दसरा मेळाव्यातील भाषणाच्या निमित्ताने आगामी महापालिका निवडणुकांचे रणशिंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुंकले. आपला मुख्य प्रतिस्पर्धी हा भाजपच असणार, हेही स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांच्या विधानामुळेही आघाडीतील ऐक्य मजबूत असल्याचा निर्वाळा दिला गेला.
यंदाच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर ज्या पद्धतीने थेट तोफा डागल्या, त्यामुळे राज्यातील जनतेला एक स्पष्ट संदेश गेला आहे. येत्या चार महिन्यांत मुंबई-ठाणे-पुणे आदी शहरांतील महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. उद्धव ठाकरे त्या निवडणुकांचे रणशिंग हा मुहूर्त साधून फुंकणार, हे अपेक्षितच होते. मात्र, ते फुंकताना त्यांनी आपला प्रथम क्रमांकाचा प्रतिस्पर्धी हा भाजपच असणार, असा निर्वाळा खास करून शिवसैनिकांना दिला आहे. शिवाय तो देताना त्यांनी वापरलेली भाषा ही बाळासाहेब ठाकरे यांच्याच भाषेत सांगायचे झाले, तर शिवसैनिकांच्या मनातील अंगार फुलवणारी होती. उद्धव ठाकरे यांचे हे भाषण झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली, ती बघता राष्ट्रवादी काँग्रेसचेही हेतू तेच असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यामुळेच या महापालिका निवडणुकांत शिवसेना तसेच राष्ट्रवादी यांचा संयुक्त ‘शत्रू’ प्रतिस्पर्धी भाजपच असल्याचा आणखी एक संदेश राज्यातील जनतेपर्यंत पोहोचला आहे. उद्धव ठाकरे यांचे हे भाषण तसेच पवार यांची पत्रकार परिषद यांना अनेकार्थांनी महत्त्व होते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या सरकारच्या दोन वर्षांच्या काळात हे सरकार कधीही कोसळणार वा उद्धव ठाकरे पुन्हा भाजपशी हातमिळवणी करणार वा उद्धव ठाकरे यांच्या कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपशी घरोबा करणार, असे संशयाचे वातावरण सातत्याने निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचे विविध नेते रोजच्या रोज करत आहेत. या संशयाचे निराकरण तर या दोन्ही नेत्यांनी केलेच; शिवाय त्यामुळेच हे सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही जनतेला मिळाली. राहता राहिली या सरकारमध्ये असलेली काँग्रेस. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या या एकवाक्यतेनंतर आता काँग्रेसला सरकारसोबत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच आता किमान महापालिका निवडणुकांपर्यंत तरी या सत्ताधारी आघाडीची एकजूट अभंग राहणार, असेच चित्र उभे राहिले आहे. महाराष्ट्रात सातत्याने राजकीय अस्थिरतेचे तसेच संशयाचे वातावरण निर्माण करण्याच्या भाजप नेत्यांच्या प्रयत्नांना त्यामुळे तूर्तास तरी खीळ बसू शकते, असे त्यामुळे म्हणता येते.
रंग माझा वेगळा...
गेल्या महिना-दीड महिन्याच्या काळात सक्तवसुली संचालनालय (ईडी) तसेच सीबीआय आणि प्राप्तिकर खाते यांच्या तपास यंत्रणांनी शिवसेना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनाही लक्ष्य केले आहे. त्यामुळे या यंत्रणांच्या होत असलेल्या ‘वापरा’बद्दल ठाकरे व पवार यांनी केंद्र सरकारला याचवेळी धारेवर धरले. शिवसेना; तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष अशा प्रकारच्या कारवायांमुळे हतबल होऊन, त्यापैकी कोणी तरी आपल्या दारात येईल आणि ‘परत येण्याचे’ आपले मनसुबे साठा उत्तरी सफल होतील, असा भाजप नेत्यांचा कयास असणार. मात्र, या दोन्ही पक्षांनी त्याऐवजी ठामपणे एकत्र राहून भाजपला लक्ष्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हे विद्यमान सरकार आता अधिक ठामपणे कारभार तर करू शकेलच; शिवाय भाजपलाही आपल्या रणनीतीत मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागतील. अर्थात, पवारांपेक्षा ठाकरे यांचा आवाज हा अधिक मोठ्या पट्टीत लावलेला होता आणि ‘मी काही झोला उचलून निघून जायला फकीर नाही!’ असे सांगत त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावला. मात्र, त्याचवेळी भाजप; तसेच मोदी यांच्यावरील घणाघाती टीकेमुळे ‘हिंदू समाज’ दुखावला जाऊन आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना, ही शंकाही त्यांच्या मनात भिरभिरत होती. त्यामुळेच त्यांनी भाजपचे हिंदुत्व आणि शिवसेनेचे हिंदुत्व यांतील फरकही आपल्या परीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आपले हिंदुत्व हे दसऱ्याच्याच दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी विशद केलेल्या हिंदुत्वाशी नाळ जोडणारे आहे, तर भाजपचे ‘नवहिंदुत्व’ हे त्यापासून दूर जाणारे आहे, हे त्यांचे विश्लेषण अर्थातच आपला ‘हिंदू मतदार’ आपल्यापासून दूर जाऊ नये, एवढ्यासाठीच होते! हिंदुत्वाच्या बाबतीत आपली वेगळी रेघ दाखवून देण्याचा प्रयत्न शिवसेना यापुढे सतत करीत राहणार, याचाच प्रत्यय ठाकरे यांच्या भाषणातून आला.
ठाकरे यांनीच सांगितल्याप्रमाणे या भाषणानंतर भाजपचे अनेक नेते ‘चिरकले’ही! त्यात अर्थातच अग्रभागी होते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. गोव्यातून भल्या सकाळीच त्यांनी ठाकरे यांच्या विचारांची चिरफाड करण्याचा प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरे हे कसे हतबल झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात कोण हतबल झाले आहे, याची साक्षच ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने मैदानात उतरवलेल्या अनेक बोलक्या पोपटांमुळे मिळाली! उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदासाठी कसे आसुसलेले होते, हा फडणवीस यांचा दावा तर थेट पवारांनी वस्तुस्थितीचे दाखले देत खोडून काढला. एक मात्र खरे, की उद्धव ठाकरे तसेच पवार यांच्या या वक्तव्यांमुळे आता राज्यातील राजकीय वातावरण हे महापालिका निवडणुका पार पडेपर्यंत अधिकाधिक तापत जाणार. मात्र,या रणधुमाळीत जनतेच्या हितांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये, एवढीच अपेक्षा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.