book sakal
editorial-articles

अग्रलेख : यमुनाकाठी गोदागौरव!

भारतात हिंदीसह अनेक भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती होत असते. त्यात दाक्षिणात्य चित्रपट असतात, तसेच बंगाली, गुजराती, आसामी किंवा मराठीही असतात.

सकाळ वृत्तसेवा

चित्रपटाचा आशय बदलू लागला असून ग्लॅमर आणि आशयघनता या दोन्ही घटकांनी हातमिळवणी केल्याचे हे लक्षण मानायला हवे.

भारतीय चित्रपटांमधला आशय किती विविध अंगांनी-रंगांनी बदलत चालला आहे, याचे प्रतिबिंब यंदाच्या ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या मानकऱ्यांच्या यादीवर एक नजर टाकली, तरीही समजते. मराठी चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये नेहमीच एकप्रकारचा दबदबा असतो. यंदाही तो कायम राहिला, ही समाधानाची बाब.

भारतात हिंदीसह अनेक भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती होत असते. त्यात दाक्षिणात्य चित्रपट असतात, तसेच बंगाली, गुजराती, आसामी किंवा मराठीही असतात. आशयघनतेच्या बाबतीत मराठी चित्रपटांचे पारडे नेहमीच वरचढ राहिले आहे. अगदी १९५३ च्या ‘श्यामची आई’पासून ‘श्वास’, ‘देऊळ’, ‘कोर्ट’, ‘कासव’ अशा अनेक चित्रपटांची नावे उदाहरणादाखल सांगता येतील.

सशक्त कथावस्तू, कसदार अभिनय, यथायोग्य मांडणी अशा कितीतरी गुणांनी युक्त असलेल्या मराठी चित्रपटांकडे एकच महत्त्वाचा घटक नाही, -तो म्हणजे प्रेक्षक! रसिकांचे पाठबळ न मिळाल्याने कलाखर्चाचा हात आखडता घ्यावा लागतो आणि अवकाश आक्रसते. अवकाश संकुचित झाल्याने रसिकांचे पाठबळही रोडावते, असे काहीसे हे दुष्टचक्र मराठी चित्रपटांच्या वाट्याला येते.

अशा परिस्थितीतही ‘एकदा काय झालं’ किंवा ‘गोदावरी’सारखा नितांतसुंदर चित्रपट निर्माण होतो, तेव्हा स्तिमित व्हायला होते. ‘एकदा काय झालं’ हा सलील कुलकर्णी दिग्दर्शित एक भावस्पर्शी चित्रपट आहे. एका कथाकाराचीच अनोखी कथा सांगणारा. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला, तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक निखिल महाजन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

‘देवबाभळी’सारखे सुंदर नाटक देणारे लेखक प्राजक्त देशमुख, अभिनेते जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, गौरी नलावडे यांच्यासारख्या कलावंतांनी ‘गोदावरी’ ही कहाणी पडद्यावर साकारली आहे. अभावाच्या वातावरणातही मराठी चित्रपटसृष्टीचे नाणे किती खणखणीत आहे, याची साक्ष ‘गोदावरी’ चित्रपट देतो.

चंद्रकांत कुलकर्णीनिर्मित ‘चंद सांसे’ या लघुपटालाही पुरस्कार मिळाला. एकंदर नऊ राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या मराठी चित्रपटांचा डंका वाजला ही बाब निश्वितच सुखावणारी आणि अभिनंदनीय.

केरळातील वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘रॉकेट्री : ए नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला यंदा सवोंत्कृष्ट चित्रपटाचे स्वर्णकमळ मिळाले. संपूर्ण आयुष्य विज्ञानाला वाहिलेल्या नंबी नारायणन यांच्यावर हेरगिरीचा आळ आला आणि जीवनातली वीसेक वर्षे विनाकारण नासून गेली.

