Narendra Modi sakal
editorial-articles

अग्रलेख : महापालिकेसाठीही ‘महाशक्ती’!

शिवसेनेत मोठी फूट पाडून राज्यात घडवून आणलेल्या ‘सत्तांतरा’ला अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट मुंबईत येऊन गुरुवारी ‘आशीर्वाद’ दिले!

सकाळ वृत्तसेवा

शिवसेनेत मोठी फूट पाडून राज्यात घडवून आणलेल्या ‘सत्तांतरा’ला अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट मुंबईत येऊन गुरुवारी ‘आशीर्वाद’ दिले!

राज्यातील सध्याची सत्ताधारी युती मुंबई महापालिकेत सत्तेवर आली तरच या शहराचा विकास होईल, असे सांगणे ही एका अर्थाने मुंबईकरांना दिलेली अप्रत्यक्ष धमकीच आहे. हे लोकशाहीला मारक आहे.

शिवसेनेत मोठी फूट पाडून राज्यात घडवून आणलेल्या ‘सत्तांतरा’ला अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट मुंबईत येऊन गुरुवारी ‘आशीर्वाद’ दिले! त्यामुळे आता गेले जवळपास दहा महिने या ना त्या कारणामुळे लांबणीवर पडलेल्या मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका कधीही घोषित होतील, असे किमान वातावरण तयार करण्यात भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या थेट अंगणात येऊन ‘बीकेसी’च्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मोदी यांनी मुंबईकरांवर आश्वासनांची खैरात केली. त्यामुळेच अप्रत्यक्षरीत्या या महानगरातील जवळपास ४० हजार कोटींच्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्याचे रूपांतर भाजपच्या प्रचारसभेतच होऊन गेले.

अर्थात, फडणवीस यांचा हा कार्यक्रम इतक्या भव्य-दिव्य पद्धतीने आयोजित करण्यामागील हेतूही तोच होता, ही बाब लपून राहिलेली नव्हती. खरे तर विविध कारणे आणि कोर्टबाजी यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडत होत्या. गेली २५ वर्षे उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असलेला मुंबई महापालिकेचा गड त्यांच्याकडून जिंकण्याची खात्री नाही, असा समज रूढ होऊ पाहत होता. त्यामुळेच मोदी यांना मुंबईत आमंत्रित करून, या सत्तांतराच्या पाठीशी खरोखरच ‘महाशक्ती’ उभी आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न भाजपने केला.

या कार्यक्रमास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या नात्याने जरूर उपस्थित होते आणि त्यांनी मोदी यांच्यावर तोंडभरून स्तुतिसुमनेही उधळली. तरीदेखील या सोहळ्यात शिंदे गटाचे स्थान नगण्य असेच होते. त्यामुळे आता थेट पंतप्रधानांनी ‘मुंबईच्या विकासासाठी सरकार दहा पावले चालले, तर आपण ११ पावले चालू!’ असे आश्वासन देऊन भाजपच्या या निवडणुकीतील प्रचाराची नांदीच म्हटली. शिवसेनेवर सहा महिन्यांपूर्वी मोठा आघात केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या हातातील मुंबई महापालिका हिसकावून घेण्यासाठी फडणवीस यांनी मोदी यांच्या हाताने हा अखेरचा घाव घातला आहे. अर्थात, या स्वार्थाने बरबटलेल्या राजकारणातून का होईना एकेकाळच्या टुमदार मुंबईला आजच्या बकाल अवस्थेतून कोणी बाहेर काढू पाहत असतील, तर त्याचे सर्वसामान्य मुंबईकर स्वागतच करणार, हे उघड आहे.

अलीकडेच झालेल्या गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभांच्या तसेच दिल्ली महापालिका यांच्या निवडणूक प्रचारात मोदी हे जातीने ‘आम आदमी पक्ष’ तसेच अन्य पक्षाच्या ‘रेवडीबाजी’च्या राजकारणावर कडाडून टीका करत होते. मात्र, या सभेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘महाविकास आघाडी’च्या सरकारवर नाव न घेता टीका करत मोदी यांनी मुंबईकरासाठी घोषणांची जी आतषबाजी केली, तेदेखील रेवड्यांचे राजकारणच म्हणावे लागेल. या महानगराच्या विकासासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा तर त्यांनी केलीच; शिवाय मुंबईतील एक लाख २० हजार फेरीवाल्यांच्या बँक खात्यांत दहा हजार रूपये कर्जरूपानेही जमा केले.

ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या कर्जवाटपाची खरे तर निवडणूक आयोगानेच दखल घ्यायला पाहिजे. मात्र, तसे होणे सध्याच्या काळात कठीणच दिसते. शिवाय, त्यापलीकडली बाब म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘डबल इंजिन’ या भाजपच्या शब्दप्रयोगाला ‘ट्रिपल इंजिन’ची दिलेली जोड मोदी यांनी उचलून धरली. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले आणि केंद्रातील भाजप सरकारला आणखी एक इंजिन मिळाले. आता महापालिकेतही याच आघाडीला निवडून दिले तर मुंबईचा कायाकल्प करून दाखवू, असे शिंदे यांनी सांगितले होते. मोदी यांनी त्यास पुष्टी देत ही आघाडी या महानगरात सत्तेवर आली तरच या शहराचा विकास होईल, असे सांगणे म्हणजे एका अर्थाने मुंबईकरांना दिलेली धमकीच आहे.

हे लोकशाहीला तर मारक आहेच; शिवाय देशाच्या आजवरच्या प्रकृतीशीही विसंगत आहे. मात्र, तीच भाजपच्या कारभाराची रीत बनून गेली आहे. बिगर-भाजप सरकारे असलेल्या राज्यांना मिळत असलेल्या सापत्नभावाच्या वागणुकीमुळे ते दिसून आलेही आहे. आता त्यात मोदी हे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलाही जोडू पाहत आहेत. अर्थात, या भूमिपूजन तसेच उद्‍घाटन सोहळ्यामागील मुख्य उद्देशच भाजपच्या प्रचाराचा नारळ वाढवणे, हा असल्यामुळे ही अशी राजकीय भाषणेच येथे अपेक्षित होती आणि त्याचीच पूर्तता मोदी यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुंबई महापालिकेच्या गेल्या २५ वर्षांतील कारभारावर हल्ला चढवला आणि मुंबईकरांच्या पैशांनी काहींनी आपली घरे भरण्याचेच एकमेव काम केले, अशी तिखट टीका केली. गेल्या निवडणुकीनंतर महापालिकेची सत्ता काबीज करणे सहज शक्य असताना, भाजपने राज्यातील सरकार टिकवण्यासाठीच शिवसेनेला मुंबई महापालिका आंदण दिली होती, याकडे मात्र त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. बाकी मोदी यांचा पाच-दहा मिनिटांचा मेट्रो प्रवास आणि शालेय विद्यार्थी तसेच मेट्रो कर्मचारी यांच्याशी केलेली बातचीत हा निव्वळ देखावा होता.तो उभा करण्यात भाजपला मोठे यश मिळाले, हे या सोहळ्यास झालेली गर्दीच सांगत होती. या अशा देखाव्यांमुळे आपल्या देशातील भाबडी जनता भारावून जाते, हे भाजपला गेल्या काही वर्षांत पक्के कळून चुकले आहे आणि तेच भाजपच्या यशाचे गमक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT