संरक्षण दलांच्या व्यवस्थेची काळानुरूप फेररचना करण्याच्या महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पाची पायाभरणी करणारे सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनामुळे देशाने एक द्रष्टा रणधुरंधर गमावला आहे.
कोणत्याही व्यवस्थात्मक बाबींची फेररचना करणे, त्याला नवा,आधुनिक चेहरा देणे हे अतिशय आव्हानात्मक असे काम असते. भारतीय संरक्षण दलांच्या बाबतीत अशा महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी मोठ्या धडाडीने पार पाडत असतानाच सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांचे अपघाती निधन व्हावे, हा देशासाठी एक मोठा धक्का आहे. जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह तेरा जणांचा तमिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. अलीकडेच म्हणजे एक जानेवारी २०२० रोजी बिपिन रावत देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष झाल्याने अनेक दशकांच्या प्रतीक्षापूर्तीचा आनंद झाला होता. भारतीय लष्कराच्या पारंपरिक दलांना एकत्रित गुंफून कारवाई परिणामकारक आणि गतिमान करण्यासाठी ‘थिएटर कमांड’चे काम जनरल रावत पाहात होते. अपघाताचे वृत्त पसरताच देशभर प्रत्येक घरात हळहळ व्यक्त झाली. आक्रमक रणनीती ठरविणारा व्यूहरचनाकार, अनुभवी सेनानी, स्पष्टवक्ता, प्रखर देशभक्त असे जनरल रावत यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचे स्मरण केले गेले. एकूणच संरक्षण दलांबद्दल सर्वसामान्य जनतेत व्यापक प्रमाणात निर्माण झालेल्या जागरूकतेचे आणि संवेदनशीलतेचेही दर्शन या निमित्ताने घडले.
जनरल बिपिन रावत यांना लष्करी सेवेचा पिढीजात वारसा होता. ज्या गोरखा रेजिमेंटमधून त्यांनी कारकीर्द सुरू केली, त्याचे प्रमुख त्यांचे वडील लक्ष्मणसिंह होते. पुण्यातील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’सह विविध संस्थांतून जडणघडण झालेल्या रावत यांचा पिंड शिकण्याचा होता. त्यांनी मेरठमधील चौधरी चरणसिंग विद्यापीठातून पीएच.डी संपादली होती. पक्के नियोजन, त्याच्या कार्यवाहीसाठी दृढनिश्चय, उद्दिष्टपूर्ततेसाठी धाडस आणि भूमिका मांडताना कोणाचीही भीडभाड न ठेवण्याची शैली ही रावत यांची वैशिष्ट्ये होती. लष्करी खाक्याबाबत ते आग्रही राहायचे आणि तसेच वागायचेदेखील. त्यांची सत्ताधाऱ्यांशी असलेली वैचारिक जवळीक, लष्करी चौकटीबाहेरची राजकीय विधाने आणि कृती यामुळे ते वादाच्या भोवऱ्यातही सापडायचे. पण विरोधाला ते भीक घालत नसत. त्यांनी सरसेनाध्यक्षपदावरून बजावलेली कामगिरी धाडसी, धोरणी लष्करप्रमुखाला साजेशी होती. त्याबाबत ते कायम स्मरणात राहतील. २०१५मध्ये म्यानमारमध्ये भारतीय सैन्य घुसवून दहशतवादी तळ उद्धवस्त करण्याची योजना आखून कार्यवाहीत आणण्यात रावत यांचे योगदान होते. त्यामुळे ईशान्य भारतात शांतता नांदत आहे. चीनने डोकलाममध्ये दिलेले आव्हानही परतवून लावणे असो, नाहीतर लडाखमध्ये चीनने घुसखोरीने निर्माण केलेला पेच, यातून धडा घेत रावत यांनी आपल्याला दोन आघाड्यांवर शत्रूशी मुकाबला करावा लागेल, असे सूचक विधान करत शस्त्रसज्जतेवर भर दिला होता. दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी २०१६मध्ये पाकव्याप्त काश्मिरात आणि २०१९मध्ये पाकिस्तानातील बालाकोटमधील दहशतवादी प्रशिक्षण उद्धवस्त करण्याची योजना यांच्या आराखड्यापासून कार्यवाहीपर्यंत रावत यांनी दिलेले योगदान मोलाचे होते.
लष्कराची तिन्ही दले एकाच वेळी, एकाच प्रमुखाच्या नेतृत्वाखाली परिणामकारक आणि वेगवान कामगिरी करू शकतील, या कल्पनेतून २०२२ मध्ये पहिले ‘थिएटर कमांड’ स्थापण्याचे नियोजन आहे. या संकल्पनेचा जनरल रावत आधीपासून पाठपुरावा करीत होते. पुण्यात ते दक्षिण विभागाचे प्रमुख होते, तेव्हापासून त्यांचा भर थिएटर कमांड निर्मितीवर होता. याविषयी वैचारिक मंथन सुरू असताना त्यांनी केलेल्या एका विधानामुळे हवाई दलाला दुय्यम लेखण्यात आल्याचा संदेश गेल्याने त्या दलातील काहींनी नाराजी व्यक्त केली होती. पण असे काही प्रसंग घडले तरी त्यामुळे त्यांच्या एकूण योगदानाचे महत्त्व कमी होत नाही. हवाईदल आणि नौदलाचे आधुनिकीकरण, त्यासाठी मोठ्या प्रमाणात साधनसामग्री खरेदीवर ते लक्ष देत होते, त्याविषयी आग्रही होते, ही त्यांची कामगिरी केवळ लक्षणीयच ठरली असे नाही, तर काही नवे पायंडे निर्माण करणारी ठरली. त्यांच्या कारकीर्दीत सायबर सिक्युरिटीची आव्हाने, युद्धाची बदलती परिमाणे, सीमेवरच नव्हे तर सीमेपलीकडून शत्रुच्या आगळीकी लक्षात घेऊन त्याला तोंड देण्याची सज्जता यावर रचनात्मक बाबी आकाराला येत होत्या. एवढेच नव्हे तर अंतराळाची सुरक्षितता व अंतराळयुद्धाची भविष्यकालीन तयारी अशा आव्हाने लक्षात घेऊन त्यासाठी संकीर्ण थिएटर कमांड निर्मितीवरही काम सुरू होते. रावत यांच्या निधनाने या सगळ्या प्रक्रियेला ब्रेक लागणे देशाचे व्यापक हित लक्षात घेता परवडणारे नाही.
नव्या सरसेनाध्यक्षांची नियुक्ती आणि लष्कराच्या आधुनिकीकरणाची गती कायम राखणे महत्त्वाचे असेल. जनरल रावत, हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्याबरोबर असलेले अन्य लष्करी अधिकारी या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या अपघाती मृत्यूने सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, यात शंका नाही. अशा आकस्मिक अपघातानंतर लोकांच्या मनात शंकाकुशंकांचे पेव फुटते. त्यामुळेच या संपूर्ण दुर्घटनेच्या चौकशीकडे सारे जण अपेक्षेने पाहणार, हे उघड आहे. एअर मार्शल मानवेंद्रसिंग यांच्या नेतृत्वाखालील तीनही दलातील सदस्यांची चौकशी समिती अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. मानवी चुकांपासून तांत्रिक बाबींपर्यंतचा तपास ते करतील. हवामानाची प्रतिकूलता, तांत्रिक, प्रक्रियात्मक आणि संघटनात्मक बाबींची शहानिशाही होईल. एम आय-१७ व्ही-५ या बनावटीच्या हेलिकॉप्टरचे आतापर्यंतचे अपघात आणि त्याचा राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठीही होणारा त्याचा वापर लक्षात घेता, सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेबाबत दक्षतेची गरज अधोरेखित झाली आहे. या समितीचा अहवाल जितक्या लवकर येईल, तितका तो भविष्यकालीन उपायांसाठी उपयुक्त ठरू शकतो. अशा अपघाताची पुनरावृत्तीही टाळता येईल. अशा दुर्घटनांनंतरही देश पुन्हा खंबीरपणे उभा राहातो, असे यापूर्वीही आपण अनुभवलेले आहे. यावेळीही तसेच घडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.