अखेर ते निर्दोष मुक्त झालेच, शिवाय पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांच्या या संघर्षाचे चित्रण आर. माधवन याने हृद्य रितीने केले. माधवन हादेखील ‘थ्री इडियट्स’सारख्या मुख्य प्रवाहातलाच एक सितारा; पण ‘रॉकेट्री’मध्ये त्याने वेगळाच आशय मांडला. एकेकाळी राष्ट्रीय पुरस्कार वगैरे गोष्टी अभिजात कलावंत आणि चित्रकर्मींसाठीच राखून ठेवलेले असतात, तेथे सामान्य रसिकांचे काही काम नोहे, अशी गंडात्मक जाणीव प्रकर्षाने दिसून येत असे.

दक्षिणेतले अदूर गोपालकृष्णन किंवा गिरीश कार्नाड, हिंदीतले ओम पुरी, नसीरुद्दिन शहा, शबाना आजमी ही नामवंत मंडळी पुरस्कारांच्या नामावळीत दिसत असत. पण आता ‘झुकेगा नहीं…’ असे मानेवर हात घुमवत म्हणणारा, पाय घासत चालणारा पब्लिकचा लाडका ‘पुष्पा’देखील राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला.

‘आरआरआर’मधला ‘नाचो नाचो’छापाचा पदन्यास राष्ट्रीय पुरस्कार घेऊन गेला. अफाट कलाखर्चानिशी साकारली गेलेली अलिया भटची ग्लॅमरस ‘गंगूबाई काठियावाडी’ बेलाशक दाद घेऊन गेली. ग्लॅमरकन्या क्रिती सॅननची ‘मिमी’ राष्ट्रीय मोहोर उठवून गेली.

वास्तविक ‘पुष्पा’ साकारणारा अल्लु अर्जुन, अलिया भट, क्रिती सॅनन ही काही सरकारी पुरस्कारांच्या यादीतली नावे असण्याचे कारण नाही. या सिताऱ्यांनी अभिनय वगैरे करावा, अशी भलती अपेक्षा चित्रपट रसिकांचीही फारशी नसते. त्यांनी सुंदर दिसावे, छानपैकी नाचावे, जमल्यास थोडी टिपे गाळावीत, आणि रसिकाच्या तिकिटाचे पैसे वसूल करुन द्यावेत, एवढेच मागणे असते.

बऱ्याचदा तेदेखील पूर्ण होत नाही, हा भाग अलाहिदा. तीच तारांकित मंडळी आता पुरस्कार विजेत्यांच्या खुर्च्यांवर बसलेली दिसू लागली आहेत. चित्रपटाचा आशय बदलू लागला असून ग्लॅमर आणि आशयघनता या दोन्ही घटकांनी हातमिळवणी केल्याचे हे लक्षण मानायला हवे.

एरवी कुठल्याशा दिलखेचक खासगी पुरस्कार रजनीत चमकणारे हे चेहरे. पण यंदा तेच भाव खाऊन गेले. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा चित्रपट म्हणून ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या जाणे, स्वाभाविकच होते. हा एक तद्दन प्रचारी चित्रपट असल्याची संभावना मागेच झाली होती.

या चित्रपटात कलात्मक मूल्ये विशेषत्वाने काही असती, तर त्याचा सन्मान होणे खटकले नसते. पण या चित्रपटाला पुरस्कार आणि तोही ‘राष्ट्रीय एकात्मते’साठी केलेल्या प्रयत्नांबद्दल दिला गेला. या चित्रपटाने अफाट गल्ला ओढला हे खरेच; पण या चित्रपटाने ‘राष्ट्रीय एकात्मता’ साधली की ध्रुवीकरण, हा विचार व्हायला नको का? या चित्रपटाला उचलून धरायचे होते, तर अन्य कुठल्यातरी वर्गात त्याला सन्मानित करायला हवे होते.

राष्ट्रीय एकात्मतेचा नर्गिस दत्त पुरस्कार ‘काश्मीर फाइल्स’ला मिळणे, ही एकप्रकारे कलाजगताशीही केलेली प्रतारणाच. एकेकाळी ‘शहीद’, ‘दो बीघा जमीन’ सारख्या अजरामर चित्रपटांना हा पुरस्कार दिला गेला होता. हा एक निर्णय वगळता यंदाचे राष्ट्रीय पुरस्कार नव्या उमेदीचा आश्वासक संदेश देऊन गेले, हे महत्त्वाचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT