Congress Leaders Sakal
editorial-articles

अग्रलेख : नाल सापडली; घोडा शोधा!

सुस्तावलेल्या काँग्रेस पक्षाने किमान डोळे उघडून पुढच्याच वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी काही ठोस रणनीती आखण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुस्तावलेल्या काँग्रेस पक्षाने किमान डोळे उघडून पुढच्याच वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी काही ठोस रणनीती आखण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे.

अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांत दारूण पराभव पदरी आल्यानंतर का होईना सुस्तावलेल्या काँग्रेस पक्षाने किमान डोळे उघडून पुढच्याच वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी काही ठोस रणनीती आखण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे! भारतीय लोकशाहीसाठी हे एक सुचिन्हच आहे; कारण गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत काँग्रेसची अवस्था दयनीय झाली असली तरी त्या दोन्ही वेळा काँग्रेसला मते मात्र १९ टक्क़्यांच्या जवळपास मिळाली होती. त्यामुळे निवडून येणाऱ्या प्रतिनिधींच्या संख्येकडे दुर्लक्ष केले तर काँग्रेस हाच भारतीय जनता पक्षानंतरचा देशातील सर्वात मोठा पक्ष मानणे भाग आहे. त्यामुळे आता याच १९ टक्के मतांचे रूपांतर जागांमध्ये कसे करावयाचे, ही रणनीती आखण्यासाठी काँग्रेसने निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना अखेर आवतण दिले आहे.

गेल्या चार-सहा दिवसांत किशोर यांच्या सोनिया गांधी तसेच त्यांच्या निकटवर्ती वर्तुळातील बडे नेते यांच्यासमवेत दोन बैठका झाल्या असून, त्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी आखलेल्या रणनीतीचे सादरीकरणही त्यांच्यापुढे केले आहे. आता सोनियांचे हे निकटवर्ती वर्तुळ या सादरीकरणाचा उहापोह करण्यात दंग आहे. एवढेच नव्हे तर त्याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सोनियांनी एक समितीही स्थापन केली आहे. मात्र, इकडे नवी दिल्लीत या हालचाली सुरू असतानाच पक्षाचे अनभिषिक्त प्रमुख राहूल गांधी मात्र परदेश दौऱ्यात मग्न आहेत! ते परतल्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात राजस्थानात बहुधा उदयपूर येथे एक चिंतन शिबीर घेण्याच्या मनःस्थितीत काँग्रेस आहे. खरे तर राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या राज्यातील निवडणुका पुढच्या वर्षी होणार असल्या तरी त्या आधी या वर्षाअखेरीस गुजरात या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘होम पीच’वर काँग्रेसला भाजपबरोबरच ‘आम आदमी पार्टी’शीही लढत द्यायची आहे. त्यामुळे खरे तर ही चिंतन बैठक घेण्यासाठी महिनाभराचा कालावधी गमावण्याची काहीच गरज नाही. राहूल तर परदेशात जिथे कुठे असतील, तेथून या बैठकीत ‘ऑडिओ-विज्युअल’ माध्यमातून सहभागी होऊ शकतात. मात्र, काँग्रेस अजूनही ‘आस्ते कदम’ याच भूमिकेत असल्याचे त्यामुळेच म्हणावे लागते.

मात्र, काँग्रेसपुढील या पलीकडचा प्रश्न हा प्रशांत किशोर यांना केवळ निवडणूक रणनीतिकार म्हणून नियुक्त करावयाचे की त्यांना थेट पक्षातच दाखल करून घ्यावयाचे, हा आहे. गेली आठ वर्षे किशोर हे रणनीतिकार म्हणून विविध पक्षांसाठी काम करत आहेत. भाजप, आप, तृणमूल काँग्रेस तसेच नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल यांना या काळात मिळालेल्या यशात प्रशांत किशोर यांनी निश्चित केलेल्या रणनीतीचा मोठा वाटा आहे आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला अस्मान दाखवण्यात सहभागी झाल्यानंतर त्यांनी केवळ ‘रणनीतिकार’ या भूमिकेतून निवृत्त होऊ इच्छितो, असे जाहीरपणे सांगितले होते. दरम्यान, काही काळ त्यांनी नितीशकुमार यांच्या पक्षात दाखल होऊनही घालवला. मात्र, तेथून त्यांना बाहेर पडावे लागले. या त्यांच्या प्रवासात त्यांनाही काही राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झालेली असू शकते आणि त्यामुळेच ते आता काँग्रेसचे केवळ सल्लागार म्हणून न राहता, थेट त्या पक्षातच सामील होण्याची मनीषा बाळगून आहेत.

काँग्रेसमध्ये अर्थातच त्यामुळे मत-मतांतरे निर्माण झाली आहेत आणि अखेरीस रिवाजानुसार याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसजनांनी सोनियांकडे सोपवले आहेत! काँग्रेसमधील सध्याचे वातावरण बघता, किशोर यांचा पक्षप्रवेश निश्चित दिसतो. मात्र, रणनीतीकार म्हणून काम करताना, अंतिम निर्णयाचे सर्वाधिकार हे किशोर यांना हवे असतात, असा आजवरचा अनुभव आहे. हे सोनिया, राहूल आणि प्रियांका होऊ देतील काय, हा खरा प्रश्न आहे आणि मग किशोर यांनाही संयुक्त जनता दलातील अनुभवाचा पुनःप्रत्यय घेत काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले, तर हसे काँग्रेसचेच होऊ शकते.

अर्थात किशोर पक्षात आले वा त्यांनी आखून दिलेली रणनीती अमलात आणली म्हणजे लगेच काँग्रेस विजयपथावरून धावू लागेल, असा समज काँग्रेसला महागात पडू शकतो. किशोर यांनी ज्या ज्या पक्षांची यशोगाथा लिहिली, तेथे मोदी, अरविंद केजरीवाल, ममता बँनर्जी, नितीशकुमार असे जनतेची नाडी ओळखणारे बडे नेते तसेच त्यांचे कार्यकर्ते होते. व्यवस्थापन तंत्र, व्यूहरचना, तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले अंदाज या गोष्टींना निवडणुकीच्या राजकारणात निश्चित महत्त्व आहे; परंतु तो केवळ एक भाग झाला; पण तो एकमेव नव्हे, याचे भान कॉंग्रेसला ठेवावे लागेल. नेतृत्व आणि संघटना हे दोन मुख्य खांब लागतातच. लोकांचे प्रश्न सोडवत, त्यांना प्रेरित करीत, त्यांच्यासाठी ठोस कार्यक्रम पुढे ठेवत पक्ष आपला जनाधार वाढवत असतो. त्यात वैचारिकताही अभिप्रेत असते. हा ‘राजमार्ग’ टाळून नुसताच व्यूहरचनेवर भर देणे म्हणजे निव्वळ तंत्राधिष्ठित लोकशाहीच्या अधीन होण्यासारखे आहे. किशोर हे तंत्र सांगू शकतील, पण मंत्र पक्षालाच शोधावा लागेल. त्यामुळेच ‘नाल तर सापडली; आता घोडा शोधा!’ अशी अवस्था झालेल्या काँग्रेसला त्यापलीकडे जाऊन आपल्या ध्येयधोरणांबाबत मूलभूत विचार करावाच लागणार आहे. प्रशांत किशोर म्हणजे कोणी लगेचच विजयाचे सुवर्णपदक हासील करून देणारा ‘परीस’ नाही, हे त्यांना आवतण देताना सोनिया गांधी यांनी लक्षात घेतले असेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT