Dr. Tara Bhawalkar sakal
editorial-articles

अग्रलेख : लोकसाहित्यातील ध्रुव‘तारा’

डॉ. भवाळकर यांचे नाव गेली अनेक वर्षे अध्यक्षपदाच्या चर्चेत असायचे. मात्र या वेळी झालेली त्यांची निवड अधिक समयोचित म्हणायला हवी.

सकाळ वृत्तसेवा

स्वतःचे विचारसूत्र मांडण्याचा प्रयत्न तारा भवाळकर यांनी केला; मात्र आपले मत ठामपणे मांडतानाही त्यांनी परमताचा अनादर केला नाही.

देशाच्या राजधानीत १९५४ मध्ये झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. त्यांच्याच मार्गदर्शनखाली ‘विश्वकोशा’त ‘लोकसाहित्य’ विभागाचे संपादन करणाऱ्या डॉ. तारा भवाळकर तब्बल सात दशकांनी दिल्लीतच होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व्हाव्यात, हा एक अपूर्व योगायोग म्हणावा लागेल.

डॉ. भवाळकर यांचे नाव गेली अनेक वर्षे अध्यक्षपदाच्या चर्चेत असायचे. मात्र या वेळी झालेली त्यांची निवड अधिक समयोचित म्हणायला हवी. राजधानीत होत असलेले संमेलन, मराठीला नुकताच मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि आता डॉ. तारा भवाळकर यांची अध्यक्षपदासाठी निवड या सर्वच घटना मराठी जगताला सुखावणाऱ्या आहेत.

एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन त्याचा सखोल अभ्यास करणे आणि तो समाजापुढे मांडणे हे त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकसाहित्य-लोकसंस्कृतीच्या माध्यमातून केवळ मराठी भाषाच नाही तर, एकूणच मराठी संस्कृतीचा आदिम ते अद्यतन असा मागोवा घेणाऱ्या एका अभ्यासक-संशोधकाची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही विशेष बाब.

साहित्य संमेलन म्हटले की, एखाद्याची अध्यक्षपदी निवड होण्याआधीपासून तत्संबंधीचे वाद रंगायला सुरुवात होते. ज्यांची नावे चर्चेत असतात ते स्वतः नाही, तरी त्यांचे समर्थक वेगवेगळ्या परीने चर्चा घडवून आणत असतात. यावेळीही डॉ. भवाळकर आणि प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील अशी दोन नावे प्रामुख्याने पुढे आली होती.

मात्र यावेळच्या अध्यक्षनिवडीची खासियत म्हणजे ताराबाईंच्या निवडीचा आनंद एकजात साऱ्यांना झालेला आहे आणि त्याची झलक समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहे. संमेलनाध्यक्षाच्या निवडीनंतर अशी आनंदाची उसळलेली लहर कित्येक वर्षांनंतर प्रथमच पाहायला मिळत आहे.

ज्येष्ठ विदुषी दुर्गा भागवत, कुसुमावती देशपांडे, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष आणि अरुणा ढेरे या स्त्री साहित्यिकांनंतर आता डॉ. तारा भवाळकर यांची निवड निश्चितच मराठी मनासाठी आनंददायी आहे. ठाम तरी ऋजू व्यक्तिमत्त्वाच्या ताराबाई लहानपणापासून चौकस आहेत. त्यांची ही चौकस वृत्ती आणि शिक्षकी पेशातून आलेला तर्कनिष्ठपणा त्यांच्या सर्व साहित्यातूनही उमटला आहे.

लोकसाहित्य, लोकसंस्कृती, नागर-अनागर रंगभूमी, स्त्रीवाद हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. त्यातून ‘मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे’, ‘मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद', ‘महामाया’, ‘मिथक आणि नाटक’, ‘यक्षगान आणि मराठी नाट्यपरंपरा’, ‘लोकनागर रंगभूमी’, ‘लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा’, ‘लोकपरंपरेतील सीता’, ‘लोकसंचित’, ‘संस्कृतीची शोधयात्रा’, ‘स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर’ ते अलीकडेच प्रकाशित झालेले ‘सीतायन’ अशी त्यांची मौलिक ग्रंथसंपदा आहे.

या साऱ्यांतून त्यांनी स्वतःचे असे एक विचारसूत्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आपले मत ठामपणे मांडतानाही त्यांनी परमताचा कधीही अनादर केलेला नाही. ज्ञानसाधकाचे हेच लक्षण असते. डॉ. रा.चिं. ढेरे यांच्यासारख्या ज्ञानोपासकाच्या संशोधनकार्यातही त्या सहभागी झाल्या होत्या.

लोकसाहित्य-लोकसंस्कृती या विषयाचा अभ्यास करताना केवळ भावनेचा ओढा उपयोगी नाही, तर विवेकी दृष्टी महत्त्वाची आहे, हे त्यांनी आपल्या सैद्धांतिक मांडणीतून सातत्याने दाखवून दिले. लोकसाहित्यातूनच त्यांनी आजवर लोकसंस्कृतीचे वस्तुनिष्ठ व चिकित्सक दृष्टीने सखोल व व्यापक दर्शन घडवले आहे. महत्त्वाचे म्हणजे संस्कृतीचा अभ्यास करतानाही त्या कोणत्याही अर्थाने परंपरावादी नाहीत.

लोकसंस्कृती ही प्रवाही असते आणि या प्रवाहातील सर्व काही सकस नसते; त्यामुळे योग्य ते वेचून, त्याला तर्कनिष्ठतेची कसोटी लावणे आणि त्याची मांडणी करणे, ही ताराबाईंची लेखनपद्धती. त्या कुठलीही गोष्ट अंधपणाने स्वीकारत नाहीत; मग ती गोष्ट प्राचीन असो वा अर्वाचीन.

म्हणूनच जेव्हा १९७५ मध्ये आंतरराष्ट्रीय स्त्री-मुक्ती वर्ष भारतातही जोरदारपणे साजरे होत होते, तेव्हा ‘स्त्री-मुक्तीची कल्पना निदान आपल्याकडे तरी नवीन नाही’ असा मुद्दा ताराबाईंनी लावून धरला होता आणि त्यासाठी मध्ययुगात होऊन गेलेल्या संतस्त्रियांचे दाखले दिले होते. ‘स्त्री-मुक्तीचा आत्मस्वर’ हे त्यांचे पुस्तक मध्ययुगातील स्त्री-मुक्ती संकल्पनेची स्त्रीवादाच्या अंगाने अभ्यासपूर्ण मांडणी करणारे आहे.

नंतरच्या काळात त्यांनी एकूण लोकसंस्कृतीचाच त्या अंगाने मागोवा घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आले की- ही लोकसंस्कृती खरेतर मातृसंस्कृती आहे! मग हा अभ्यासही त्यांनी आणखी पुढे नेला. मराठीला अभिजात दर्जा मिळालेला असताना लोकसाहित्यावर उमटलेली ही ‘राजमुद्रा’ म्हणजे मणिकांचन योगच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT