Bihar-Election 
editorial-articles

अग्रलेख : बिहार में एक ‘चिराग’!

सकाळवृत्तसेवा

‘कोरोना’च्या सावटाखाली होणाऱ्या देशातील पहिल्या मतदानाला अवघे तीन आठवडे उरले असतानाच, बिहारच्या राजकारणाला  एक नवेच परिमाण मिळाले आहे. त्यामागे अर्थातच भाजपची खेळी आहे. भाजपच्या या खेळीतील प्रमुख खिलाडी ‘लोकजनशक्‍ती पक्षा’चे केंद्रात मंत्री असलेल्या रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान हे आहेत. रामविलास सध्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे चिराग यांनी पिताश्रींचे केंद्रातील मंत्रिपद कायम राखत, तसेच नरेंद्र मोदी यांच्या चरणी आपल्या निष्ठा प्रदर्शित करत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी मात्र थेट पंगा घेतला आहे. एकीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) स्थान बळकट करत त्यांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने, त्यामागील भाजपचे कुटिल राजकारणही उघड झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याचे कारण म्हणजे ‘एकला चलो!’ अशी बाणेदार भूमिका घेणारे हे चिराग पासवान भाजप उमेदवारांना मात्र मोकळे रान देत, केवळ नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या विरोधात उमेदवार उभे करणार आहेत! नितीशकुमार आणि पासवान यांची बव्हंशी मतपेढी ही मागासवर्गीय  व ‘ओबीसी’ आहे. त्या मतांना खिंडार पाडून नितीशकुमार यांचे बळ कमी करावयाचे, अशी ही रणनीती आहे! शिवाय, एकीकडे चिराग यांना स्वतंत्रपणे मैदानात उतरवतानाच भाजपने नितीशकुमार यांनाही आपल्यापुढे गुडघे टेकायला लावले आहे. बिहारी राजकारणाचे रंग कसे क्षणाक्षणाला बदलतात, त्याचेच दर्शन यामुळे घडते. 

दीड वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नितीशकुमार यांनी भाजपला पांढऱ्या शेल्यात हात बांधून उभे केले होते. तेव्हा २०१९ मध्ये सत्तेचे तख्त राखता येते की नाही, याबाबत भाजप संभ्रमित झाला होता. दस्तुरखुद्द अमित शहा यांनी शिवसेना आपल्यासोबत यावी, म्हणून ‘मातोश्री’वर पायधूळ झाडली होती. त्याचा फायदा घेत नितीशकुमार यांनी २०१४ मध्ये भाजपने जिंकलेल्या २२ जागांपैकी पाच जागा पदरात पाडून घेतल्या! मात्र, नंतरच्या दीड वर्षात बिहारी राजकारण अळवावरच्या पाण्यासारखे असते, हे स्पष्ट झाले आणि आता जाहीर झालेल्या जागावाटपानुसार भाजप व जेडी(यु) जवळजवळ ५०-५० टक्के जागा लढवणार आहेत! जेडी(यु)पेक्षा अधिक जागा लढवून मुख्यमंत्रिपद हासील करण्याचा भाजपचा डाव आहे, ही बाब उघड झाली आहे. नितीशकुमार यांना या वेळी बिहारच्या सारीपाटावर दोन घरे का होईना ही माघार घ्यावी लागली, त्यास अनेक कारणे आहेत. त्यातील प्रमुख कारण हे अर्थातच ‘कोरोना’च्या संसर्गाविरोधात यंत्रणा झडझडून कामाला लावण्यात आलेले अपयश जसे आहे, त्याचबरोबर ठाणबंदीच्या पहिल्या सत्रात बिहारी स्थलांतरित मजुरांची झालेली फरपट हेही आहे.

मध्यंतरीच्या काही महिन्यांचा अपवाद वगळता सलग १५ वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिल्यामुळे प्रस्थापितविरोधी भावनाही आता बिहारमध्ये मूळ धरू पाहत आहे. चिराग यांनीही नेमका हाच मुद्दा उचलून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे! ‘नितीश यांना मत म्हणजेच बिहारी मजुरांचे स्थलांतर!’ असा घणाघाती आरोप त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतरच्या २४ तासांत केला असून, भाजप आणि लोकजनशक्‍ती पक्ष यांचे सरकार बिहारमधील कामगारांना आपल्या राज्यातच रोजगार देऊ शकेल, असा दावा केला आहे! निकालानंतर भाजप आणि लोकजनशक्‍ती पक्ष एकत्र येऊन, नितीशकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्याची ही सारी चिन्हे आहेत. अर्थात, गेल्या लोकसभेत सहा जागा जिंकणाऱ्या पासवान यांना २०१५ मधील विधानसभेत दोनच जागा जिंकता आल्या असल्या, तरी लढवलेल्या मतदारसंघांत त्यांची मते मात्र दणदणीत २८ टक्‍के होती. त्यामुळेच नितीशकुमार यांच्या जागा कमी करण्यासाठीच भाजपने पासवान यांना स्वतंत्रपणे मैदानात उतरवले आहे, हेही अधोरेखित झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि जेडी(यु) यांच्या अर्ध्यामुर्ध्या ‘एनडीए’विरोधात लोकसभा निवडणुकीतीलच ‘महागठबंधना’चा प्रयोग पुन्हा एकदा राबवू पाहणारे लालूप्रसादांचे चिरंजीव तेजस्वी आणि त्यांचे बंधू तेजप्रताप यांच्याविरोधात नितीशकुमार हे थेट खुनाचा गुन्हा दाखल करू पाहत आहेत. लालूप्रसादांच्याच राष्ट्रीय जनता दलाच्या मागासवर्गीय सेलचे सचिव शक्‍ती मलिक यांची अलीकडेच पूर्णिया जिल्ह्यात हत्या झाली. त्यांची पत्नी खुशबूदेवी यांनी ही हत्या तेजस्वी व तेजप्रताप यांनी घडवून आणल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात ‘एफआयआर’ही दाखल करण्यात आला आहे.

आता प्रचारात हा विषय भाजप व जेडी(यु) यांच्या अजेंड्यावर अग्रक्रमाने असणार, हे उघड आहे. एक मात्र खरे! एकदा मित्रपक्षांच्या मदतीने राज्यात बस्तान बसवले की मग त्या मित्राला बाजूला सारावयाचे, ही भाजपची रणनीती महाराष्ट्रात शिवसेनेला अंगठा दाखवल्याने स्पष्ट झाली होती. आता ती पाळी नितीशकुमार यांच्या जेडी(यु)वर आली आहे. त्यामुळेच निकालानंतर भाजपने काही वेगळे पाऊल उचललेच तर नितीशकुमार हे ‘एनडीए’ला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा लालूप्रसादांशी हातमिळवणी करतात काय, ही कुतूहलाची बाब आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT