथवा एखाद्या धर्माचे, पंथाचे लोक असोत, त्यांच्या नेत्यांशी संपर्क करून त्यांच्यामार्फत या लोकांवर नियंत्रण आणण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी पोलिसांनी विविध गटांच्या नेत्यांशी दैनंदिन संपर्क वाढविण्याची गरज आहे. अनेक सामाजिक संस्था, ‘एन्‌सीसी’चे छात्र, स्वयंसेवक यांचीही माहिती एकत्र करून त्यांचा वापर करता येईल. त्याचबरोबर अन्य शासकीय विभाग, जसे महसूल, वाहतूक, महापालिका यांच्याशी समन्वय व संवाद वाढवणे जरुरीचे आहे. आजमितीस या समन्वयाअभावी अनेक गंभीर समस्या या कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या होत आहेत. 

याचबरोबर पोलिसांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे जरुरीचे आहे. विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस मदतनीस/मित्र यांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी ॲपचा वापर पोलिसांचे काम सोपे करू शकतो. आज मोठ्या शहरांमध्ये ‘सीसीटीव्ही’चे जाळे बसविण्यात आले आहे. त्याचा वापर करून आवश्‍यक त्या ठिकाणी कारवाई करणे सहज शक्‍य आहे. ड्रोन तंत्रज्ञान वापरून व स्पीकरचा उपयोग केल्यास जमाव पांगवण्यासाठीही मदत मिळू शकेल. त्याचबरोबर पोलिसांकडे माहिती/ तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर / ‘व्हॉटसॲप’ यांचा पोलिस ठाणे पातळीपर्यंत वापर झाल्यास लोकांना पोलिस ठाण्यात जाण्याची गरज कमी होईल. न्यायालये, तुरुंग व सार्वजनिक रुग्णालये येथील व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधेचा वापर वाढवून न्यायालये अथवा रुग्णालये येथे प्रत्यक्ष जाण्याची आवश्‍यकता कमी करता येईल.

त्यासाठी ‘गुगल मिटिंगसारखे तंत्रज्ञान निःशुल्क उपलब्ध आहे. त्याचा वापर करण्याचा विचार व्हावा. वरील उपाय करत असताना पोलिसांचे आरोग्य व मनोधैर्य टिकवण्यासाठीही पावले टाकणे गरजेचे आहे. पोलिसांसाठी प्रतिबंधक साधने, संरक्षक किट, मास्क, हातमोजे उपलब्ध करून देण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता सार्वजनिक संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. पोलिसांच्या निवासस्थानी आरोग्य तपासणी, तसेच योगासने, शारीरिक व्यायाम, स्वच्छता याकडे विशेष लक्ष देणे आवश्‍यक आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पोलिसांना फलाहार, ताजे जेवण व पुरेशी विश्रांती मिळते आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पहिजे. आजमितीस तीनशेहून अधिक पोलिसांना ‘कोरोना’ची बाधा झाली असून, चौघे जण दगावले आहेत. मृत पोलिसांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत त्यांच्या कुटुंबीयांकडे तातडीने पोचविणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर त्यांच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी दिली पाहिजे. तसेच पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांचा ‘कोरोना’शी संबंधित उपचारांचा खर्च करण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे.       

केंद्र सरकारचे ‘आरोग्यसेतू’ ॲप सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करून जनता व पोलिस ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात मोठे योगदान देऊ शकतील. याचबरोबर पोलिस करत असलेल्या समाजोपयोगी गोष्टींना प्रसारमाध्यमांनी जनतेपर्यंत पोचवण्याची जरुरी आहे. त्यामुळे जनता, सरकार व पोलिस एकदिलाने प्रयत्न करून ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करू शकतील, असा विश्वास वाटतो.  
(लेखक निवृत्त पोलिस महासंचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT